Monsoon News : सर्वाधिक उत्पादन घेणाऱ्या राज्यांना चांगल्या पावसाची प्रतिक्षा, अनेक ठिकाणी पेरण्या खोळंबल्या
देशातील काही राज्यात अद्यापही पावसानं दडी मारली आहे. प्रमुख अन्न उत्पादक असणाऱ्या उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल या राज्यात अद्यापही पाऊस हा सामान्य पातळीपेक्षा कमीच आहे
Monsoon News : संपूर्ण भारतात मान्सूनचं आगमन झालं आहे. देशातील विविध राज्यात पावसानं चांगलीच हजेरी लावल्याचं चित्र दित आहे. मात्र, काही राज्यात अद्यापही पावसानं दडी मारली आहे. प्रमुख अन्न उत्पादक असणाऱ्या उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल या राज्यात अद्यापही पाऊस हा सामान्य पातळीपेक्षा कमीच आहे. पेरणी करण्यासाठी शेतकऱ्यांना चांगल्या पावसाची गरज आहे. सरकारी आकडेवारीनुसार, या राज्यात सध्या 27.872 दशलक्ष हेक्टरवर भात आणि इतर उन्हाळी पिकांची पेरणी झाली आहे.
या राज्यात पावसाचं प्रमाण कमी
दरम्यान, गहू आणि ऊसाचे प्रमुख उत्पादक असणाऱ्या उत्तर प्रदेशमध्ये पाऊस सामान्य पातळीपेक्षा कमी झाला आहे. धानाचे सर्वाधिक उत्पादक असलेल्या पश्चिम बंगालमध्येही पाऊस कमीच आहे. याचबरोबर झारखंड ओडिशा आणि बिहारमध्ये पावसाचं प्रमाण कमीच आहे. गुजरात आणि केरळमधील काही भागातही सामान्यपेक्षा कमीच पाऊस झाल्याचं चित्र आहे. तसेच वायव्य भारतासह मध्य भारतात पावसाची कमतरता आहे. भारतीय हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, जुलैमध्ये सामान्य पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे परिस्थिती सुधारण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
येत्या आठवड्यात पूर्वेकडील भागात काही प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. जून ते सप्टेंबर नैऋत्य मान्सून दरम्यान भारतात वार्षिक पावसाच्या तीन चतुर्थांश पाऊस पडतो. त्याची प्रगती हा देशाच्या कृषी उत्पादन आणि ग्रामीण उत्पन्नाचा मुख्य निर्धारक आहे. तर काही भागात अल्पावधीत मुसळधार पाऊस पडल्यानं पुराचा धोका येण्याची शक्यताही असते. त्याचा फटका शेती उत्पादनाला बसू शकतो.
महाराष्ट्रात चांगला पाऊस
सध्या महाराष्ट्रात विविध भागात चांगला पाऊस कोसळताना दिसत आहे. या पावसामुळं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. राज्यातील मुंबईसह, ठणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे सातारा, कोल्हापुरात जोरदार पाऊस कोसळताना दिसत आहे. तसेच मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यातही चांगला पाऊस सुरु असल्याचं दिसत आहे. रत्नागिरी जिल्ह्यात 8 जुलै ते 12 जुलै या कालावधीत मुसळधार ते अतिमुसळधार स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता भारतीय हवामान विभगानं वर्तवली आहे. त्यामुळं नागरिकांनी सावधानता बाळगावी, असं आवाहन जिल्हा प्रशासनाने केलं आहे.