Hapus News : आता कोकणचा 'हापूस' वर्षभर चाखता येणार, गणेशोत्सवात आंबा उपलब्ध, डझनला मिळतोय 1 हजार 200 चा दर
कोकणातील जगप्रसिद्ध अशा हापूस आंब्याची (Hapus Mango) चव आता वर्षभर चाखता येणार आहे. ऐन गणेशोत्सवात खवय्यांसाठी हापूस आंबा उपलब्ध झाला आहे.
Hapus News : आंबा खवय्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कोकणातील जगप्रसिद्ध अशा हापूस आंब्याची (Hapus Mango) चव आता वर्षभर चाखता येणार आहे. ऐन गणेशोत्सवात खवय्यांसाठी हापूस आंबा उपलब्ध झाला आहे. अशी किमया सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्यातील सावंतवाडी जवळील नेमळे गावातील आंबा व्यावसायिक गुरुप्रसाद नाईक (Guruprasad Naik) यांनी केली आहे. त्यांनी कोल्ड स्टोरेजमध्ये नैसर्गिकरित्या पिकलेलल्या आंब्याची साठवणूक केली आहे. त्यामुळं वर्षभर हवा तेव्हा आता हापूसची चव चाखता येणार आहे.
नैसर्गिकरित्या पिकलेला आंबा कोल्ड स्टोरेजमध्ये विशिष्ट तापमानाला साठवून ठेवला तर तो वर्षभर टिकतो. त्यासाठी गुरुप्रसाद नाईक यांनी गेली दोन वर्ष प्रयत्न केले. त्या प्रयत्नांना यश देखील मिळत आहे. आता शासनाने कोकणातील आंबा बागायदारांना अशा प्रकारे कोल्ड स्टोरेज करण्यासाठी व्यवस्था करुन दिल्यास आंबा बागायदारांना वर्षभर रोजगार सुध्दा मिळेल. आंबा खवय्यांना चव देखील चाखता येईल.
महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, केरळ, गोव्यातही आंब्याची खरेदी
ऐन गणेशोत्सवाच्या काळात गुरुप्रसाद नाईक यांनी हापूस आंबे विक्रीसाठी ठेवले आहेत. त्यामुळं गणेश चतुर्थीत आपल्या लाडक्या बाप्पाला कोकणचा फळांचा राजा असलेला हापूस आंबा नैवद्य म्हणून ठेवला जातो आहे. तर काही जण आबा ज्युस, आंब्याचं रायत बनवून त्याची चव चाखली जात आहे. 3 महिने मिळणारा देवगड हापूस आता गणेशोत्सवात मिळत असल्यानं गणेशभक्त आनंदात आहेत. अशा प्रकारे हापूस आंबा साठवून ठेवल्यानंतर देखील त्याची चव आणि रंगात कोणताही फरक पडत नाही. गुरुप्रसाद नाईक यांनी मे महिन्यात कोल्ड स्टोरेजमध्ये आंबा ठेवून ऐन गणपती सणाला आंबा विक्री गणेशभक्तांना उपलब्ध करुन दिला आहे. हा हापूस आंबा संपूर्ण महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, केरळ, गोवा यासह देशभरात बऱ्याच ठिकाणी खास गणेश चतुर्थीला गणपतीचा नैवेद्य ठेवण्यासाठी विकत घेतला जात आहे.
डझनाला किमान 1 हजार 200 रुपयांचा दर
कोकणातला आवडता सण म्हणजे गणेश चतुर्थी. हजारो चाकरमानी या सणाला कोकणात दाखल झाले आहेत. कोकणचा फळांचा राजा हापूस आंबा हा गणेश चतुर्थीला उपलब्ध होत असल्यानं आंबा खवय्ये हापूस आंब्याची चव चाखत आहेत. येरवी मे महिन्यात आंब्याचा सीजन संपल्यानंतर पावसाळ्यात कोणत्या प्रकारचा सिझन नसताना हा आंबा कोल्ड स्टोरेजमध्ये स्टोरेज करून गणेश चतुर्थीत उपलब्ध करुन दिला जात आहे. आंबा व्यवसायिक गुरुप्रसाद नाईक यांची सुमारे 300 एकर आंब्याची बाग आहे. या बागेत ते नैसर्गिक पद्धतीचा आंबा पिकवतात. मे महिन्याच्या त्यांनी अडीच हजार डझन हापूस आंबे कोल्ड स्टोरेजमध्ये स्टोरेज करुन ठेवले होते. पिशवीमध्ये अतिशय सीताफिनं बांधून हा आंबा ठेवून आता 90 दिवसांनी गणेश चतुर्थीला त्यांचा हा हापूस आंबा जिल्ह्यासह बाहेरच्या आंबा खवय्यांना चाखता येत आहे. डझनाला किमान 1 हजार 200 रुपयांचा दर मिळत असल्याने चांगला फायदा होत असल्याचे गुरुप्रसाद नाईक यांनी सांगितले. परंतु कोल्ड स्टोरेजसाठी मोठ्या प्रमाणात लाईट बिल येते, हे परवडणारे नाही. बऱ्याचवेळा लाईट गेल्यास जनरेटरचा वापर करावा लागतो. शासनाने सबसीडी दिल्यास आणि सुविधा उपलब्ध करून दिल्यास हा प्रयोग कोकणात यशस्वी होईल
कोल्ड स्टोरेज सिस्टीम उपलब्ध झाल्यास वर्षभर आंबा मिळणार
कोकणात हापूस आंब्याचे उत्पादन फेबुवारी, मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात मोठ्या प्रमाणात घेतले जाते. मात्र हा आंबा स्टोरेज सिस्टिम नसल्याने आंबा सिझन संपला की आंबा मिळत नाही. मात्र अशा पद्धतीने कोल्ड स्टोरेज सिस्टीम उपलब्ध झाली आणि नैसर्गिकरित्या आंबा उपलब्ध करण्यासाठी अत्याधुनिक पद्धत वापरली तर भविष्यात वर्षभर कोकणातील हापूस देशभरातील आंबे खवय्यांना चाखता येईल.
महत्त्वाच्या बातम्या: