Wheat News : गहू निर्यातबंदीचा निर्णय शेतकऱ्यांची गळचेपी करणारा, राजू शेट्टींचा सरकारवर निशाणा
केंद्र सरकारने गव्हाच्या निर्यातीवर सशर्त बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी टीका केली आहे.
Raju Shetti on wheat : देशांतर्गत बाजारात गव्हाच्या किंमतीत वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने गव्हाच्या निर्यातीवर सशर्त बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. देशांतर्गत बाजारात गव्हाच्या वाढलेल्या किंमतीमुळे सरकारने हा निर्णय घेतला आहे. मात्र, या निर्णयावर शेतकरी नेत्यांनी जोरदार टीका केली आहे. शेतकऱ्यांची गळचेपी करणारा हा सरकारचा निर्णय असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी म्हटले आहे. शेतकऱ्यांच्या शेतमालाला चांगला दर मिळण्याची संधी असताना सुद्धा सरकारी धोरणामुळे शेतकऱ्यांना फटका बसत असल्याचे शेट्टी म्हणाले.
नेमकं काय म्हणाले राजू शेट्टी ?
रशिया-युक्रेन युद्धानंतर आतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये अन्नधान्याचे दर वाढले. दरवर्षी 104 लाख टन उत्पादित होणार गहू यावर्षी 111 लाख टनापर्यंत उत्पादित होऊन निर्यातीसाठी चांगली संधी निर्माण होईल असे भाकित भारत सरकारने केले होते. दोन दिवसापूर्वी परत केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने गहू निर्यातीसंबंधी जाहीरात केली होती. आंतरराष्ट्रीय बाजारात चांगली तेजी आल्याने शेतकऱ्यांना चांलगा पैसा मिळत होता. हे सरकारला पाहवलं नाही, आणि त्यामुले उत्पादन कमी झाल्याचे खोटे कारण देऊन सरकारने गहू निर्यातीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतल्याचे राजू शेट्टी म्हणाले. दरवर्षी अन्नदात्याने कष्टाने पिकवलेला गहू गोदामांमध्ये सडवला जातो. दारु, इथेनॉल तयार करायला कवडीमोल भावाने दिला जातो. शेतकऱ्यांच्या शेतमालाला चांगला दर मिळण्याची संधी असताना सरकारी धोरणांनी त्यांची गळचेपी केली जात असल्याचे म्हणत शेट्टींनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.
दरम्यान, देशाची एकूण अन्न सुरक्षेचं व्यवस्थापन करण्यासाठी आणि शेजारी तसेच इतर असुरक्षित देशांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी सरकारकडून हे पाऊल उचलण्यात आलं आहे. भारत सरकार शेजारी आणि इतर असुरक्षित विकसनशील देशांच्या अन्न सुरक्षेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी वचनबद्ध आहे. केंद्र सरकारनं नव्या आदेशात म्हटलं आहे की, जागतिक बाजारात गव्हाच्या किंमतीत अचानक वाढ झाली आहे, परिणामी भारत आणि शेजारी राष्ट्रंची अन्नसुरक्षा धोक्यात आली आहे. रशिया आणि युक्रेनमध्ये सुरु असलेल्या युद्धाचा परिणाम जागतिक बाजारपेठेवर होत आहे. रशिया आणि युक्रेनच्या संघर्षामुळे गव्हाच्या आंतरराष्ट्रीय किमतीत सुमारे 40 टक्क्यांनी वाढ झाली आहे. परिणामी भारतातून गव्हाची निर्यात वाढली आहे. गव्हाची मागणी वाढल्याने स्थानिक पातळीवर गहू आणि गव्हाच्या पिठाच्या दरात मोठी वाढ झाली आहे.
महत्वाच्या बातम्या:
- Wheat Export Ban : भारतात गव्हाच्या निर्यातीवर सशर्त बंदी, वाढत्या किमतीमुळे सरकारचा मोठा निर्णय
- MP Wheat Procurement : सरकारनं गव्हाच्या निर्यातीवर निर्बंध घातल्यानंतर मध्य प्रदेश सरकारचा मोठा निर्णय, 31 मे पर्यंत करणार गहू खरेदी