Success story:दहावी उत्तीर्ण झाली अन् सुरु केला दुधव्यवसाय, नगरच्या श्रद्धाची उलाढाल तब्बल 1 कोटी रुपये
दहावीच्या परीक्षेनंतर उन्हाळ्याच्या सुट्टीत श्रद्धाने वडिलांना जनावरांच्या खरेदी विक्रीच्या कामात मदत करायला सुरुवात केली. श्रद्धा फार्म्स असा स्टार्टअप तिनं सुरु केला.
Success Story: सध्या दुधाचे दर आणि त्यावरून होणारी शेतकऱ्यांची अवस्था पाहून कोणताही नवखा माणूस या व्यवसायात उडी टाकण्याचं धाडस न करण्याच्या मानसिकतेत असताना दहावी उत्तीर्ण झालेल्या श्रद्धा धवननं दुधव्यवसाय सुरु केला आणि आता ती या व्यवसायातून तब्बल 1 कोटी रुपयांची कमाई करत आहे. स्टार्टअप सुरु करत दुधाच्या पदार्थांची ती विक्री करते.
वडिलांना मदत म्हणून झाली सुरुवात
अहमदनगर जिल्ह्यातील निघोज गावातील धवन कुटुंब जनावरांची खरेदी विक्री करतात. छोटाच व्यवसाय. अल्पभूधारक. दहावीच्या परीक्षेनंतर उन्हाळ्याच्या सुट्टीत श्रद्धाने वडिलांना जनावरांच्या खरेदी विक्रीच्या कामात मदत करायला सुरुवात केली. सुट्टीच असल्यानं वडिलांसोबत जनावरांच्या बाजारात जायला लागली. म्हैस कशी ओळखायची, म्हैस खरेदी करण्यापूर्वी काय जाणून घ्यायला हवं, जनावरांचा लिलाव कसा करतात, योग्य किंमत कशी ओळखायची अशा छोट्या छोट्या गोष्टी तिनं शिकून घेतल्या. या सगळ्या अनुभवांमधून व्यवसायाचा प्रशिक्षणच तिला मिळत होतं.
दुधाच्या उत्पादनं बनवत केली विक्री
२०१३ मध्ये तिनं ठरवलं की घरीच गायी म्हशींना पाळून दुधव्यवसाय सुरु करायचा. हा तिचा निर्णय तिच्यासाठी कलाटणी देणारा ठरला. पण अभ्यास थांबवून हे सगळं तिला करायचं नव्हतं. मग एकीकडे अभ्यास, दुसरीकडे व्यवसाय असा ताळमेळ साधत तिनं या व्यवसायात उडी मारली. वडिलांचं संशोधन, अभ्यास आणि तिचं अद्ययावत ज्ञान अशी जोड देत तिनं व्यवसायाला सुरुवात केली. तोपर्यंत तिची ११ वी सुरु झाली होती. श्रद्धा फार्म्स असा स्टार्टअप तिनं सुरु केला. हळूहळू गायी, म्हशींची संख्या वाढवली, कामगार वाढवले आता तिच्याकडे एकूण १३० म्हशी आहेत. स्टार्टअपपेडीयाला दिलेल्या मुलाखतीनुसार, पोस्टऑफिस आणि वेगवेगळ्या दुकानांमधून राज्यभरात ती दुधापासून बनवलेले प्रोडक्ट पाठवते. यामध्ये तूप, लोणी, लस्सी , ताक आणि दही याचा समावेश आहे.
एका वर्षात कोट्यवधींची उलाढाल
नैसर्गिक पद्धतीनं ही सर्व उत्पादनं ती बनवते. श्रद्धा फार्मचा एक टन बायागॅसचा प्लांटही आहे. जिथं सेंद्रिय खत बनवलं जातं. हे खत शेतकऱ्यांना तसेच कृषी कंपन्यांना विकलं जातं. अजूनतरी तिच्या स्टार्टपमधील उत्पादनं इकॉमर्सवर नसली तरी भारतभर इमेलच्या माध्यमातून तिला ऑर्डर्स मिळू लागल्या आहेत. आणि महत्वाचं म्हणजे तिनं वर्षभरात या व्यवसायातून एक कोटी रुपयांची कमाई केली आहे.
हेही वाचा:
Success Story:कापसाच्या शेतीतून लाखो रुपयांची उलाढाल! बीएड झालेल्या तरुणाचं वर्षाकाठी उत्पन्न...