(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Agri Scheme : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटीका विकास योजना नेमकी काय? 2 लाख 77 हजार 500 रुपयांचं अनुदान कुणाला मिळतं?
Agri Scheme :पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटीका विकास योजना महाराष्ट्र सरकारकडून चालवली जाते. या योजनेतून शेतकऱ्यांना रोपवाटीका उभारण्यासाठी अनुदान दिलं जातं.
मुंबई : राज्य सरकारकडून शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध योजना राबवल्या जातात. राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत महाराष्ट्र सरकारनं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटीका विकास योजना सुरु केली आहे. या योजनेचा मूळ उद्देश शेतकऱ्यांचं आर्थिक उत्पन्न वाढवणं आणि भाजीपाला पिकांची दर्जेदार आणि कीडरोग मुक्त रोपं तयार करणे हा आहे. या योजनेतून शेतकऱ्यांना कमाल खर्च रुपये 5 लाख 55 हजार रुपये ग्राह्य धरुन 2 लाख 77 हजार 500 रुपयाचं अर्थसहाय्य केलं जातं.
योजना नेमकी काय?
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटीका विकास योजना ही महाराष्ट्र सराकरकडून चालवली जाते. आपलं राज्य शेतमालाच्या निर्यातीमध्ये देखील अग्रेसर आहे. या निर्यातीत महाराष्ट्रातून उत्पादित होणारा शेतमाल हा चांगल्या गुणवत्तेचा असणं आवश्यक आहे. याशिवाय दर्जेदार आणि कीडमुक्त शेतमाल निर्मितीसाठी शेतकऱ्यांना या योजनेद्वारे प्रयत्न केले जातात. राज्यातील शेतकऱ्यांकडून चांगलं बियाणं आणि चांगल्या रोपांची मागणी वाढलेली आहे. ती पूर्ण करण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटीका विकास योजना फायदेशीर ठरत आहे.
राष्ट्रीय कृषी विकास योजना अंतर्गत पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर रोपवाटिका विकास योजनेद्वारे शेडनेट, पॉलीटनेल, पावर नॅपसॅक स्प्रेयर आणि प्लास्टिक क्रेटस साठी अनुदान देण्यात येते.एक हजार चौरस मीटरच्या शेडनेटची साहित्यासह उभारणीचा खर्च 5 लाख 55 हजार गृहित धरुन 2 लाख 77 हजार 500 रुपये अर्थसहाय्य केलं जातं.
या योजनेचा लाभ कुणाला मिळतो?
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटीका विकास योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या शेतकऱ्याच्या नावे किमान एक एकर म्हणजेच 0.40 हेक्टर जमीन असणं आवश्यक आहे. पाण्याची सोय देखील उपलब्ध असावी लागते. रोपवाटीका योजनेचे लाभार्थी निवडले जातात त्यावेळी महिला कृषी पदवीधारक, महिला गट, महिला शेतकरी द्वितीय, भाजपा उत्पादक, अल्प भूधारक, शेतकरी गट यांना प्राधान्य दिलं जातं.
या योजनेद्वारे अनुदान मंजूर करण्यापूर्वी कृषी सहायक जिथं रोपवाटिका उभारली जाणार आहे त्याची पाहणी करतात. त्यानंतर शेतकऱ्यांना 60 टक्के रक्कम वितरित केली जाते. यानंतर कृषी सहायक रोपवाटीकेतील रोपांची प्रत्यक्ष विक्री आणि इतर गोष्टी झाल्यानंतर दुसऱ्यांदा पाहणी करतात आणि उर्वरित 40 टक्के रक्कम खात्यावर जमा करतात. ही रक्कम आधारशी जोडलेल्या बँक खात्यावर जमा होते.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी https://mahadbt.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करावे लागतात. या योजनेसाठी प्रत्यक्ष अर्ज कधी करायचा याची माहिती या वेबसाईटवर किंवा संबंधित तालुक्यांचे कृषी अधिकारी जाहीर करतात. अर्ज दाखल करणाऱ्या शेतकऱ्यांकडे सातबारा उतारा, ८/अ चा उतारा, आधार कार्ड प्रत , आधार संलग्न खात्याच्या बँक पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स असणं आवश्यक आहे.
इतर बातम्या :
मनोज जरांगेंच्या पोटातलं ओठावर आलं, राजकारण करायचं असेल तर पक्ष काढा, राजेंद्र राऊतांचे प्रत्युत्तर