(Source: ECI/ABP News/ABP Majha)
पावसाने आणले बळीराजाच्या डोळ्यांत पाणी, बारामतीत पावसाने दडी दिल्याने पेरूच्या उत्पादनात घट
पेरूची बाग लावल्यानंतर दीड वर्षानंतर उत्पादनाला सुरुवात झाली. पहिल्याच वर्षी व्हीएनआर मधून 15 टन उत्पादन तर तैवान मधून बारा टन पेरूचे उत्पादन घेतले.
पुणे : राज्यातील काही भागात पावसाने दडी मारल्याने त्यामुळे शेतकऱ्यांसमोर संकटाचा डोंगर उभा ठाकला आहे. राज्यात अनेक जिल्ह्यात दुष्काळाची चिन्हे दिसू लागली असून जिल्ह्यातील महिन्याभरापासून पाऊस बरसलेला नाही. त्यामुळे पावसाने मारलेली दडी आणि दुष्काळाची टांगती तलवार अशा दुहेरी संकटामध्ये बळीराजा (Farmers) सापडला आहे. यंदा पावसाने दडी दिल्याने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. बारामती तालुक्यातील डोर्लेवाडी येथील शेतकरी रवींद्र चव्हाण यांच्या बागेला याचा फटका बसला आहे. यंदाच्या वर्षी जवळपास 20 ते 30 टन उत्पादन कमी मिळणार आहे. तसेच पाऊस नसल्याने पेरूला (Guava) दर नसल्याचे चव्हाण सांगतात. त्यामुळे तोटा सहन करावा लागणार आहे.
यापूर्वी चव्हाण हे पारंपारिक शेती करत होते. त्यानंतर ते फळबागाकडे वळाले त्यांनी सुरुवातीला डाळिंबांची बाग लावली मात्र तेल्या आणि मर रोगाने डाळिंब हे पीक त्यांचे वाया गेल्याने त्यांनी डाळिंबाचे संपूर्ण पीक उपटून टाकली आणि पेरूची लागवड केली. यामध्ये 1800 रोपे व्हिएनआर तर 1200 रोपे तैवान पिकांची लागवड केली. पेरूची बाग लावल्यानंतर दीड वर्षानंतर उत्पादनाला सुरुवात झाली. पहिल्याच वर्षी व्हीएनआर मधून 15 टन उत्पादन तर तैवान मधून बारा टन पेरूचे उत्पादन घेतले. पहिल्या वर्षी चव्हाण यांना खर्च वजा जाता सात ते आठ लाख रुपयांचा नफा मिळाला. दुसऱ्या वर्षी व्ही एन आर 30 टन तर तैवानच्या बागेमधून 20 टन पेरूचे उत्पादन मिळाले. त्यातून त्यांना 10 ते 12 लाख रुपयांचे निव्वळ नफा मिळाला. मात्र यावर्षी पावसाने पाठ फिरवली आहे चव्हाण यांना 60 ते 70 टन उत्पादनाची अपेक्षा होती. मात्र आता फक्त 40 टन उत्पादन मिळणार आहे. कमी उत्पादन मिळाल्यानं 4 ते 5 लाखांचा तोटा होणार असल्याचे चव्हाण सांगतात.
पावसाने पाठ फिरवली उत्पादन घटले
मुरमाड जमिनीवर चव्हाण यांनी पेरुचे नंदनवन फुलवले आहे. यंदाच्या वर्षी चव्हाण यांना पेरुतून चांगले उत्पादन मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र पावसाने पाठ फिरवली उत्पादनही घटले आणि पेरुचे दर देखील कमी झाले. त्यामुळे चव्हाण यांचे दुहेरी नुकसान झालं आहे.. चव्हाण यांच्या प्रमाणे अनेक शेतकऱ्यांची हीच व्यथा आहे.
15 जिल्ह्यात पावसाच्या सरासरीत मोठी तूट
राज्यातील 15 जिल्ह्यात पावसाच्या सरासरीत मोठी तूट निर्माण झाली आहे. सरासरीच्या उणे 20 टक्क्यांहून अधिक तूट आहे. ऑगस्ट महिन्यात पावसाने पाठ फिरवल्यानंतर, सगळ्यांचे डोळे आभाळाकडे लागले आहेत. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होण्याची चिन्ह आहेत. 1 जूनपासून जालन्यात फक्त 54 टक्के पाऊस, सांगली जिल्ह्यात फक्त 56 टक्के पाऊस, अमरावतीत सरासरीच्या फक्त 69 टक्के पाऊस झाला आहे. ऑगस्ट महिन्यात पावसाने पाठ फिरवल्यानंतर, सगळ्यांचे डोळे आभाळाकडे लागले आहेत. पावसाअभावी शेतकऱ्यांची पिकं माना टाकू लागली आहेत. त्यामुळ आता पावसाची गरज आहे, अन्यथा पाणीटंचाईची समस्या निर्माण होऊ शकते. कमी पावसामुळं राज्यात दुष्काळाची चाहूल लागली आहे. पिण्याच्या पाण्याबरोबरच चाऱ्याचा प्रश्न देखील निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
हे ही वाचा :