Agriculture News : विद्युत तारांच्या घर्षणातून पाच एकर ऊस जळुन खाक, शेतकऱ्याचं आठ लाख रुपयांचं नुकसान
विद्युत वाहिनीच्या तारांचे एकमेकांवर घर्षण होऊन पडलेल्या ठिणग्यांमुळ पाच एकर ऊस जळून खाक (Sugarcane burned) झाल्याची घटना घडली आहे.
Agriculture News : विद्युत वाहिनीच्या तारांचे एकमेकांवर घर्षण होऊन पडलेल्या ठिणग्यांमुळ पाच एकर ऊस जळून खाक (Sugarcane burned) झाल्याची घटना घडली आहे. ही घटना माढा (Madha) तालुक्यातील बेंबळे इथं घडली आहे. यामध्ये अंदाजे सात ते आठ लाख रुपयांचे नुकसान झालं आहे. सोमनाथ रामचंद्र अटकळे (Somnath Ramachandra atkale) असं नुकसान झालेल्या शेतकऱ्याचं नाव आहे. विशेष म्हणजे ऊस विकास संशोधनचा हा प्लॉट होता. तोच प्लॉट जळून खाक झाला आहे.
मागील तीन ते चार वर्षापासून या वीज वहिनीच्या तारा सैल
शेतकरी सोमनाथ रामचंद्र अटकळे यांचा को-86032 जातीचा खोडवा पक्व झालेला होता. तो डाळप करण्यासाठी कारखान्याकडे तोडून जाण्याच्या तयारीत होता. अशा स्थितीत असलेला ऊस जळून खाक झाल्यानं शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालं आहे. ऊसाच्या वरील बाजूने पंधरा ते सोळा वर्षांपूर्वीपासून बसवलेले विजेचे खांब व तारा आहेत. तीन ते चार वर्षात या वीज वहिनीच्या तारा सैल झाल्या आहेत. त्यामुळं धोकादायक स्थिती निर्माण झाली आहे. अगदी मोठ्याने वारा सुटला किंवा दहा-बारा पक्षी तारेवर बसले तरी त्या तारा एकमेकांना घासून त्याच्या घर्षणाने ठिणग्या पडतात. असाच प्रकार घडून तारांच्या खाली असलेल्या ऊसानं पेट घेतला. यावेळी थोडा वारा पण सुटला होता, त्यामुळं आग भडकत पुढे गेली. या आगीमध्ये सोमनाथ अटकळे यांचा पाच एकर ऊस जळून खाक झाला आहे.
झालेल्या नुकसानीची तातडीनं भरपाई मिळावी, शेतकऱ्याची मागणी
ऊसाला आग लागलेली दिसताच 10 ते 15 तरुणांनी चोहोबाजूंनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. काही वेळानंतर आग आटोक्यात आणली. पण तोपर्यंत पाच एकर ऊस जळून खाक झाला आहे. दरम्यान, सदरचा ऊस हा पाडेगाव ऊस संशोधन केंद्राच्या पुरस्काराच्या यादीत होता. या ऊसाची विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना यांच्याकडे गळीतासाठी नोंदणी केलेली आहे. झालेले नुकसान तातडीने शासनाकडून आम्हाला मिळावं, अशी मागणी अटकळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. किमान आता तरी वीज वितरण कंपनीने आशा धोकादायक बनलेल्या वीज वाहिन्यांची दुरुस्ती तातडीने हाती घ्यावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत. सध्या राज्यात ऊसाचा गळीत हंगाम सुरु आहे. यावर्षी देखील राज्यात ऊसाचं मोठं क्षेत्र आहे. त्यामुळं यंदा देखील साखरेचं विक्रमी उत्पादन होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मात्र, अशा घटना घडल्यामुलं शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.
महत्त्वाच्या बातम्या: