Nanded Rain : नांदेड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, अनेक घरांमध्ये शिरलं पाणी, शेती पिकांनाही मोठा फटका
काल रात्रीपासून नांदेड जिल्ह्यात पावसाचा जोर वाढाला आहे. अनेक ठिकाणी नद्यांना पूर आला आहे. त्यामुळं काही ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरलं आहे.
![Nanded Rain : नांदेड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, अनेक घरांमध्ये शिरलं पाणी, शेती पिकांनाही मोठा फटका Nanded Rain News Heavy rain in Nanded district, water entered many houses Nanded Rain : नांदेड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, अनेक घरांमध्ये शिरलं पाणी, शेती पिकांनाही मोठा फटका](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/27/2a844ff5baf18ff2db96c62ea3be423e1658900265_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Nanded Rain : गेल्या चार दिवसांपासून नांदेड (Nanded) जिल्ह्यात पावसानं (Rain) धुमाकूळ घातला आहे. या पावसामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. काल रात्रीपासून पावसाचा जोर वाढाला आहे. अनेक ठिकाणी नद्यांना पूर आला आहे. त्यामुळं काही ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरलं आहे. तसेच वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. सखल भागात पाणी साचल्यानं तसेच अनेक नागरी वस्तीत पाणी शिरल्यानं नागरिकांना रात्र जागून काढावी लागली. तसेच जिल्ह्यातील शेतीचही या पावसामुळं मोठं नुकसान झालं आहे.
जीव धोक्यात घालून प्रवास
मुसळधार पावसामुळं नांदेड जिल्ह्यातील अनेक राज्य व राष्ट्रीय महामार्गावरील पुलावरुन पुराचे पाणी वाहत असल्यानं वाहतुकीचा खोळंबा झाला आहे. उमरी तालुक्यातील काही ठिकाणी शालेय विद्यार्थी पुराच्या पाण्यात जीव धोक्यात घालून रस्ता ओलांडत असल्याचे दिसत आहे. दरम्यान, आज सकाळपासून नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर, उमरी, कंधार, धर्माबाद, माहूर, किनवट तालुक्यांसह इतर भागात पाणीच पाणी दिसत आहे. तर कंधार, हिमायतनगर, किनवट, माहूर, हदगाव या तालुक्यात मुसळधार पावसामुळे राज्य व राष्ट्रीय महामार्गावरील नदीच्या पुलावरुन पाणी वाहत असल्यानं वाहतुकीचाही खोळंबा झाला आहे. तर या मुसळधार पावसामुळं खेड्या पाड्यांना जोडणारे राज्य मार्ग, जिल्हा मार्ग, तालुका मार्ग तसेच अनेक छोटे मोठे रस्ते पाण्याखाली गेल्यानं रस्ते वाहतुकीसाठी बंद झाले आहेत.
नांदेडकडे जाणारी वाहतूक बंद
दरम्यान, पुराच्या पाण्याखाली गेलेल्या रस्त्यावरुन जाण्याचे नागरिक धाडस दाखवत आहे. जीव धोक्यात घालून प्रवास करत आहेत. जिल्ह्यातील नद्यांची पाणी पातळी वाढल्याने, गोदावरी नदीच्याकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सकाळपासून सुरु असलेल्या या मुसळधार पावसामुळं सर्वच रस्ते जलमय झाले आहेत. त्यामुळं नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर, धर्माबाद, बिलोली, किनवट, माहूर, हिमायतनगर, उमरी, कंधार येथून नांदेडकडे जाणारे रस्ते बंद केल्यानं वाहतूक ठप्प झाली आहे.
जूनमध्ये पावसानं दडी मारली होती. मात्र, जुलै महिन्यात पावसानं चांगलाच दोर धरला आहे. या महिन्याच्या सुरुवातीस झालेला पाऊस इतका बरसला की चार महिन्यामध्ये होणारी पावसाची सरासरी दोनच महिन्यात पूर्ण झाली. ज्यामुळं विष्णुपुरी प्रकल्पासह जिल्ह्यातील 36 प्रकल्प तुडुंब भरले आहेत. मात्र, या पावसामुळं शेतीचं अतोनात नुकसान झालं आहे. तर अनेक ठिकाणी रस्त्यांची चाळण झाली आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)