Success Story:कापसाच्या शेतीतून लाखो रुपयांची उलाढाल! बीएड झालेल्या तरुणाचं वर्षाकाठी उत्पन्न...
जालन्यातील संगमपूरच्या एका बीएड झालेल्या तरुणानं नोकरीच्या मागे न जाता शेती करत कापूस शेतीतून लाखोंची उलाढाल केली आहे.
Farmer Success Story: मराठवाड्यात कापूस शेती काही नवी नाही. पण कपाशीतून भरभराट करणारे शेतकरी तसे कमीच. जालन्यातील संगमपूरच्या एका बीएड झालेल्या तरुणानं नोकरीच्या मागे न जाता शेती करत कापूस शेतीतून लाखोंची उलाढाल केली आहे. दहा एकर शेतीत कापसासह मका आणि कांद्याची लागवड या शेतकऱ्यानं केली आहे. यातून वर्षाकाठी उत्पन्न १५ लाखांपेक्षा अधिक आहे. सेंद्रीय खताचा वापर, पाण्याचं व्यवस्थापन आणि शेणखत, गांडूळखत वापरत शेती या तरुणानं केली. गणेश लहाने असं या तरुणानं पारंपारिक शेतीलाच नवं रूप देत सेंद्रीय शेती केली आहे. उच्चशिक्षण असूनही शहराकडे जात नोकरी करण्याला पसंती न देत शेती करत आपल्या कुटुंबाचीही आर्थिक प्रगती साधली आहे. विशेष म्हणजे ग्रामपंचायतमध्ये लीपिक म्हणूही एकाबाजूला ते काम करतात.
शेतीला जोडधंदा म्हणून करतात हा व्यवसाय
दहा एकर जमीनीपैकी सहा एकरावर लहाने यांनी कपाशीचं पीक घेतलं. त्यातून त्यांना १२ लाख रुपयांचे उत्पन्न निघते. कोणत्याही रासायनिक खतांची फवारणी न करता सेंद्रीय शेतीला प्राधान्य दिले. गाई म्हशीच्या शेणापासून शेणखत तयार करत गांडूळ खतही शेतीत वापरले. पिकांच्या वाढीसाठी आणि पोषणासाठी या खतांचा फायदा होतो. शेतीला जोडधंदा म्हणून पाण्याचा व्यवसायही हा शेतकरी करतो. त्यांच्या शेतात असलेल्या विहिरीला मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने गावातील ५० ते ६० घरांना पाणी पुरवतात. विहिरीपासून त्या घरांपर्यंत त्यांनी पाईपलाईनची व्यवस्था त्यांनी केली आहे. दरवर्षी गावातील त्या कुटुंबीयांकडून ते फक्त तीन हजार रुपये पाण्याचा दर घेतात.
पारंपरिक पिकांना दिली आधूनिकतेची जोड
आजकाल पारंपारिक शेती सोडून शेतीवर नवीन प्रयोग करणारे तरुण शेतकरी अधिक असताना या शेतकऱ्यांनी पारंपारिक शेतीलाच नवरूप दिल आहे. सेंद्रिय पद्धतीने शेती करत शेतीला आधुनिकतेची जोड देत शेती यशस्वी केली. बीएड शिक्षण झालेल्या गणेश यांनी नोकरीच्या मागे न जाता शेतीलाच पसंती दिली. कपाशी मका अशा पारंपरिक शेतीच्या जोरावर वर्षाकाठी 15 लाखांपेक्षा अधिक उत्पन्न हा शेतकरी मिळवतोय. बियाणं मशागत लागवड असा सगळा मिळून एकरी बारा ते पंधरा हजार रुपयांचा खर्च या शेतकऱ्याला येतो. दुष्काळग्रस्त जालना जिल्ह्यात कपाशीतून लाखो रुपये कमवण्याची धमक या शेतकऱ्याने दाखवली. शेतीसोबतच जोडधंदा म्हणून इतर अनेक व्यवसाय ते करतात.
हेही वाचा:
नोकरी सोडून पिकवली कोरफड, साताऱ्याच्या युवा शेतकऱ्याची वार्षिक उलाढाल तब्बल 3.5 कोटी!