घरगुती मसाले तयार करण्याच्या हंगामात मिरचीचे दर गगनाला, किलोमागे 50 ते 60 रुपयांची दरवाढ
Maharashtra News : रोजच्या फोडणीतील महत्वाचा घटक असलेल्या लाल मिरचीची किंमत 50 ते 100 रूपयांनी वाढल्याने लोकांना या वर्षी मसाला अधिक तिखट लागणार आहे
मुंबई : यंदा मिरचीमुळे चांगलाच ठसका लागण्याची शक्यता आहे. कारण मिरचीचे दर सर्वसामान्यांच्या खिशाला झोंबण्याची शक्यता आहे. यंदा किलोमागे मिरची 50 ते 100 रुपयांनी महाग झाली आहे. मिरचीवर आलेली रोगराई आणि त्यात अवकाळी पावसाचा फटका याचा विपरीत परिणाम झाल्यानं यंदा मिरचीचं उत्पादन घटलंय परिणामी मिरची महाग झालेली आहे. सध्या मिरचीप्रमाणे इतर मसाला पिकंही महागली आहे.
रोजच्या फोडणीतील महत्वाचा घटक असलेल्या लाल मिरचीची किंमत 50 ते 100 रूपयांनी वाढल्याने लोकांना या वर्षी मसाला अधिक तिखट लागणार आहे. गेल्या वर्षी आलेली अनेक वादळे आणि अवकाळी पावसामुळे याचा मोठा फटका लाल मिरचीला बसला आहे. देशामध्ये सर्वाधिक लाल मिरचीचे उत्पादन आंध्रप्रदेश आणि कर्नाटक राज्यात होत असते. आंध्र प्रदेश मधील गुंटूर शहरात जगातील सर्वात मोठी मिरचीची बाजारपेठ आहे.
दिवाळी दरम्यान मिरचीचे उत्पन्न काढण्याचा मौसम असतानाच पडलेल्या पावसामुळे आलेले मिरची पिक वाया गेले. उत्पन्न कमी झाल्याने नवी मुंबईत एपीएमसी मार्केटमध्ये आठवड्याला 50 ते 60 हजार गोणी मिरचीची असणारी आवक आता 35 ते 40 हजार गोण्यांवर आली आहे. त्यामुळे मिरचीचे भाव गगनाला भिडू लागले आहेत. कर्नाटकमधून येणारी कश्मिरी मिरची 350 वरून 450 रूपये किलोवर गेली आहे. ही मिरची चवीला कमी तिखट असून लाल रंग गडद असल्याने हॉटेलमध्ये जास्त वापरली जाते. बेडगी मिरची 250 रूपयांवरून 300 रूपयांवर पोहचली आहे. आंध्रप्रदेश मधून आवक होणारी तेजा आणि पांडी मिरची 190 ते 210 रूपये किलो तर डीडी मिरची 150 रूपांवरून 220 वर गेली आहे.
संबंधित बातम्या :
Russia Ukraine War : युक्रेन-रशिया युद्धाचा भारतीयांना फटका; 'या' गोष्टी महागण्याची शक्यता, खाद्यतेलाचा साठा करण्यात गुंतले लोक
Onion Export : सरकारने कांदा निर्यातीला प्रोत्साहन द्यावं, कांदा उत्पादक शेतकरी संघटनेची मागणी