Thane College NCC Video : जोशी बेडेकर कॉलेजमधील मारहाण प्रकरणी विद्यार्थी आणि पालकांना आक्षेप नाही
ठाण्याच्या जोशी बेडेकर आणि बांदोडकर कॉलेजमधल्या एनसीसीच्या ज्युनियर कॅडेट्सना झालेल्या मारहाणीच्या प्रकरणाला आज कलाटणी मिळाली. या ज्युनिअर कॅडेट्सना त्यांच्याच सीनियरकडून झालेल्या मारहाणीच्या व्हिडीओनं साऱ्या महाराष्ट्रात नुकतीच वादाची ठिणगी टाकली होती. या कॉलेजच्या प्रवेशद्वारापासून राज्य विधिमंडळाचं अधिवेशनही या वादानं गाजवलं होतं. पण झाला प्रकार चुकीच्या पद्धतीनं दाखवण्यात येऊन व्हिडीओ व्हायरल करण्यात आल्याचा युक्तीवाद आज करण्यात आला. तोही मारहाण झालेल्या एनसीसी कॅडेट्सकडून. आम्हाला देण्यात येणारं शिक्षण हे अतिशय उत्तम असून, आम्हाला आणि आमच्या पालकांनाही त्याबद्दल आक्षेप नसल्याचं एनसीसी कॅडेट्सनी म्हटलं आहे.भारतीय सैन्यात भरती व्हायचं असेल तर आम्हाला आणखी कठीण शिक्षण आणि सराव करावा लागणार आहे. आमचे आमच्या सीनियरशी चांगले संबंध आहेत. त्यामुळं व्हिडीओबाबत करण्यात येणारी बदनामी थांबवण्याचं आवाहन व्हिडीओतल्या ज्युनियर कॅडेट्सनी म्हटलं आहे.