तीस गुंठ्यातील सोनचाफ्याच्या फुलशेतीतून लाखोंचे उत्पन्न, शहापूरच्या शेतकऱ्याची कमाल
Agriculture: मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या अतिदुर्गम आणि विविध समस्यांनी ग्रासलेल्या भागातील शेतकरी अवघ्या 30 गुठ्यांतील सोनचाफ्याच्या फुलशेतीतून घेत आहे लाखोंचे उत्पन्न.
ठाणे : निर्सगात होणारे बदल, हवामानाची अनिमयता, शेतकऱ्यांच्या मालाला नसलेला हमीभाव, खतांचे आकाशाला भिडलेले भाव, वाढती महागाई या विविध समस्येने शेतकरी त्रस्त झालेला दिसून येतोय. शेती व्यवसाय परवडत नाही म्हणून हजारो एकर शेती क्षेत्र ओसाड सोडताना किंवा त्यावर एकच भात पीक घेताना दिसत आहे. मात्र या सर्व संकटाशी सामना करत प्रगताशील युवा शेतकरी शरद फर्डे आणि त्यांच्या पत्नी विद्या फर्डे यांनी अवघ्या 30 गुठ्यांत वर्षाला सहा लाखाहून अधिक उत्पन्न घेत आहेत.
शहापूर तालुक्यातील शिवनेर या गावी आपली वडिलोपार्जित शेती पारंपरिक पद्धतीने न करता नवीन तंत्रज्ञानाची कास धरत अवघ्या पाऊण एकर क्षेत्रावर त्यांनी पाण्याची उपलब्धता निर्माण करून इस्त्रायल पद्धतीने अतिघन लागवड करून फुलशेती आणि फळशेती विकसित केली.
भाजीपाला, फुलशेती आणि फळशेती या सर्व पिकांचा अभ्यास करून त्यांनी स्वतःच्या शेतामधून दररोज उत्पन्न कसे आपल्या हाती येईल याचं नियोजन केलं. या दृष्टीकोनातून त्यांनी सौंदर्या या वानाची सोनचाफ्याची चारशे झाडे, पाच फूट बाय दहा फुटावर लागवड केली. तसेच शेताच्या कडेला आंबा , चिकू, पेरू, चंदन , जांभूळ, सिताफळ, नारळ पपई या सारखी सर्व वानांच्या फळझाडाची लागवड केली आहे
सोनचाफ्याच्या लागवडीनंतर अवघ्या एक वर्षात फुलांचे उत्पन्न सुरू झाले. सकाळी सहा ते आठ या दोन तासात सोनचाफा फुलांची काढणी आणि पॅकेजिंग होऊन दादर येथे फुलमार्केटला विक्रीसाठी दाखल होतात. सोनचाफ्यांच्या फुलाला वर्षभर ग्राहकांची मोठ्या प्रमाणात मागणी असून ऐंशी रूपये शेकडा ते एकशे साठ रूपये शेकडा फुलांना दर मिळत आहे. तसेच नवरात्र, गणेशोत्सव, दिपावली, गुढीपाडवा अशा सन-उत्सवाला चारशे ते पाचशे रूपये शेकडा हा दर सोनचाफा फुलास मिळतोय. वर्षभराचा बाजारभाव पाहता सरासरी एक रूपया प्रती फूल दर मिळतोय असे शेतकरी शरद फर्डे यांनी सांगितले.
याचबरोबर अपारंपरिक नैसर्गिक उर्जा स्त्रोत सौर उर्जेचाही ते शेतीसाठी वापर करत आहेत. सोनचाफा आणि इतर सर्व झाडांना त्यांनी ठिबकद्वारे पाण्याचे नियोजन केले असून पाण्याचीही बचत करून योग्य पद्धतीने सिंचनाचे नियोजन केले आहे. शरद फर्डे हे स्वतः कृषी पदवाधर असून आपल्या कृषी क्षेत्रातील अनुभवाने स्वतःची शेती डेव्हलप करून इतर शेतकऱ्यांनाही ते मार्गदर्शन करत आहेत.
ही बातमी वाचा: