(Source: ECI/ABP News/ABP Majha)
M S Swaminathan passes away : कोण होते डॉ. एम.एस. स्वामिनाथन? जाणून घ्या त्यांच्या कार्याचा आढावा
हरित क्रांतीचे जनक (father of green revolution) एम.एस स्वामिनाथन यांचं निधन (M S Swaminathan passes away) झालं आहे. जाणून घेऊयात त्यांच्या कार्याचा आढावा.
M S Swaminathan passes away : हरित क्रांतीचे जनक (father of green revolution) एम.एस स्वामिनाथन यांचं निधन (M S Swaminathan passes away) झालं आहे. आज सकाळी 11 वाजून 20 मिनीटांनी चेन्नई येथील निवासस्थांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वयाच्या 98 व्या वर्षी त्यांचं निधन झालं आहे. भारतातील कृषी क्षेत्रात त्यांचं मोठं योगदान आहे. त्यांच्या योगदानाबद्दल भारत सरकारनं त्यांना विविध पुरस्कारानं देखील सन्मानीत केलं आहे. त्यांच्या निधनानंतर सर्वच क्षेत्रातून हळहळ व्यक्त होतेय. जाणून घेऊयात स्वामिनाथन यांच्या कार्याचा आढावा..
डॉ. एम.एस. स्वामिनाथन यांचा जन्म तामिळनाडूतील कुंभकोणम याठिकाणी 7 ऑगस्ट 1925 रोजी झाला होता. डॉ. मोणकोंबू सांबशिवन स्वामीनाथन असे त्यांचे पूर्ण नाव होते. भारतात हरितक्रांती घडवून आणण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. त्यांनी कृषी क्षेत्रातील संशोधनासाठी 'एम.एस. स्वामिनाथन रिसर्च फाऊंडेशन'ची स्थापना केली होती. भारत सरकारने स्वामीनाथन यांच्या अध्यक्षतेखाली स्वामीनाथन आयोगाची स्थापन केली होती.
केरळमधील महाराजस कॉलेजमधून कृषी क्षेत्रातली पदवी
स्वामीनाथन यांचे वडील डॉक्टर होते. ते गांधीवादी आणि स्वदेशीचे पुरस्कर्ते होते. त्यांच्या विचारांचा स्वामीनाथन यांच्यावर चांगला प्रभाव पडला. वडिलांप्रमाणे तेही डॉक्टरी शिक्षणाकडे वळले. पण 1943 मधील बंगालच्या दुष्काळामुळे त्यांनी ते शिक्षण अर्धवट सोडून दिले. ते शेतकी विषयाचे शिक्षण घेऊ लागले. केरळमधील महाराजस कॉलेजमधून त्यांनी कृषीक्षेत्रातली पदवी घेतली होती.
पोलीस ऑफिसर न होता कृषी क्षेत्रात संशोधन करायचे ठरवले
कृषीक्षेत्रात काम करायचे नक्की झाल्यावर स्वामीनाथन यांनी मद्रास कृषी महाविद्यालयातून आणखी एक पदवी घेतली. 1947 साली ते दिल्लीच्या इंडियन ॲग्रिकल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये पदव्युत्तर शिक्षणासाठी रवाना झाले. 1949 मध्ये विशेष प्रावीण्यासह त्यांनी ती पदवी प्राप्त केली. युनियन पब्लिक सर्व्हिसची परीक्षा देऊन ते भारतीय पोलीस सेवेसाठी पात्र ठरले. मात्र त्यांनी पोलीस ऑफिसर न होता कृषी क्षेत्रात संशोधन करायचे ठरवले. नेदरलॅंडमध्ये बटाटाच्या अनुवांशिकशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी त्यांना मिळालेल्या शिष्यवृत्तीतून त्यांनी 1952 मध्ये पीएच.डी. केली. परदेशांत विविध संधी असतानाही ते भारतात परतले. जगभरांतील कृषी विद्यार्थ्यांबरोबर त्यांनी कृषिसंशोधनाबरोबर वनस्पतींची पैदास आणि नैसर्गिक साधनसंपत्तीचे जतन या विषयांवर काम केले आहे.
उच्च उत्पन्न देणारे गहू आणि तांदळाचे वाण
भारतीय गरीब शेतकऱ्यांच्या शेतात गव्हाचे आणि तांदळाचे उच्च उत्पन्न देणारे वाण पेरुन त्यांनी हरितक्रांती घडवून आणली. याचे सर्व श्रेय स्वामीनाथन यांनाच जाते. त्यांच्या या प्रयत्नांमुळेच गहू आणि तांदूळ यांच्या उत्पादनांत भारत स्वयंपूर्ण होऊ शकला.
डॉ. स्वामीनाथन यांचे योगदान
डॉ. स्वामीनाथन यांचा झाडे प्रजनन,कृषी संशोधन आणि विकास आणि नैसर्गिक संसाधनांच्या संवर्धनावरती त्यांचा अधिक भर होता.
सन 1949-55 - बटाटा (सोलॅनम ट्यूबरोजम),गहू (ट्रिटिकम एस्टिव्हियम), तांदूळ (ओरिझा सॅटीवा) आणि ज्यूट अनुवंशशास्त्र यावर संशोधन केले.
सन 1955-72 - मेक्सिकन बौने गव्हाच्या वाणांवर शेतात संशोधन,सायटोजेनेटिक्स,रेडिएशन जेनेटिक्स आणि म्यूटेशन ब्रीडिंग आदि संशोधन केले.
सन 1972 ते 1979 दरम्यान ते भारतीय कृषी संशोधन परिषदेचे (आयसीएआर) महासंचालक होते. तिथे असताना त्यांनी नॅशनल ब्युरो ऑफ प्लांट,अॅनिमल आणि फिश जेनेटिक रिसोर्स ऑफ इंडियाची स्थापना केली.भारतीय वन सर्वेक्षण (एफएसआय) च्या परिवर्तनातही त्यांनी भूमिका बजावली.
सन 1979 मध्ये त्यांची भारत सरकारच्या कृषी मंत्रालयाचे प्रधान सचिव म्हणून नियुक्ती झाली.
सन 1981 ते 85 या काळात ते अन्न व कृषी संघटनेचे (एफएओ) स्वतंत्र अध्यक्ष होते.
सन 2001 मध्ये ते सुंदरबन जागतिक वारसास्थळातील जैवविविधता व्यवस्थापनावरील बांग्लादेश संयुक्त प्रकल्प यावर भारत क्षेत्रीय सुकाणू समितीचे अध्यक्ष होते.
2004 मध्ये स्वामीनाथन यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय किसान आयोग स्थापन
धान्याची उच्च-उत्पादनक्षम प्रकार विकसित करणे, खते आणि कीटकनाशके वापरणे, कीटक-प्रतिरोधक पिके विकसित करणे, वर्धित अनुवंशशास्त्र असलेल्या संकरित बियाणे इत्यादींचा समावेश करणे. हरित क्रांती केवळ भारतापुरती मर्यादित नव्हती तर ती बर्याच विकसनशील देशांमध्ये अमलात आणली गेली. परंतू ती भारतात सर्वात जास्त यशस्वी झाली. भारतातील शेतकरी आत्महत्यांच्या महत्त्वपूर्ण प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी सरकारने सन 2004 मध्ये स्वामीनाथन यांच्या अध्यक्षपदी राष्ट्रीय किसान आयोग (एनसीएफ) ची स्थापना केली.
एम.एस. स्वामीनाथन यांना मिळालेले पुरस्कार
कृषी क्षेत्रात केलेल्या योगदानाबद्दल एम.एस. स्वामीनाथन यांना विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांना भारत सरकारकडून पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण आदी पद्म पुरस्कार मिळाले आहेत. जैविक शास्त्रासाठी त्यांना शांती स्वरूप भटनागर पुरस्कार मिळाला आहे. तसेच रॅमन मॅगसेसे पुरस्कार, World food prize 1987 असा पुरस्कारांनी त्यांचा सन्मान करण्यात आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
M. S. Swaminathan : स्वतंत्र भारताच्या पहिल्या हरितक्रांतीचे जनक डाॅ. एम. एस. स्वामीनाथन यांचे निधन; कृषी क्षेत्राचा चालता बोलता इतिहास काळाच्या पडद्याआड