(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Agriculture Awards : कृषी पुरस्कारांसाठी प्रस्ताव सादर करण्याचं कृषी विभागाचं आवाहन, 'या' पुरस्काराचं केलं जाणार वितरण
Agriculture Awards : यावर्षी देण्यात येणाऱ्या कृषी पुरस्कारांसाठी प्रस्ताव सादर करण्याचं आवाहन कृषी विभागानं केलं आहे.
Agriculture Awards : दरवर्षी महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत (Department of Agriculture) शेती आणि पूरक क्षेत्रात अतिउल्लेखनिय कार्य करणाऱ्या शेतकऱ्यांना किंवा संस्थांना पुरस्कार देऊन सन्मानित केलं जातं. यावर्षी देखील कृषी विभागाच्या वतीनं शेतकऱ्यांचा सन्मान केला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर यावर्षी देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांसाठी कृषी विभागाकडून प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. या कृषी पुरस्कारांसाठी (Agriculture Awards) प्रस्ताव सादर करण्याचं आवाहन कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना करण्यात आलं आहे. कृषी पुरस्कारासाठीचा आपला परीपूर्ण प्रस्ताव कृषी विभागाच्या नजीकच्या कार्यालयात 20 ऑगस्टपर्यंत सादर करावा असंही सांगण्यात आलं आहे.
'या' पुरस्कारांचं केलं जाणार वितरण
1) डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार ( 75 हजार रुपये),
2) वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्कार (आठ कृषी विभागांतून प्रत्येकी एक, प्रत्येकी 50 हजार रुपये)
3) जिजामाता कृषिभूषण पुरस्कार (आठ कृषी विभागांतून प्रत्येकी एक, 50 हजार रुपये)
4) कृषिभूषण (सेंद्रिय शेती) पुरस्कार (आठ कृषी विभागांतून प्रत्येकी एक, प्रत्येकी 50 हजार रुपये)
5) युवा शेतकरी पुरस्कार (आठ कृषी विभागांतून प्रत्येकी एक, प्रत्येकी 30 हजार रुपये)
6) वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार (आठ कृषी विभागांतून प्रत्येकी एक, प्रत्येकी 30 हजार रुपये)
7) उद्यान पंडीत पुरस्कार (आठ कृषी विभागांतून प्रत्येकी एक, प्रत्येकी 25 हजार रुपये)
8) सर्वसाधारण गटासाठी प्रती जिल्हा याप्रमाणे 34 आणि आदिवासी गटासाठी प्रती विभाग 1 याप्रमाणे 6 असे एकूण 40 वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार (प्रत्येकी 11 हजार रुपये)
9) आठ कृषी विभागातून प्रत्येकी 1 अधिकारी आणि कर्मचारी याप्रमाणे 8 तसेच कृषी आयुक्तालय स्तरावरुन एक असे एकूण 9 पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवारत्न पुरस्कार
कृषी विभागातर्फे दरवर्षी हे विविध पुरस्कार देऊन शेतकऱ्यांचा सन्मान केला जातो. यावेळी देखील हे पुरस्कार देण्यात येणार आहेत. यासाठी कृषी विभागातर्फे 20 ऑगस्ट 2022 पर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन करण्यात आलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या: