Maratha Reservation Protest : जीव जाईल पण मुंबई सोडणार नाही, मराठा आंदोलक तुफान आक्रमक
ओबीसीतून मराठा आरक्षणासाठी जोरदार शक्तिप्रदर्शन करत मनोज जरांगे मुंबईत दाखल झालेत. मानखुर्द, चेंबूरमध्ये जरांगेचंं भव्य स्वागत करण्यात आलं. ते थोड्याच वेळात आझाद मैदानावर पोहोचणार आहेत. शेकडो गाड्यांचा ताफा आणि हजारो मराठा आंदोलक मुंबईत दाखल झालेत. दुसरीकडे प्रत्यक्ष आंदोलनस्थळ म्हणजे आझाद मैदानही हाऊसफुल झालंय. आंदोलकांचे लोंढेच्या लोंढे आझाद मैदानावर आदळतायत. आज संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आझाद मैदानावर आंदोलनाची परवानगी दिलीये.
आझाद मैदानात आंदोलन करण्यासाठी मनोज जरांगेंना एका वेळी एकाच दिवसाची परवानगी मिळालीय. शनिवारी, रविवारी किंवा सुट्टीच्या दिवशी परवानगी मिळणार नसल्याचं मुंबई पोलिसांनी स्पष्ट केलंय. त्यामुळे आज एकच दिवस जरांगेंना आझाद मैदानात आंदोलन करावं लागणार आहे. एका दिवसात आंदोलन कसं करणार, असा सवाल जरांगेंनी सरकारला केलाय. आणखी काही दिवसांची परवानगी मागणार असल्याचं सांगितलं जातंय. पण तशी परवानगी मिळाली तरी परवा शनिवार असल्यानं नियमानुसार जरांगेंना आजनंतर सलग आंदोलन करता येणार नाही. त्यामुळे शनिवारी, रविवारी जरांगेंचा मुक्काम कुठे असणार हा प्रश्न आहे.























