Kirit Somaiya यांना ठाण्यातही उतरवण्यात पोलिसांना अपयश; महालक्ष्मी एक्स्प्रेस कोल्हापूरला रवाना
मुंबई : भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या कोल्हापूर दौऱ्याला कोल्हापूर जिल्ह्याधिकाऱ्यांना मज्जाव केला असताना देखील ते कोल्हापूरला रवाना झाले आहेत. किरीट सोमय्या सीएसएमटी रेल्वे स्थानकावर दाखल झाले त्यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त त्याठिकाणी होता. पोलिसांना त्यांना अडवलं. मात्र सोमय्यांनी पोलिसांना अडवू नका अशी विनंती केली. महालक्ष्मी एक्सप्रेसने किरीट सोमय्या कोल्हापूरला रवाना झाले आहेत.
कोल्हापूरमध्ये येण्यास बंदी आहे, मग मला मुंबईत का अडवलं जात आहे. कोल्हापूरच्या सीमेवर मला अडवलं पाहिजे. हसन मुश्रीफांना वाचवण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहेत. किरीट सोमय्या यांनी यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्र्यांवर टीका केली. मला चार तास घरात डांबून का ठेवलं? असा सवाल किरीट सोमय्या यांनी विचारला.
किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर 127 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला आहे. यासंदर्भात कोल्हापूरमध्ये जाऊन किरीट सोमय्या हसन मुश्रीफ यांच्या विरोधात पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करणार आहेत. मात्र ही पोलीस तक्रार होऊ नये यासाठी मला अडवलं जात आहे, असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.