(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nagpur Orange Crop Loss : 70 टक्के संत्र्याचे पीक गळणार, यंदा रसाळ संत्री खायला मिळणार नाहीत?
Nagpur Orange Crop Loss : यंदा संत्र्याच्या आंबिया बहारवर एकापाठोपाठ एक तिहेरी संकट आल्यामुळे 70 टक्के संत्र्याचं पीक नष्ट झालं आहे किंवा नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. जवळपास रोजच झालेल्या अत्याधिक पावसामुळे आता बुरशीजन्य रोगाने संत्र्याच्या पिकाला घेरले आहे
Nagpur Orange Crop Loss : नागपूर (Nagpur) आणि अवतीभवतीचा परिसर रसाळ संत्र्यांसाठी (Orange) प्रसिद्ध असून इथल्या संत्र्यांना देशातच नाही तर जगातही मागणी असते. मात्र यंदा संत्र्याच्या आंबिया बहारवर एकापाठोपाठ एक तिहेरी संकट आल्यामुळे 70 टक्के संत्र्याचं पीक नष्ट झालं आहे किंवा नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. आधी मार्च आणि एप्रिल महिन्यात अत्याधिक तापमानामुळे आंबिया बहारच्या फुलोऱ्यावर विपरित परिणाम झालाच होता. नंतर उशिरा सुरु झालेला मान्सून जुलै महिन्यापासून अत्याधिक सक्रिय झाला. जवळपास रोजच झालेल्या अत्याधिक पावसामुळे आता बुरशीजन्य रोगाने संत्र्याच्या पिकाला घेरले आहे. एकापाठोपाठ एक आलेल्या या संकटांमुळे संत्र्याला प्रचंड फळ गळती लागली आहे. तिच अवस्था मोसंबी फाळाचीही आहे.
फळ गळतीमुळे शेतकरी हवालदिल
नागपूर जिल्ह्यातील काटोल, नरखेड, कळमेश्वर आणि सावनेर या संत्रा आणि मोसंबी उत्पादक तालुक्यांमध्ये शेतात पावसाचे पडतो. त्याच स्वरुपात झाडावर उगवलेली संत्री खाली गळून पडत आहेच. महागडा औषधोपचार आणि बुरशीनाशक फवारणी केल्यानंतरही फळ गळती थांबत नसल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. गेली दोन वर्ष सातत्याने संत्र्याच्या उत्पादनावर रोगराईचे संकट आल्यामुळे यंदाच्या हंगामापासून शेतकऱ्यांना भरपूर अपेक्षा होत्या. सुरुवातीला फळधारणाही चांगली झाली होती. मात्र अत्याधिक पावसामुळे संत्र्याच्या बागा चिखलाने माखल्या असून पावसापासून उघडीप देखील मिळत नाही. परिणामी सतत ओल्या जमिनीतून बुरशीची लागण होत आहे आणि त्यामुळे गेले अनेक वर्ष न पाहिलेली फळ गळती पाहण्याची वेळ संत्रा उत्पादक शेतकऱ्यांवर आली आहे.
नुकसानभरपाईच्या यादीत संत्री, मोसंबीचा समावेश नसल्याने शेतकरी नाराज
दरम्यान, सरकारने, कृषी विभागाने त्वरित याकडे लक्ष द्यावे, औषधोपचाराबद्दल शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करावे, अशी मागणी संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे. तसेच नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीनंतर कृषी विभागाने पिकांच्या नुकसानीचे सर्वेक्षण सुरु केले असलं तरी नुकसान भरपाई द्यायच्या पिकांच्या यादीत संत्री आणि मोसंबीचा समावेश नसल्यामुळेही शेतकरी राज्य सरकारवर प्रचंड नाराज आहेत.
अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचं मोठं नुकसान
अतिवृष्टीमुळे जुलै व ऑगस्ट महिन्यात नागपूर विभागातील सहाही जिल्ह्यात खरिपाच्या पिकाचे प्रचंड नुकसान झालं आहे. पाऊस थांबला असला तरी अनेक जिल्ह्यांमध्ये शेतातील पिके पाण्याखाली आहेत. अनेक जिल्ह्यांमध्ये पिके पिवळी पडली असून जमीन खरडून गेल्यामुळे पिकांचे नुकसान झालं आहे. कीड रोगाचा प्रादुर्भाव वाढला असून जिवाणू आणि बुरशीची वाढ झाली आहे. काही ठिकाणी सर्वे करणं देखील कठीण असून अजूनही शेतामध्ये पाणी साचलं असल्याचं अहवालात स्पष्ट करण्यात आलं. नागपूर विभागात कपासीचे 2.48 लक्ष हेक्टर, सोयाबीनचे 1.26 लक्ष हेक्टर, तुरीचे 49 हजार हेक्टर, भाताचे 55 हजार हेक्टर क्षेत्रात नुकसान झालं आहे. विभागात जुलै अखेरपर्यंतचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. मात्र, ऑगस्टमध्ये झालेल्या पावसाचे पंचनामे या आठवड्यात पूर्ण होतील असं प्रशासनाकडून सांगण्यात आलं.