Nashik Accident : कुटुंबाचा आधार गेला... घरातील एकुलत्या एक मुलाचा दुर्दैवी अंत; नाशिक अपघातातील मृतांचा आकडा वाढला
Nashik Dwarka Flyover Accident : नाशिकच्या उड्डाणपुलावर द्वारका परिसरात रविवारी भीषण अपघात झाला होता. या अपघातातील मृतांचा आकडा आता वाढला आहे.
Nashik Accident : नाशिकच्या उड्डाणपुलावर द्वारका परिसरात (Nashik Dwarka Flyover Accident) रविवारी (दि. 12) भीषण अपघात झाला. एक पिकअप ट्रक लोखंडी सळ्यांनी भरलेल्या ट्रकवर जाऊन आदळला. यानंतर मागून येणाऱ्या वाहनाने पिकअपला जोरदार धडक दिल्याने पिकअप दोन्ही वाहनांमध्ये चिरडला गेला. यावेळी ट्रकमधील लोखंडी सळ्या पिकअपच्या काचा फोडून आतमध्ये शिरल्या आणि तरुण मुलांच्या शरीरात घुसल्या. यात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला होता. तर 13 जण गंभीर जखमी झाले होते. या अपघातात याआधी तीन जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. आता आणखी एका जखमीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने नाशिक अपघातातील मृतांचा आकडा 9 वर पोहोचला आहे.
नाशिकच्या द्वारका उड्डाणपुलावर मागील आठवड्यात निफाडहून (Niphad) नाशिककडे येणाऱ्या वाहनाचा भीषण अपघात झाला. या दुर्दैवी घटनेत आतापर्यंत आठ जणांना प्राण गमवावे लागले होते. आता जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या 17 वर्षीय राहुल साबळे (Rahul Sable) याचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झालाय. राहुल साबळे सिडको परिसरातील सह्याद्रीनगर (Sahyadri Nagar) येथील रहिवासी होता. ग्रामोदय विद्यालयात बारावीचे शिक्षण घेत होता. त्याच्या मृत्यूमुळे एकुलता एक मुलगा गमावलेल्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
नेमका कसा झाला अपघात?
नाशिकच्या द्वारका उड्डाणपुलावर रविवारी रात्री टेम्पो आणि ट्रकचा भीषण अपघात झाला होता. एका धार्मिक कार्यक्रमावरुन काही लोकांना घेऊन पिकअप निफाडहून नाशिककडे परतत होता. त्यावेळी हा टेम्पो नाशिकच्या उड्डाणपुलावर द्वारका येथे उभ्या असलेल्या लोखंडी सळ्यांनी भरलेल्या ट्रकला जाऊन धडकला. यानंतर उभ्या असलेल्या ट्रकमधील लोखंडी सळ्या बाहेर लोंबकळत असल्याने पिकअपच्या काचा फुटल्या आणि पाठीमागच्या बाजूला बसलेल्या लोकांच्या शरीरात शिरल्या. या भीषण अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. तर आतापर्यंत चार जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. शासनाकडून मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. तर हा अपघात घडण्यापूर्वी 10 मिनिट आधी पिकअपमधून उतरल्याने एक तरुण सुखरूप बचावला आहे. सध्या या अपघातातील इतर जखमींवर नाशिकच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या