Sharad Pawar VIDEO : मोदींवर वार, मदतीला पवार! पवारांचे खासदार मोंदींच्या भेटीला, योगायोग की भविष्यातील रणनीतीचे संकेत?
Sharad Pawar NCP MPs Meet PM Modi : शरद पवारांच्या आठ खासदारांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतल्यानंतर त्यावर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आल्याचं दिसतंय.

मुंबई : राजकारणात एकेकाळी गुप्तपणे झालेल्या भेटीगाठींची चर्चा रंगायची. पण गेल्या काही काळात जाहीरपणे झालेल्या गाठीभेठीदेखील कुजबूज सुरु करण्यासाठी पुरेशा ठरतात. अशाच एका भेटीची आज राजकीय वर्तुळात चर्चा रंगली. शरद पवारांच्या आठ खासदारांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. महाराष्ट्रातील विविध प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी ही बैठक असल्याचं पवारांच्या खासदारांनी सांगितलं. मात्र सांगितलेल्या गेलेल्या कारणांवर विश्वास ठेवूनही काही प्रश्न मात्र जन्माला आलेच. याच सगळ्याचा आढावा घेऊया, या स्पेशल रिपोर्टमधून.
अनेक शक्यतांना जन्म देणारी, तर्कवितर्कांना भरती आणणारी आणि सत्ताधारी-विरोधक अशा दोघांनाही सावध पवित्रा घ्यायला लावणारी ही बैठक… शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या आठ खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची 20 मिनिटं भेट घेतली आणि महाराष्ट्राच्या प्रश्नांवर चर्चा केल्याचं सांगितलं.
भेटीनंतर खासदारांनी दिलेल्या प्रतिक्रियांमध्ये दोन गोष्टी कॉमन होत्या. पहिली गोष्ट म्हणजे सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वाखाली भेट झाल्याचं अधोरेखित करणं आणि दुसरं म्हणजे राजकीय चर्चा झाली नसल्याचं आवर्जून सांगणं.
NCP MPs Claims : केवळ मतदारसंघातील प्रश्नांवर चर्चा झाल्याचा दावा
खासदार अमोल कोल्हे म्हणाले की, 20 मिनिट पंतप्रधान यांच्यासोबत चर्चा झाली. सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्व भेट झाली. आमच्या मतदार संघातील मुद्द्यावर आम्ही चर्चा केली. नाशिक पुणे रेल्वे आंदोलन बाबत चर्चा केली. इंद्रायणी मेडिसिटी, चाकण MIDC बाबत चर्चा केली. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार देण्याबाबत चर्चा केली. शिवाजी महाराज यांचा पुतळा आणि फुले पगडी देऊन पंतप्रधान यांचा सन्मान केला. कुठलीही राजकीय चर्चा या भेटीत झाली नाही.
पूर्ण अधिवेशन एक दिवसही चाललं नाही. आम्ही समस्या कुठे मांडायच्या. आमच्या नेत्या सुप्रिया ताईंनी पंतप्रधानांची भेट घेतली, तेव्हा आम्ही सगळे खूश होतो. आमच्या समस्यांवर मार्ग निघेल. एनडीएचा विषय नाही आणि डिलिमिटेशनचाही विषय नाही, असं खासदार बाळ्यामामा म्हात्रे म्हणाले.
Congress Shivsena Reaction : मित्रपक्षांची सावध प्रतिक्रिया
शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे महाराष्ट्रातले मित्रपक्ष असणाऱ्या काँग्रेसला सध्या तरी या भेटीत वावगं काही दिसत नाही. मात्र डिलिमिटेशन हा भाजपचा कावा असल्याचं सांगायला प्रदेशाध्यक्ष विसरत नाहीत. अशा भेटीमागचा अजेंडा आणि संदर्भ आपल्याला माहीत नसल्याचं सांगत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण भाजपविरोधात एकत्र राहण्याची गरज पवारांच्या राष्ट्रवादीला पटवून देतायत.
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, राष्ट्रवादी किंवा शरद पवार यांच्याकडे काय घडामोडी घडत आहे. त्यांचा अजेंडा त्यांनाच माहीत.. इंडिया आघाडी अगदी भक्कम आहे. भाजपचा पराभव करायचा असेल तर विरोधी पक्ष एकत्र येणे गरजेच.. भाजपच्या विरोधात जनतेत असलेल्या रोषाला एकत्रित आणण्यासाठी सर्वांनी एकत्र राहणे गरजेच.. मात्र अशा घटना घडताना वेगळा संदर्भ असतो.
ठाकरेंच्या शिवसेनेलाही आजच्या भेटीचं कुठलंही आश्चर्य वाटलेलं नाही. मात्र शरद पवारांचा पक्ष एनडीएला मदत करणार नाही, अशी अपेक्षा जाहीरपणे आणि वारंवार व्यक्त करावीशी वाटतेय. या भेटीवर प्रतिक्रिया देताना खासदार संजय राऊत म्हणाले की, अधिवेशन सुरु असताना खासदारांनी त्यांच्या प्रश्नासाठी प्रधानमंत्र्यांना, गृहमंत्र्यांना भेटणं यात आश्चर्य वाटावं असं काय. प्रधानमंत्र्यांना याचसाठी भेटावं लागतंय कारण ते संसदेत नाहीत. ते काही लपूनछपून भेटत नाहीत. सुप्रिया सुळे सोबत आहेत. मला वाटत नाही पवार साहेबांच्या नेतृत्वाखालील पक्ष एनडीएला मदत होईल, अशी भूमिका घेतील.
मित्रपक्ष दाखवत असलेला हा ‘संशययुक्त विश्वास’ बघून शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंनी ठाकरे आणि फडणवीसांच्या एकत्र विमान प्रवासाची आठवण करून दिलीय. शरद पवार मोदींना भेटले तेव्हा आधी ते जंतरमंतरला आंदोलना भेटून जाऊन आले. आजच्या घडीला असा कोणताही विषय नाही एवढं सांगू इच्छुतो. उद्धव साहेब आणि देवेंद्र फडणवीसही एकत्र विमानातून प्रवास करुन आले ना. आमच्या मित्र पंक्षांनी संशय निर्माण करु नये अशी आमची विनंती आहे, अशी प्रतिक्रिया शशिकांत शिंदे यांनी दिली.
Sharad Pawar NCP MPs Meet PM Modi : योगायोग की भविष्यातील रणनीतीचे संकेत
दोनच दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे त्यांच्यासोबत होते. मात्र उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या दौऱ्यात दिसल्या नाहीत. अमित शाहांनी त्यांना भेट नाकारल्याच्या मुद्द्याकडं रोहित पवारांनी लक्ष वेधलं होतं. तर दुसरीकडे शरद पवारांच्या आठ खासदारांना भेटण्यासाठी पंतप्रधान मोदींनी वेळ दिली. हा विरोधाभास म्हणजे निव्वळ योगायोग आहे की भविष्यातील नव्या रणनीतीचा संकेत आहे, याची चर्चा सुरु झालीय. पण सध्या तरी भाजपला या भेटीकडे वेगळ्या नजरेनं पाहण्याची गरज वाटत नसल्याचं मुख्यमंत्र्यांच्या प्रतिक्रियेतून दिसतंय.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, चांगली गोष्ट आहे. पंतप्रधान हे देशाचे असतात. पक्षाचे नसतात. त्यांना भेटायला जाणं यामध्ये काही वावगं आहे असं वाटत नाही. मीही मुख्यमंत्री आहे. अनेक विरोधी पक्षाचे नेते भेटत असतात. कामं सांगत असतात. वेगळ्या दृष्टीने पाहण्याची गरज नाही.
पवारांना एनडीएमध्ये येण्याची ऑफर
अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं एका वाक्यात प्रतिक्रिया देत यावर जास्त न बोलणंच पसंत केलंय. तर शिंदेंच्या शिवसेनेनंही मोजक्या शब्दात व्यक्त होणंच पसंत केलं. तर केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी शरद पवारांना एनडीएत येण्याची ऑफर पुन्हा एकदा दिलीय. सुप्रिया सुळे पूर्वी त्यांना भेटले होते. फक्त भेटून काय उपयोग. पवारसाहेबांनी एनडीएत आले पाहिजे. जर ते एनडीए मध्ये येणार असतील तर त्यांचे स्वागत आहे. मी अनेकदा त्यांना सांगितले आहे एनडीएत आले पाहिजे, असं आठवले म्हणाले.
एखाद्या पक्षाचे खासदार पंतप्रधानांना भेटणं यात विशेष काही नसतं, हे तर सर्वांनाच माहित आहे. मात्र गेल्या काही वर्षांत घडलेल्या राजकीय घडामोडीनंतर अशा भेटीगाठींकडे पाहताना सर्वसामान्यांच्याही भुवया उंचावू लागल्यात.
अगोदर शिवसेना आणि नंतर राष्ट्रवादीत पडलेली फूट, पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींच्या पक्षात झालेलं बंड, आम आदमी पक्षाला बसलेले धक्के आणि नुकतीच ठाकरेंच्या सहा खासदारांनी शिंदे गटात मारलेली उडी या घटना पाहता शरद पवारांच्या खासदारांनी घेतलेली मोदींची भेट ही केवळ मतदारसंघातल्या प्रश्नापुरती असेल, यावर विश्वास ठेवणं अनेकांना कठीण जातंय. या भेटीमुळं उंचावलेल्या भुवया पुढच्या काही दिवसात खाली येणार की अधिकच उंचावणार, यासाठी किमान डिलिमिटेशन बिल पटलावर येईपर्यंत तरी वाट पाहावी लागणार आहे.
ही बातमी वाचा:
Before You Go
Devendra Fadnavis: डोक्यावर फेटा, कपाळावर टीळा, हातात वीणा; देवेंद्र फडणवीसांनी साकारली गणरायाची मूर्ती, पाहा VIDEO





















