Maharashtra Rain Live Updates : राज्यात पावसाचा जोर कमी, जाणून घ्या पावसासंदर्भातील प्रत्येक अपडेट्स एका क्लिकवर...
Maharashtra Rain Live Updates : राज्यात पावसाचा जोर कमी झाला आहे. मुबईसह परिसरात पावसानं हजेरी लावल्याचे पाहायला मिळालं.
LIVE
Background
Maharashtra Rain Live Updates : राज्यात पावसाचा जोर कमी झाला आहे. मात्र, काही भागात चांगला पाऊस (Rain) कोसळताना दिसत आहे. मुंबईसह ठाणे परिसरात पावसानं चांगलीच हजेरी लावली. त्याचबरोबर नाशिक (Nahsik) जिल्ह्यातही पावसानं धुमाकूळ घातला आहे. नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. तसेच गोदावरी नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाल्यानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. त्याचबरोबर अहमदनगर आणि पुणे जिल्ह्यातही चांगला पाऊस झाला आहे. दरम्यान, आजपासून पुढील दोन दिवस कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्रात पावसाचा जोर काहीसा कमी होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
सध्या राज्यात पावासाचा जोर कमी झाला आहे. मात्र, काही ठिकाणी पाऊस पडत आहे. पुढील दोन दिवस राज्यात पावसाचा जोर कमी राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. मात्र, त्यानंतर राज्यातील काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवली आहे. राज्यात पहिल्या आठवड्यानंतर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
नाशिकमध्ये जोरदार पावसाची हजेरी
नाशिक शहरासह जिल्ह्यात दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस (Heavy Rain) बरसत आहे. नाशिक जिल्ह्यातील सिन्नर (Sinner) तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस होऊन तब्बल 165 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. शिवाय या पावसात हजारो हेक्टर वराळ पिके पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे.
दडी मारलेल्या पावसाने गेल्या तीन दिवसांपासून जोरदार हजेरी लावत नागरिकांची दाणादाण उडवली आहे. त्यामुळं पुन्हा एकदा नाशिक शहरासह जिल्झ्यातील काही भागात नदी नाल्यांच्या पाणी साठ्यात मोठी वाढ झाली. तर नाशिकच्या सिन्नर तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने रस्त्यांना नद्यांचं स्वरुप आलं आहे. तसेच बाजारपेठांमध्ये देखील पाणी शिरल्यानं जनजीवन विस्कळीत झालं आहे. दरम्यान, सलग तिसऱ्या दिवशी पाऊस कोसळल्याने शहरातील अनेक गणेश मंडळांची (Ganesh Mandal) देखाव्यांची कामे रखडली आहेत. तर भक्तांचाही हिरमोड झाला आहे. पुढील काही दिवस पावसाने विश्रांती घ्यावी आणि गणेशोत्सव (Ganeshotsav) उत्साहात साजरा करू द्यावा, असेच बाप्पाकडे साकडे मंडळ पदाधिकाऱ्यांकडून घातले जाते आहे.
पारनेर तालुक्यातील मांडओहोळ धरण 100 टक्के भरलं
अहमदनगर जिल्ह्यातील मागील तीन ते चार दिवसांत झालेल्या दमदार पावसामुळं पारनेर तालुक्यातील मांडओहोळ धरण 100 टक्के भरलं आहे. मांडओहोळ धरण भरल्याने पारनेर तालुक्यातील शेतकरी वर्गासह पारनेर वासियांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. गणेशोत्सव काळात धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने पर्यटकांमध्ये उत्साह संचारला आहे. धरण भरल्यानं संपूर्ण पारनेर तालुक्याची तहान भागणार आहे. मांडओहळ मध्यम प्रकल्पाची एकूण साठवण क्षमता 399 दशलक्ष घनफुट तर उपयुक्त साठा 310 दशलक्ष घनफुट आहे. यावर्षी पळसपूर, नांदूर पठार, सावरगाव, कर्जुले हर्या परिसरासह लाभक्षेत्रात जोरदार पाऊस झाल्यामुळं धरण भरले आहे. मांडओहळ धरणामुळे पारनेर तालुक्यातील शेतीच्या पाण्यासोबत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न काही प्रमाणात सुटणार आहे. तसेच हे धरण भरल्यामुळे नगर आणि पुणे जिल्ह्यातील पर्यटकांसाठी ही पर्वणीच ठरणार आहे.