(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra Rain : मुंबईसह पुणे जिल्ह्यात पावसाची हजेरी, राज्यात शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा कायम
मुंबईसह उपनगरात पावसानं चांगलीच हजेरी लावली आहे. या पावसामुळं मुंबईकरांना उष्णतेपासून दिलासा मिळाला आहे. तर दुसरीकडं पुणे जिल्ह्यातही पावसानं चांगलीच हजेरी लावली आहे.
Maharashtra Rain : सध्या राज्यात काही ठिकाणी पाऊस पडत आहेत. तर काही ठिकाणी अद्याप पावसाची प्रतीक्षा कामय आहे. शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. पाऊस नसल्यामुळं पेरण्या रखडल्या आहेत. दरम्यान, मुंबईसह उपनगरात पावसानं चांगलीच हजेरी लावली आहे. या पावसामुळं मुंबईकरांना उष्णतेपासून दिलासा मिळाला आहे. तर दुसरीकडं पुणे जिल्ह्यातही पावसानं चांगलीच हजेरी लावली आहे. पिंपरी चिंचवड शहरात चांगलाच पाऊस झाला आहे. पाणी कपातीचं संकट दूर करण्यासाठी आणखी पावसाची गरज आहे. तसेच रत्नागिरी जिल्ह्यातही पावसानं चांगली हजेरी लावली आहे.
आत्तापर्यंत केवळ 134 मिलीमीटर पाऊस
सध्या राज्यात काही ठिकाणीच चांगला पाऊस झाला आहे. मात्र, अद्याप अनेक ठिकाणी पावसानं दडी मारली आहे. त्यामुळं शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. असमाधानकारक पाऊस झाल्यानं पेरण्या खोळंबल्या आहेत. गेल्या वर्षी राज्यात आजच्या घडीला सरासरी 270 मिलीमीटर पाऊस झाला होता. त्या तुलनेत यंदा मात्र केवळ 134 मिलीमीटर पाऊस झाला आहे. खरीप हंगामाबाबतचा आढावा मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. यावेळी ही माहिती देण्यात आली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रीमंडळाची महत्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत खरीप हंगामाचा आढावा घेण्यात आला. गतवर्षी आजच्या दिवशी पेरण्या पूर्ण झाल्या होत्या. यंदा मात्र खरीपाखालील क्षेत्रापैकी केवळ 13 टक्केटच म्हणजे 20.30 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. शेतकरी पेरणीसाठी पावसाची वाट बघत आहेत. त्यामुळं राज्यातील शेतकरी चिंतेत आहेत.
पेरणीसाठी शेतकरी चांगल्या पावसाची वाट बघत आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. एकीकडं हवामान खात्याकडून भाकितांचा पाऊस पडतोय, तर दुसरीकडं राज्यभरात अनेक ठिकाणी पावसाअभावी पेरणी रखडली आहे. मान्सूननं महाराष्ट्र व्यापल्याचं हवामान खात्यानं जाहीर केलं असलं तरी प्रत्यक्षात राज्यभरात पावसाची प्रतीक्षा आहे. पावसानं दडी मारल्यानं शेतकऱ्यांना पेरणीची तिफण गोठ्यातच ठेवावी लागली आहे. राज्यात खरीप हंगामातील तृण धान्याखालील क्षेत्र 36 लाख 37 हजार हेक्टरपर्यंत आहे. तर तेलबियांचे (भुईमूग, तीळ, कारळ, सुर्यफूल, सोयाबीन) क्षेत्र 41 लाख 58 हजार हेक्टर तर कापसाचं क्षेत्र जवळपास 42 लाख हेक्टरपर्यंत आहे.
75 ते 100 मिलीमीटर पाऊस झाल्यानंतरच शेतकऱ्यांनी पेरणी करावी
दरम्यान, जमिनीत चांगली ओल झाल्यावर म्हणजे 75 ते 100 मिलीमीटर पाऊस झाल्यानंतरच शेतकऱ्यांनी पेरणी करावी. प्रती हेक्टरी बियाणे प्रमाण 75 किलो ग्रॅमवरून 50 ते 55 किलोग्रॅमवर आणण्यासाठी टोकण पद्धतीने किंवा प्लँटरचा वापर करुन पेरणी करावी. सोयाबीनची उगवण क्षमता 70 टक्क्यांपेक्षा कमी असल्यास उगवण क्षमतेच्या प्रमाणात अधिकचे बियाणे पेरणीसाठी वापरण्यात यावे असे आवाहन कृषी आयुक्त धीरज कुमार यांनी केलं आहे. पेरणीपूर्वी बियाणास बीजप्रक्रिया करणे उपयुक्त ठरते. प्रति किलो बियाण्यास 3 ग्रॅम थायरमची बुरशीजन्य रोगांपासून संरक्षणासाठी बीजप्रक्रिया करावी. रायझोबियम व पीएसबी जिवाणू संवर्धकाची प्रत्येकी 200 ते 250 ग्रॅम प्रति 10 ते 15 किलो बियाण्यास पेरणीपूर्वी तीन तास अगोदर बीजप्रक्रिया करुन बियाणे सावलीत वाळवावे. त्यानंतरच त्याची पेरणी करावी. बियाण्याची पेरणी 3 ते 4 सेंटीमीटर खोलीपर्यंत करावी, असेही त्यांनी म्हटले आहे.