Latur: बांबू लागवड ते वस्तूंची निर्मिती, शेती क्षेत्रात अमुलाग्र बदल; लातूरमधील प्रयोगाचं केंद्राकडून कौतुक
लातूर जिल्ह्यातील (Latur News) लोदगा सारख्या ग्रामीण भागात बांबू रोपाची निर्मिती, लागवड त्यानंतर बांबूपासून तयार होणाऱ्या विविध वस्तूंची निर्मिती होत आहे.
Latur News Updates: बांबू प्रकल्प (Bamboo Prakalp) पर्यावरणपूरक असून ग्रामीण रोजगार निर्मितीसाठी सहाय्यक आहे. लातूर जिल्ह्यातील (Latur News) लोदगा सारख्या ग्रामीण भागात बांबू रोपाची निर्मिती, लागवड त्यानंतर बांबूपासून तयार होणाऱ्या विविध वस्तूंची निर्मिती होत आहे. हे नक्कीच दिशादर्शक आणि शेती क्षेत्रात अमुलाग्र बदल करणारी घटना आहे असं म्हणत केंद्र सरकारच्या ग्रामविकास मंत्रालयाचे सचिव नागेंद्रनाथ सिन्हा यांनी या प्रकल्पाचं कौतुक केलं आहे.
सध्याला जगात विविध कारणाने रोजगानिर्मितीच्या संधी कमी असल्याची ओरड होत आहे. पण ग्रामीण भागात बांबूपासून शेतीत फायदा होत आहे. तर बांबूपासून विविध वस्तूच्या निर्मितीमुळे ग्रामीण भागात रोजगार निर्मितीसाठी सहाय्यक असल्याचे मत नागेंद्रनाथ सिन्हा यांनी व्यक्त केले आहे
लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील लोदगा इथ शेतकरी नेते पाशा पटेल यांच्या बांबू प्रकल्पास केंद्र सरकारच्या ग्रामविकास मंत्रालयाचे सचिव नागेंद्रनाथ सिन्हा यांनी भेट देऊन पाहणी केली आहे. यावेळी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी पी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल आदी मान्यवर उपस्थित होते.
गावखेडी आर्थिक दृष्टीने बळकट करण्यास बांबू व्यवसाय फायदेशीर
जगात अनेक ठिकाणी पर्यावरणाच्या समस्या निर्माण होत आहेत. बांबू पासून शेतीत फायदा आणि त्यापासून जीवनावश्यक वस्तूंची निर्मिती केली तर गरीब कुटुंब असो की श्रीमंत कुटुंब यांना लागणाऱ्या वस्तू उत्पादित करता येतात. लोदगासारख्या छोट्याश्या गावात बांबू पासून अत्यंत दर्जेदार बांबू वस्तूच्या निर्मिती होत आहे. श्रीमंत लोकांना आवडणाऱ्या बांबू वस्तूला देशासह परदेशात मागणी असल्याने ग्रामीण अर्थकारणाला मोठी चालना मिळू शकते असा विश्वास व्यक्त केला आहे सोबतच ग्रामीण भागात रोजगार उपलब्ध होत असून गावखेडी आर्थिक दृष्टीने बळकट करण्यास बांबू व्यवसाय फायदेशीर असल्याचे मत नागेंद्रनाथ सिन्हा यांनी व्यक्त केले आहे.
महिलांना मोठ्या प्रमाणात मिळतोय रोजगार
याच भागातील 25 पेक्षा जास्त महिलांनी बांबूपासून विविध वस्तू निर्माण करण्याचे प्रशिक्षण घेतलं आहे. तीन महिन्याच्या प्रशिक्षणामध्ये बांबू पासून खुर्च्या ,टेबल, आराम खुर्ची ,टीपॉय, नाईटलॅंम्पची आवरणे, विविध सजावटीच्या वस्तू निर्माण करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. तीनशे ते साडेतीनशे रुपये प्रमाणे मजुरी त्यांना आता मिळत आहे. या वस्तूंना बाजारपेठेत उत्तम मागणी आहे. याच गतीने ही मागणी वाढत जाण्याची शक्यता आहे आणि त्यासाठी बांबूंची खूप आवश्यकता असणार आहे. शेतकऱ्यांना बांबू शेती केल्यास ऊसाला एक पर्याय निर्माण होईल आणि शाश्वत पैसे मिळतील. त्यामुळे शेतकऱ्यांनी आता बांबूच्या शेतीकडे वळावे, असेही त्यांनी सांगितले.
लातूरसारख्या भागांमध्ये हे सर्व होत आहे हे पाहून निश्चित आनंद होत आहे. भारतात विविध ठिकाणी जर अशी केंद्रं झाली तर रोजगार निर्मिती उत्तम स्वरूपाची होईल असा विश्वासही नागेंद्रनाथ सिन्हा यांनी व्यक्त केला.
इतर महत्वाच्या बातम्या