MHADA | म्हाडा वसाहतींमध्ये राहणार्या रहिवाशांना राज्य सरकारचा मोठा दिलासा
मुंबई : म्हाडा वसाहतींमध्ये राहणार्या रहिवाशांना राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. म्हाडाने थकीत सेवाशुल्कावरील तब्बल 400 कोटी रुपयांचे व्याज माफ केले आहे. अभय योजने अंतर्गत म्हाडाच्या वसाहतीत राहणार्या रहिवाशांना मोठा दिलासा मिळालाय. एक एप्रिल 1998 ते 2021 पर्यंतच्या थकीत सेवा शुल्कावरील व्याज माफ करण्यात आल्याची माहिती गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे.
गेली 21-22 वर्ष नागरिकांनी सेवा शुल्क भरले नव्हते. त्यांच्यासाठी आम्ही अभय योजना सुरू केली आहे. त्यानुसार आम्ही थकीत सेवा शुल्कावरील व्याज माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच थकीत सेवा शुल्क एकत्र न भरता 5 वर्षात 10 हप्त्यात भरू शकता, अशी सवलत दिली आहे. म्हाडाच्या इमारतीत राहणार्या 1 लाख 81 हजार रहिवाशांना याचा लाभ होणार आहे. तसंच आता म्हाडात जाऊन रांगेत उभं राहून बिल भरायचं बंद होईल. ऑनलाइन प्रणालीद्वारे तुम्ही घरबसल्या सेवा शुल्क भरू शकता, असे जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले.






















