(Source: ECI/ABP News/ABP Majha)
कांदा प्रश्न पुन्हा पेटणार? केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाचा मोठा निर्णय, कांद्यावर टनामागे 800 डॉलर निर्यातशुल्क 31 डिसेंबरपर्यंत लागू राहणार
राज्यात कांदा प्रश्न पुन्हा एकदा पेटण्याची चिन्हं निर्माण झाली आहेत. कारण वाणिज्य मंत्रालयाकडून प्रत्येक टनामागे 800 डॉलर निर्यातशुल्क आकारण्यात येणार आहे.
नाशिक : कांद्याला (Onion) मागील काही दिवसांपासून चांगला भाव मिळायला सुरुवात झाल्याचं चित्र होतं. पण त्यातच पु्न्हा एकदा केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. कांद्यावर प्रत्येक टनामागे 800 डॉलर निर्यातशुल्क आकरण्यात येईल. 31 डिसेंबरपर्यंत हे निर्यातशुल्क लागू करण्यात येणार आहेत. त्यामुळे आता कुठे शांत झालेला कांद्याचा प्रश्न पुन्हा एकदा पेटण्याची चिन्हं निर्माण झाली आहेत.
निर्यातशुल्क वाढल्याने आपला कांदा बाहेर जाणार नाही, असं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे. तर आपल्याकडील कांद्याचा साठा संपू न देण्यासाठी केंद्राकडून हा निर्णय घेण्यात आल्याची शक्यता निर्माण झालीये. केंद्र सरकारकडून घेण्यात आलेल्या या निर्णयावर कांदा व्यापारी काय निर्णय घेणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.
व्यापाऱ्यांचं म्हणणं काय?
40 टक्के निर्यातशुल्कबाबत केंद्र फेरविचार करेल अशी अपेक्षा असतांना पुन्हा हा दुर्दैवी निर्णय घेण्यात आला, शेतकऱ्यांकडे कांदा शिल्लक नसल्याने भाव वाढले आहेत. केंद्र सातत्याने हस्तक्षेप करतंय. कांद्याला चांगला भाव कसा मिळेल याचा विचार केल्यास तो बाराही महिने टिकू शकेल, असं मत व्यापाऱ्यांनी व्यक्त केलं आहे. त्यामुळे आता व्यापारी आणि शेतकरी कोणती भूमिका घेणार हे पाहणं गरजेचं ठरेल.
कांद्याचे दर पुन्हा घसरणार?
सध्या कांद्याच्या दरात सातत्यानं वाढ होत आहे. याचा शेतकऱ्यांना फायदा होत आहे. मात्र, कांद्याचे दर वाढल्यानं, सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागली आहे. देश पातळीवर सरासरी कांद्याच्या दरात 57 टक्क्यांची वाढ झाल्याचा अहवाल एक दिवसापूर्वी आला होता. वर्षभरापूर्वी या काळात कांद्याचे दर 30 रुपये होता. तोच भाव आता 47 रुपये किलोवर गेला आहे. दरम्यान, या कांद्याच्या दरावर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकारनं काम सुरु केलं आहे. कांद्याचे दर कमी करण्यासाठी सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे.
कांद्याचे भाव का वाढले?
मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, हवामानाशी संबंधित कारणांमुळे खरीप कांद्याच्या पेरणीला उशीर झाल्यामुळं पीक कमी झाले. हे पीक बाजारात यायला उशीर झाला. सध्या खरीप कांद्याची आवक सुरु व्हायला हवी होती, मात्र तसे झाले नसल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली. साठवलेला रब्बी कांदा संपल्याने आणि खरीप कांद्याची आवक होण्यास उशीर झाल्यामुळं पुरवठ्याची स्थिती बिकट झाली आहे. त्यामुळं घाऊक आणि किरकोळ बाजारात भाव वाढत आहेत.
हेही वाचा :
Onion : कांद्याचे दर घसरणार? शेतकऱ्यांना फटका बसणार, सरकारनं घेतला 'हा' मोठा निर्णय