Shiv Sena UBT on Jain Muni: जैन मुनींची उद्धव-राज यांच्यावर विखारी टीका, आता ठाकरे गटाच्या नेत्याचा थेट इशारा; म्हणाले, मुनी असाल तर...
Shiv Sena UBT on Jain Muni: जैन मुनी निलेशचंद्र विजय यांनी उद्धव ठाकरे, आणि राज ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली होती.

Shiv Sena UBT on Jain Muni: संपूर्ण लालबाग परिसरात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचं राज्य आहे. कुठल्याही नेत्याला तुम्ही फोन करा. माझ्या बिल्डिंगमध्ये प्रॉब्लेम झाला आहे, ते येणार नाहीत. आमदार त्यांचे, खासदार त्यांचे, नगरसेवक त्यांचेच आणि चापट मारून तुम्हाला मतदान करायला सांगतील हे लक्षात ठेवा, असे म्हणत जैन मुनी निलेशचंद्र विजय (Nileshchandra Vijay) यांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर केला. तर, जसं चिकनच्या नादाला लागून शिवसेना गेली, तसं तुम्ही पण झिरो व्हाल, अशी टीका त्यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावर केली. आता यावरून शिवसेना ठाकरे गटाचे नेते अखिल चित्रे (Akhil Chitre) यांनी जैन मुनींवर जोरदार हल्लाबोल केलाय.
ठाकरे गटाचे नेते अखिल चित्रे यांनी जैन मुनींचा एक व्हिडीओ शेअर करत म्हटले आहे की, पहिलं, महाराष्ट्रात प्रत्येकाला काय खायचं ते ठरवण्याचा अधिकार आहे. त्यावर बोलण्याचा तुम्हाला अधिकार नाही आणि शिवसेनेने देरासरसमोर चिकन शिजवलं नव्हतं. मुनी असाल तर खोटं बोलणं पाप आहे, हे लक्षात ठेवा. दुसरं, "शिवसैनिक जैन मतदारांना मारहाण करतात" हा आरोप सरळसरळ खोटा आहे. आमचे खासदार, आमदार, नगरसेवक प्रत्येक मुंबईकराची सेवा करतात, धर्म-जात न पाहता आणि हो, विलेपार्ल्यातला जैनालय नेमका कुणामुळे वाचला? तो तोडला जात होता तेव्हा कुणाचं सरकार होतं? याचाही जरा मागोवा घ्या, असा पलटवार त्यांनी केलाय.
Shiv Sena UBT on Jain Muni: लालबागमध्ये ‘हिंदू–बांगलादेश’ असा विषय उकरून काढण्याचा हेतू
अखिल चित्रे म्हणाले की, आमचं स्वप्न मुंबई शांत, सुरक्षित आणि शाश्वत विकासाच्या मार्गावर राहावी, हेच आहे. पण, भाजपाला ते नको. मराठी विरुद्ध गुजराती, उत्तर भारतीय, हिंदी भाषिक असे सर्व प्रयत्न फसल्यावर आता त्यांनी दोन समाजांमध्ये तणाव निर्माण करण्याचा नवा डाव टाकला आहे. यासाठीच एका तथाकथित जैन मुनीला पुढे करून मुंबईचं वातावरण गढूळ करण्याचं राजकारण सुरू आहे. हिंसाचाराला चिथावणी देणं हे जैन तत्त्वज्ञानात मुळीच बसत नाही. हिंदू-मुस्लिम तणाव वाढवणारी भाषा आणि लालबागमध्ये ‘हिंदू–बांगलादेश’ असा विषय उकरून काढण्याचा हेतू स्पष्ट आहे, असा आरोप त्यांनी यावेळी केलाय.
Shiv Sena UBT on Jain Muni: चिथावणीखोर ‘जैन मुनी’मागचा खरा बोलविता धनी कोण?
इतकीच देशसेवा असेल तर सीमासुरक्षेबाबत अमित शाहांनाच विचारणा करा. माझी जैन बांधवांना विनंती आपण मुंबईत शांततेनं राहतो. जर कुणी जैन धर्माचा वापर करून वाद पेटवीत असेल तर वेळीच थांबवा. भाजपाचं सूत्र स्पष्ट ‘use and throw’. आज वापरतील, उद्या वादाच्या तोंडाशी तुम्हालाच सोडून देतील. म्हणून या चिथावणीखोर ‘जैन मुनी’मागचा खरा बोलविता धनी कोण, हे ओळखा आणि मुंबईची शांतता बिघडवू पाहणाऱ्या घटकांना रोखा, असे देखील अखिल चित्रे यांनी म्हटले आहे.
पहिलं,महाराष्ट्रात प्रत्येकाला काय खायचं ते ठरवण्याचा अधिकार आहे. त्यावर बोलण्याचा तुम्हाला अधिकार नाही. आणि शिवसेनेने देरासरसमोर चिकन शिजवलं नव्हतं.मुनी असाल तर खोटं बोलणं पाप आहे, हे लक्षात ठेवा.दुसरं,
— Akhil Chitre अखिल चित्रे (@akhil1485) December 6, 2025
"शिवसैनिक जैन मतदारांना मारहाण करतात" हा आरोप सरळसरळ खोटा आहे.आमचे… pic.twitter.com/pWFjuSL7sP
Jain Muni: नेमकं काय म्हणाले जैन मुनी?
जैन मुनी निलेशचंद्र विजय म्हणाले की, संपूर्ण लालबाग परिसरात उद्धव ठाकरे यांचं राज्य आहे. कुठल्याही नेत्याला तुम्ही फोन करा. माझ्या बिल्डिंगमध्ये प्रॉब्लेम झाला आहे, ते येणार नाहीत. आमदार त्यांचे, खासदार त्यांचे, नगरसेवक त्यांचेच आणि चापट मारून तुम्हाला मतदान करायला सांगतील हे लक्षात ठेवा. तुम्ही आता मार खात आहात. हे तुम्हाला परत मारतील. मोदींनी सांगितलं होतं की, बटेंगे तो कटेंगे तर मी जैनांना सांगत आहे की, बटेंगे तो तुम पिटोगे. सर्वात पहिले आपली वोट बँक मजबूत करा. आज आपल्या महाराष्ट्रात हिंदू मुस्लीम, बांग्लादेशींसोबतचा वाद दुसरीकडेच राहिला आहे. पण आता मारवाडी विरुद्ध मराठी असा वाद सुरु झाला आहे, असा टीका त्यांनी उद्धव ठाकरेंवर केली होती. जसं चिकनच्या नादाला लागून शिवसेना गेली, तसं तुम्ही पण झिरो व्हाल; अशी टीका त्यांनी राज ठाकरे यांच्यावर केली होती.
आणखी वाचा























