Terrorist attack | मुंबई लोकल दहशतवाद्यांच्या निशाण्यावर, 'सिलेंडर गॅस अॅटक'ची योजना
चार दिवसांपूर्वी दिल्लीत सहा दहशतवाद्यांना अटक केल्यानंतर काल मुंबईमध्ये आणखी एका दहशतवाद्याला अटक करण्यात आली आहे. या दहशतवाद्यांच्या निशाण्यावर मुंबई लोकल असल्याची माहिती पुढे आली आहे. अशातच दहशतवाद्यांनी मुंबई लोकलमध्ये गॅस सिलेंडर सहाय्याने हल्ला करण्याची योजना आखल्याचा इशारा गुप्तचर विभागाने दिला आहे. त्यामुळे मुंबई लोकल स्थानकांवरच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.
गुप्तचर विभागाने तशी माहिती रेल्वे पोलिसांना दिल्याचं समजतंय. या इशाऱ्यानंतर रेल्वे पोलिसांनी स्थानकावरील सुरक्षा व्यवस्था अधिक कडक केली असून प्रत्येक गोष्टीची तपासणी केली जात आहे. काही महत्वाच्या रेल्वे स्थानकावरील एन्ट्री आणि एक्झिटच्या मुख्य मार्गाव्यतिरिक्त इतर सर्व रस्ते बंद केले आहेत.























