Mumbra Railway accident :मुंब्रा स्थानकात GRP कडून ट्रॅकची पाहणी,पुरावे मिळतात का? याचा तपास
Mumbai Railway Accident: मध्य रेल्वेमार्गावरील मुंब्रा स्थानकाजवळ सोमवारी 13 प्रवासी चालत्या लोकल ट्रेनमधून खाली पडल्याची घटना घडली होती. या दुर्घटनेत चार प्रवाशांचा मृत्यू झाला होता तर नऊजण जखमी झाले होते. जखमींपैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे. या घटनेनंतर मुंबईकरांकडून प्रचंड संताप व्यक्त करण्यात आला होता. मध्य रेल्वेच्या उशीरा धावणाऱ्या लोकल ट्रेन (Mumbai Local Train) आणि कोलमडलेल्या नियोजनामुळे वारंवार निर्माण होणाऱ्या समस्यांचा मुद्दा ऐरणीवर आला होता. मात्र, या दुर्घटनेच्या दुसऱ्या दिवशी डोंबिवली रेल्वे स्थानकात (Diva Railway Station) भयंकर दृश्य दिसून आले. डोंबिवली स्थानकात एसी लोकल ट्रेनमध्ये (AC Local Train) चढण्यासाठी मंगळवारी प्रचंड गर्दी झाली होती. ही गर्दी इतकी होती की, प्रवासी लोकल ट्रेनप्रमाणे एसी ट्रेनच्या दरवाजात लटकले होते. त्यामुळे एसी लोकलचे दरवाजे बंद होत नव्हते. या सगळ्या गोंधळामुळे एसी लोकल बराचवेळ डोंबिवली स्थानकात थांबून होती. दारात लटकलेले प्रवासी काही केल्या खाली उतरायला तयार नव्हते. या सगळ्यामुळे मध्य रेल्वे मार्गावरील लोकल गाड्यांच्या अपुऱ्या संख्येचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
दिवा, डोंबिवली, कळवा या रेल्वे स्थानकांमध्ये कर्जत आणि कल्याणहून येणाऱ्या अप मार्गावरील लोकल ट्रेन भरुन येतात. त्यामुळे दिवा स्थानकातील प्रवाशांना ट्रेनमध्ये जागा नसते. मात्र, सकाळच्या वेळेत कार्यालय गाठणे गरजेचे असल्याने दिवा स्थानकातील प्रवासी लोकल ट्रेनच्या फुटबोर्डवर जागा मिळाली तरी ट्रेनमध्ये चढतात. त्यामुळे दिवा स्थानकात ट्रेनला प्रचंड गर्दी होते. यामुळे अनेकदा अपघात होता. सोमवारी झालेला अपघात हे त्याचे ताजे उदाहरण. मात्र, त्यानंतरही मध्य रेल्वे प्रशासनाला जाग आलेली दिसत नाही. कारण मंगळवारी एसी लोकल ट्रेनमधील गर्दी आवरण्यासाठी स्थानकात रेल्वे पोलीस किंवा मध्य रेल्वेचे कर्मचारी यापैकी कोणीही उपस्थित नव्हते.
























