(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nanded Agriculture News : पावसाअभावी पिकं चालली वाळून, नांदेड जिल्ह्यातील शेतकरी संकटात
नांदेड (Nanded) जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. त्यामुळं नांदेड जिल्ह्यातील शेतकरी संकटात सापडला आहे.
Nanded Agriculture News : सध्या राज्यात पावसानं (Rain) उघडीप दिली आहे. काही ठिकाणी मात्र, अधून मधून हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडत आहे. दरम्यान, नांदेड (Nanded) जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. त्यामुळं तिथे तुषार सिंचनाने (Tushar Sinchan) पाणी देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. पावसानं उघडीप दिल्यानं नांदेड जिल्ह्यातील पिकं वाळू लागली आहेत. त्यामुळं जिल्ह्यातील शेतकरी संकटात सापडले आहेत.
नांदेड जिल्ह्यात आतापर्यंत जवळपास 850 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर अगोदर झालेल्या बेफाम पावसामुळं आणि अतिवृष्टीनं शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं आहे. ज्यामध्ये जवळपास शेतकऱ्यांची 70 ते 80 टक्के पिकं ही खरडून आणि वाहून गेली होती. दरम्यान, या नुकसानीनंतर उर्वरित पिकेही आता पावसाअभावी जाण्याची भीती निर्माण झाली आहे. कारण गेल्या पंधरा दिवसांपासून नांदेड जिल्ह्यात पावसाचा एक थेंबही न पडल्यामुळं सोयाबीन, उडीद, मूग, कापूस ही पिके आता वाळू लागली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना आता कृत्रिम पावसाचा आधार घेत तुषार सिंचनाद्वारे पिकांना पाणी देण्याची वेळ आली आहे.
पावसाच्या तडाख्यातून वाचलेली पिकं वाया जाण्याची शक्यता
दरम्यान, एकीकडे अतिवृष्टीनं झालेलं नुकसान तर दुसरीकडे सरकारने नुसती आश्वासनाची भडिमार करुन न मिळालेल्या मदतीमुळे आधीच त्रस्त झाले आहेत. शेतकरी आता पावसाच्या या उघडीपीने उरलेसुरले ही पीक जाते की काय? यामुळं अधिकच चिंतातूर झाले आहेत. नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर, उमरी, कंधार, धर्माबाद, माहूर, किनवट तालुक्यांसह इतर भागात अतिवृष्टीमुळं पिकांचे मोठं नुकसान झालं होतं. जूनमध्ये पावसानं दडी मारली होती. मात्र, जुलै महिन्यात आणि ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला नांदेड जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला होता. या फटका शेतकऱ्यांना बसला होता. मात्र, गेल्या 15 दिवसापासून नांदेड जिल्ह्यात पावसानं दडी मारल्यामुळं शेतकरी चिंतेत आहे. पावसाच्या तडाख्यातून वाचलेली पिकं देखील वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
पावसाचा अंदाज
राज्यात पावसानं उघडीप दिली असली तरी काही ठिकाणी पावसानं हजेरी लावली आहे. पहाटेपासूनच मुंबई (Mumbai) आणि ठाणे (Thane) परिसरात पाऊस पडत आहे. अन्य ठिकाणी मात्र, पावसानं उघडीप दिली आहे. दरम्यान, आज विदर्भात पावासाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. विदर्भातील सर्वच जिल्ह्यात आज पावासाचा यलो अलर्ट असून मराठवाड्यातील हिंगोली, नांदेड तर पश्चिम महााष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यात आज यलो अलर्ट देण्यात आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या: