'पन्हाळगड ते पावनखिंड' पदभ्रमंती... इतिहासातून माणसाला समृद्ध करणारा भन्नाट निसर्ग अनुभव

महाराष्ट्र एक्स्प्रेस हळूहळू अकोला रेल्वे स्थानकात शिरत होती. गाडीचा वेग कमी होत होता आणि माझ्या मनातल्या आठवणींचा वेग मात्र वाढत होता. तीन दिवसांपूर्वी याच स्थानकावरून मी एका प्रवासासाठी निघालो होतो; पण आज परतताना जाणवत होतं. हा प्रवास फक्त कोल्हापूरचा नव्हता, हा प्रवास साडेतीनशे वर्षांपूर्वीच्या इतिहासात जाऊन परत येण्याचा होता. रेल्वेच्या दरवाज्यातून खाली उतरलो. अकोल्याच्या भूमीवर पहिलं पाऊल ठेवलं... आणि नकळत अंगावर रोमांच उभे राहिले.
तीन दिवसांपूर्वी या भूमीतून निघताना माझ्या मनात इतिहासाबद्दल प्रचंड आदर होता; पण आज परतताना त्या इतिहासाविषयीचं नातं बदललं होतं. कारण तो इतिहास मी आता फक्त वाचलेला नव्हता, तर जगून आलो होतो. सह्याद्रीच्या कुशीत, पावसाच्या सरींत, चिखलाच्या वाटांवर, दगडधोंड्यांच्या पायवाटांवर आणि मावळ्यांच्या पराक्रमाने पावन झालेल्या भूमीवर मी स्वतःची काही पावलं उमटवून आलो होतो. जीवनात काही प्रवास असे असतात की ते संपल्यावरही संपत नाहीत. उलट ते तेव्हाच सुरू होतात. प्रत्येक आठवण पुन्हा पुन्हा मनात उलगडत राहते. प्रत्येक प्रसंग नव्याने जगावासा वाटतो. पन्हाळगड ते पावनखिंड ही पदभ्रमंती माझ्यासाठी तसाच प्रवास ठरला.
गेली चार वर्षे एक व्यक्ती सातत्याने माझ्या मागे लागली होती. "उमेशजी... यंदा काहीही झालं तरी यायचंच..." हा प्रेमळ आग्रह होता अकोल्यातील हिंदवी परिवाराचे सक्रिय मावळे आणि माझे मार्गदर्शक भूषणजी बापट यांचा. दरवर्षी मीही "यावेळी नक्की..." असं म्हणायचो; पण नियतीचा काही वेगळाच बेत असायचा. कधी काम, कधी जबाबदाऱ्या, तर कधी काही अनपेक्षित कारणं... आणि हा प्रवास पुन्हा पुढे ढकलला जायचा.
मात्र यावर्षी मनाने ठरवलं होतं, आता नाही तर कधीच नाही. कारण काही स्वप्नांना वारंवार पुढे ढकललं की ती स्वप्नं राहत नाहीत... ती हळूहळू पश्चात्ताप बनतात.
आणि मला हा पश्चात्ताप आयुष्यभर बाळगायचा नव्हता. म्हणून यंदा निर्णय झाला. जायचंच...
शिवरायांची वाट चालायचीच... इतिहासाच्या त्या पाऊलखुणा स्वतःच्या डोळ्यांनी पाहायच्याच.
२९ जुलै... अकोला रेल्वे स्थानकावर एक वेगळंच वातावरण होतं. कोणाच्या खांद्यावर सॅक होती, कोणाच्या हातात भगवा झेंडा होता, कोणाच्या चेहऱ्यावर उत्साह होता, तर कोणाच्या डोळ्यांत स्वराज्याचा अभिमान. आम्ही जवळपास साठ जण.
वय वेगवेगळं... व्यवसाय वेगवेगळे... स्वभाव वेगवेगळे... पण त्या दिवशी आमची ओळख फक्त एकच होती... आम्ही शिवरायांच्या वाटेवर चालायला निघालेलो मावळे होतो. महाराष्ट्र एक्स्प्रेस सुटली...
रेल्वेने वेग घेतला...आणि खिडकीबाहेर मागे सरकणाऱ्या अकोल्यासोबत दैनंदिन आयुष्यही मागे पडू लागलं.
गाडीत गप्पा रंगल्या. कोणी आधीच्या मोहिमांचे अनुभव सांगत होतं. कोणी पावनखिंडीचा इतिहास सांगत होतं.कोणी पहिल्यांदाच येत असल्यामुळे उत्सुकतेने प्रश्न विचारत होतं. मी मात्र जास्त वेळ खिडकीबाहेर पाहत बसलो होतो. बाहेर धावत जाणारी शेतं दिसत होती... पाऊस नुकताच पडून गेल्यामुळे हिरवागार झालेला विदर्भ दिसत होता... पण मन मात्र सतत सह्याद्रीकडे धावत होतं. कितीदा पुस्तकात वाचलेला तो पन्हाळगड... कितीदा चित्रपटात पाहिलेली ती पावनखिंड... कितीदा ऐकलेली बाजीप्रभूंची रणगर्जना... आता हे सगळं प्रत्यक्ष पाहायला मिळणार होतं. त्या विचारानेच मनात एक वेगळी धडधड सुरू झाली होती.
दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही कोल्हापूरला पोहोचलो. पहिल्याच क्षणी जाणवलं...या शहराच्या हवेतच इतिहास मिसळलेला आहे. शहर जागं होत होतं... रस्त्यांवर हलकी धावपळ सुरू झाली होती... आम्ही मात्र सर्वप्रथम करवीर निवासिनी श्री महालक्ष्मीच्या दर्शनासाठी निघालो. मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करताच एक अवर्णनीय शांतता मनात उतरली. प्रवासाची सुरुवात आईच्या आशीर्वादाने होत होती. त्या क्षणी मनात एकच प्रार्थना होती... "आई... हा प्रवास सुखरूप पूर्ण होऊ दे. पण त्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे हा इतिहास समजून घेण्याची बुद्धी आणि अनुभवण्याचं भाग्य दे." दर्शन झालं. मन प्रसन्न झालं. आणि आता खऱ्या प्रवासाची उत्सुकता आणखी वाढली.
३१ जुलैची सकाळ... ही सकाळ इतर कोणत्याही सकाळीसारखी नव्हती. आज आम्ही फक्त पर्यटनाला निघालो नव्हतो. आज आम्ही इतिहासाच्या दिशेने चालायला निघालो होतो. कोल्हापूर शहर मागे पडत होतं. रस्ता सह्याद्रीच्या दिशेने वळत होता. पावसाच्या सरी अधूनमधून काचांवर आदळत होत्या. डोंगर धुक्याची शाल पांघरून उभे होते. संपूर्ण वातावरणात एक विलक्षण गूढता होती. वाटेत प्रथमच ज्योतिबाचं दर्शन झालं. डोंगरमाथ्यावर वसलेलं ते देवस्थान... आजूबाजूला पसरलेलं धुकं... आणि त्या धुक्यातून उमटणारा भगव्याचा रंग... क्षणभर वाटलं, निसर्गालाही आज भगव्या रंगाचीच उधळण करायची आहे. ज्योतिबाचं दर्शन घेऊन आम्ही पुन्हा पुढे निघालो... आणि मला अजूनही आठवतं...
बसच्या खिडकीतून अचानक दूरवर काही काळसर तट दिसू लागले... कोणीतरी हळूच म्हणालं... "तो बघा... पन्हाळगड..." त्या एका वाक्याने बसमध्ये क्षणभर शांतता पसरली. सगळ्यांच्या नजरा त्या दिशेने वळल्या. माझ्याही... आणि पुढच्या काही क्षणांसाठी मी काहीच बोलू शकलो नाही... कारण दूरवर दिसणारा तो केवळ एक किल्ला नव्हता... तो माझ्या राजाचा इतिहास होता... तो स्वराज्याचा अभिमान होता... आणि पुढच्या तीन दिवसांसाठी तोच माझं जग होणार होता...
पन्हाळगड जसजसा जवळ येत होता, तसतसं मन अधिकच अस्वस्थ होत होतं. आयुष्यात अनेक किल्ले पाहिले होते. अनेक ऐतिहासिक वास्तूंचं वार्तांकन केलं होतं. पण त्या दिवशी समोर दिसणारा पन्हाळगड हा फक्त दगडांनी उभा केलेला किल्ला नव्हता. तो स्वराज्याच्या अस्तित्वाचा साक्षीदार होता. शिवरायांच्या दूरदृष्टीचा, धैर्याचा आणि संघर्षाचा जिवंत इतिहास होता.
बस पन्हाळगडाच्या पायथ्याशी पोहोचली. खाली उतरताच सह्याद्रीच्या थंडगार वाऱ्याने चेहऱ्यावर अलगद हात फिरवला. त्या वाऱ्यात एक वेगळाच स्पर्श होता. जणू तो सांगत होता..."स्वागत आहे... आता तुम्ही इतिहासाच्या भूमीत प्रवेश करत आहात."
गडावर चढत असताना सभोवताली पसरलेलं धुकं क्षणोक्षणी दाट होत होतं. अधूनमधून पावसाच्या सरी येऊन संपूर्ण परिसर चिंब भिजवत होत्या. हिरवाईने नटलेले तट, पावसाने धुऊन निघालेले दगड, दूरवर पसरलेले सह्याद्रीचे डोंगर... प्रत्येक दृश्य डोळ्यांत साठवून ठेवावंसं वाटत होतं.
गडावर पोहोचल्यानंतर सर्वप्रथम आम्ही शिवकालीन धान्यकोठार पाहिलं. आजच्या काळात आपण एखाद्या गोदामाकडे केवळ एक इमारत म्हणून पाहतो; पण हे धान्यकोठार पाहताना जाणवलं की स्वराज्य फक्त तलवारीच्या जोरावर उभं राहिलं नव्हतं. त्यामागे नियोजन होतं... दूरदृष्टी होती... प्रशासन होतं... हजारो सैनिकांच्या पोटाची काळजी घेणारी व्यवस्था होती. प्रत्येक दगड शिवरायांच्या राज्यकारभाराची साक्ष देत उभा होता.
त्यानंतर आम्ही सज्जाकोठीकडे निघालो. सज्जाकोठी... हे नाव उच्चारतानाच मनात अनेक प्रसंग उभे राहतात. याच वास्तूत बसून छत्रपती शिवाजी महाराजांनी सिद्दी जोहरच्या वेढ्यातून सुटण्याचा धाडसी निर्णय घेतला होता. इथेच विशाळगड गाठण्याची योजना आकाराला आली होती. स्वराज्याचं भविष्य ठरवणारा तो निर्णय या भिंतींनी ऐकला होता. मी त्या दगडी भिंतींवर अलगद हात ठेवला... डोळे मिटले... क्षणभर सगळं शांत झालं. आणि मनात एक विलक्षण चित्र उभं राहिलं... रात्र गडद झाली आहे... सिद्दी जोहरचं सैन्य गडाभोवती तळ ठोकून बसलं आहे... सज्जाकोठीत दिव्याच्या मंद प्रकाशात शिवराय आपल्या विश्वासू सरदारांसोबत चर्चा करत आहेत... बाहेर मृत्यू उभा आहे... आत स्वराज्याचं भविष्य ठरत आहे... डोळे उघडले तेव्हा पुन्हा वर्तमानात आलो; पण त्या काही क्षणांत इतिहासाने मला आपल्या कुशीत घेतलं होतं.
इतिहास वाचताना तो बुद्धीला स्पर्श करतो. पण इतिहासाच्या त्या भूमीवर उभं राहिल्यावर तो थेट हृदयाला स्पर्श करतो. सज्जाकोठीतून बाहेर आलो आणि पुढे पन्हाळगडाच्या मुख्य चौकात पोहोचलो. त्याआधी पन्हाळगड मोहिमेत ज्यांच्या बलिदानाने यशाचे तोरण लावला गेले त्या वीर शिवा काशिद यांच्या समाधीचे दर्शन घेतले. छत्रपतींच्या स्वराज्याच्या लढाईत शिवा काशिदांसारख्या एका ध्येयाने प्रेरित झालेल्या हजारो मावळ्यांच्या समिधा पायात काढल्या गेल्या आहेत. त्यामुळे शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याचा कळस चढू शकला. त्यानंतर पन्हाळगडाच्या मुख्य चौकात आलो. समोर नरवीर बाजीप्रभू देशपांडे यांचा भव्य पुतळा उभा होता. उंच मानेने... ताठ नजरेने... हातात तलवार घेऊन... क्षणभर आम्ही सारे नि:शब्द झालो. या महान योद्ध्यामुळेच आज आपण "पावनखिंड" हा शब्द अभिमानाने उच्चारतो. त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. "जय भवानी... जय शिवराय...""हर हर महादेव..." या घोषणांनी पन्हाळगड दणाणून गेला.
त्या घोषणांचा प्रतिध्वनी डोंगरकपारींमध्ये घुमत राहिला. आणि त्या प्रतिध्वनीसोबत आमच्याही मनात एक वेगळी ऊर्जा संचारली. क्षणभर वाटलं... आजूबाजूच्या दऱ्यांमधून कुठेतरी मावळे धावत येतील... आणि आपणही त्यांच्या मागे तलवार घेऊन निघू... इतका तो क्षण जिवंत होता. आणि मग... आमच्या पदभ्रमंतीची खरी सुरुवात झाली.
पन्हाळगड मागे पडू लागला होता. आता आम्ही सह्याद्रीच्या कुशीत खोलवर उतरू लागलो होतो. एका बाजूला ढगांनी मिठी मारलेले डोंगर... दुसऱ्या बाजूला धुक्याच्या पांढऱ्या चादरीत हरवून गेलेल्या दऱ्या... मधूनच हिरव्यागार भातशेतीत काम करणारे शेतकरी... तर वरून अखंड बरसणारा पाऊस. असा पाऊस, जो अंग भिजवत होता; पण मन मात्र विलक्षण हलकं करत होता. आम्ही पुढे चालत होतो. कुणी इतिहासाच्या गप्पा मारत होतं... कुणी सह्याद्रीचं सौंदर्य डोळ्यांत साठवत होतं... तर कुणी आपल्या थकलेल्या पायांकडे पाहून हसत पुन्हा पुढे निघत होतं. आणि मी... मी मात्र वारंवार मागे वळून पन्हाळगडाकडे पाहत होतो. धुक्याच्या आडून अधूनमधून त्याचे तट दिसत होते.
प्रत्येक वेळी वाटायचं... याच तटावर माझा राजा उभा राहिला असेल... याच वाटेकडे त्याने शेवटची नजर टाकली असेल... आणि मग स्वराज्य वाचवण्यासाठी मृत्यूच्या दिशेने पाऊल टाकलं असेल... पन्हाळगड आता पूर्णतः दिसेनासा झाला असला तरी इतिहास आमच्यासोबत चालू लागला. पहिल्या काही पावलांतच जाणवलं की ही वाट सोपी नाही. कुठे चिखल... कुठे घसरडी पायवाट... कुठे दगड... तर कुठे खोल उतार... पण त्या प्रत्येक पावलागणिक एकच विचार मनात घोळत होता... आज आपण पाठीवर सॅक घेऊन चालतोय... पायात मजबूत बूट आहेत... पावसापासून वाचवणारा रेनकोट आहे... पण साडेतीनशे वर्षांपूर्वी याच वाटेवरून मावळे तलवार, ढाल आणि स्वराज्याचं स्वप्न घेऊन धावत होते. त्यांच्या पायांना फोड आले नसतील का?... त्यांनाही थकवा आला नसेल का? नक्कीच आला असेल... पण त्यांच्या मनात एकच ध्यास होता... "राजे सुरक्षित विशाळगडावर पोहोचले पाहिजेत."
हा विचार त्यांच्या शरीरापेक्षा मोठा होता. म्हणूनच ते आजही अमर आहेत. सह्याद्रीच्या दऱ्या, हिरवाईने नटलेली शेतं, भातलावणीत गुंतलेले शेतकरी, डोंगरावरून कोसळणारे पांढरे शुभ्र धबधबे... निसर्ग आज त्याच्या सर्वोत्तम रूपात आमच्यासमोर उभा होता. वरून पडणाऱ्या पावसाच्या सरी जणू आम्हाला भिजवत नव्हत्या... त्या आम्हाला शुद्ध करत होत्या. मनात साचलेला थकवा, ताण, धावपळ... सगळंच त्या पावसाबरोबर वाहून जात होतं.
आम्ही चालत होतो... आणि सह्याद्री आमच्याशी बोलत होता. तो प्रत्येक डोंगर जणू एखादी कथा सांगत होता. प्रत्येक वळणावर इतिहास उभा होता. प्रत्येक दगडावर स्वराज्याचं नाव कोरलेलं जाणवत होतं. असं वाटत होतं... आपण चालत नाही... इतिहासच आपल्याला हात धरून पुढे घेऊन चाललाय... आणि पुढे... आमची वाट पाहत होतं, मसाई पठार.... इतिहासाच्या सर्वात थरारक पर्वाची सुरुवात जिथून होते... त्या पवित्र भूमीवर पाऊल ठेवण्यापूर्वीच मनाची धडधड वाढू लागली होती...
इतिहास कधी कधी इतका जिवंत होतो की, वर्तमान त्याच्यासमोर फिकं पडतं. त्या दिवशी माझ्याबाबत नेमकं तेच घडत होतं. दुपार जवळ येत होती. समोर एक विशाल मोकळं पठार दिसू लागलं. हिरवाईने नटलेलं... ढगांनी वेढलेलं... आणि तरीही मनात एक वेगळीच गंभीरता निर्माण करणारं... हेच होतं... मसाई पठार. पहिल्याच पावलात त्या भूमीने काहीतरी वेगळं जाणवून दिलं. इथं फक्त गवत नव्हतं. इथं फक्त वारा नव्हता. इथं इतिहास श्वास घेत होता. असं म्हणतात की काही भूमींच्या कणाकणात स्मृती साठलेल्या असतात. मसाई पठार त्यापैकीच एक.
कारण इथंच छत्रपती शिवाजी महाराज आणि सिद्दी जोहरच्या सैन्याची प्रत्यक्ष गाठ पडली होती. इथंच तलवारींचा आवाज घुमला होता. इथंच रणशिंग फुंकलं गेलं होतं. इथंच स्वराज्यासाठी रक्त सांडलं होतं. त्या भूमीवर उभा राहिलो... आणि नकळत माझे हात जोडले गेले. डोळे मिटले. मनात एकच भावना होती..."राजे... तुमच्या पावलांनी पावन झालेल्या या भूमीला माझा साष्टांग प्रणाम." त्या क्षणी आसपास उभे असलेले सातशेहून अधिक शिवभक्तही शांत झाले होते. जणू प्रत्येक जण आपापल्या मनात शिवरायांशी संवाद साधत होता.
थोड्याच वेळात हिंदवी परिवाराचे संस्थापक डॉ. शिवरत्न शेटे सर बोलायला उभे राहिले. त्यांच्या हातात ना कागद होता... ना पुस्तक... ना कोणती नोंद. पण त्यांच्या शब्दांत इतिहासाचं संपूर्ण विश्व होतं. पहिलंच वाक्य त्यांनी उच्चारलं... आणि आम्ही सगळे जण जणू काळाच्या प्रवाहात मागे वाहत गेलो. क्षणात वर्ष १६६० समोर उभं राहिलं. आता आमच्यासमोर हिरवंगार मसाई पठार नव्हतं. आमच्या डोळ्यांसमोर उभा होता पन्हाळगड... त्याभोवती सिद्दी जोहरचा अभेद्य वेढा... चारही बाजूंनी तैनात हजारो सैनिक... तोफांचा मारा... दारूगोळ्याचा धूर... गडावर अडकलेले शिवाजी महाराज... आणि स्वराज्याच्या भविष्याची चिंता... शेटे सर बोलत नव्हते... ते इतिहास जगवत होते. त्यांच्या आवाजात कधी तलवारींची धार जाणवत होती... कधी रणभेरी ऐकू येत होती...कधी शिवरायांचा निर्धार दिसत होता... तर कधी मावळ्यांच्या डोळ्यांतला जाज्वल्य विश्वास.
आम्ही ऐकत नव्हतो... आम्ही त्या प्रसंगाचा भाग बनलो होतो. इतिहास म्हणजे फक्त तारखा आणि घटना नसतात... इतिहास म्हणजे त्या काळातल्या माणसांच्या मनात डोकावण्याची संधी असते...हे त्या दिवशी प्रथमच इतकं खोलवर जाणवलं. शेटे सर सांगत होते... शिवरायांनी प्रत्येक डाव कसा आखला... सिद्दी जोहरच्या वेढ्याची प्रत्येक कडी कशी अभ्यासली... शिवा काशीदसारखा सामान्य न्हावी स्वराज्यासाठी स्वतःचा जीव कसा अर्पण करतो... आणि स्वराज्य म्हणजे एका माणसाचं नव्हे, तर लाखो लोकांच्या विश्वासाचं नाव कसं आहे... प्रत्येक प्रसंग अंगावर काटा आणत होता. अनेकांच्या डोळ्यांत पाणी तरळलं होतं. अन् आपसुकच माझ्याही...
पत्रकार म्हणून असंख्य भाषणं ऐकली होती. अनेक वक्ते पाहिले होते. पण त्या दिवशी जे घडत होतं, ते भाषण नव्हतं.तो इतिहासाचा पुनर्जन्म होता. इतिहास उत्कर्षबिंदूवर पोहोचला. सगळ्यांचा श्वास रोखला गेला. आता पुढे काय? आता शिवराय काय करतील... आता विशाळगड कसा गाठला जाईल?... आम्ही सगळे त्या कथेत इतके हरवून गेलो होतो की वर्तमान विसरलो होतो. आणि तेव्हाच... डॉ. शेटे सर शांत झाले. हलकंसं हसले. आणि म्हणाले... "इतिहासाचा पुढचा भाग... पावनखिंडीत."... क्षणभर कुणीच काही बोललं नाही. मग सगळ्यांच्या चेहऱ्यावर एकाच वेळी हास्य उमटलं. आता पावनखिंडीची ओढ कितीतरी पटीने वाढली होती. तोपर्यंत चालणारी पदभ्रमंती आता केवळ प्रवास उरली नव्हती. आता ती इतिहासाचा शेवटचा अध्याय स्वतःच्या डोळ्यांनी पाहण्याची तीव्र इच्छा बनली होती.
दुपारचं साधं पण मनापासून बनवलेलं जेवण उरकलं. थोडा वेळ विश्रांती घेतली. आणि पुन्हा आम्ही चालायला सुरुवात केली. आता काळ्याकुट्ट् ढगाआड लपलेला सूर्य पश्चिमेकडे झुकू लागला होता. सह्याद्रीवर संध्याकाळ अलगद उतरू लागली होती. ढग अधिकच खाली आले होते. वारा थंड झाला होता. पहिल्या दिवसाच्या पदभ्रमंतीचा शेवट जवळ येत होता. आणि समोर दिसू लागलं... खोतवाडी. सह्याद्रीच्या कुशीत विसावलेलं एक छोटंसं, शांत, निरागस गाव. हे गाव पाहताच शहरात राहणाऱ्या मनाला पहिल्यांदा कळलं... समृद्धी म्हणजे नेहमी मोठ्या इमारती नसतात. समृद्धी म्हणजे अशीही असते... जिथे माणसं घराचे दरवाजेच नाही, तर मनाची दारंही उघडी ठेवतात.
त्या रात्री आम्हा सर्वांची व्यवस्था गावकऱ्यांच्या घरांमध्ये करण्यात आली होती. पहिल्यांदाच भेटणारी माणसं...पण स्वागत मात्र घरच्या माणसांसारखं. कोणी गरम चहा घेऊन उभं... कोणी जेवण वाढत होतं... कोणी विचारत होतं... "थकला असाल ना? आधी हातपाय धुवा..." त्या क्षणी जाणवलं... शिवरायांनी फक्त किल्ले नाही उभारले...त्यांनी माणुसकीची परंपराही घडवली.
रात्री बाहेर पडलो. संपूर्ण गाव काळोखात विसावलं होतं. मोबाईलला रेंज नव्हती. वाहनांचा आवाज नव्हता. फक्तक्ष रातकिड्यांचं आणि बेडकांचं संगीत... झाडांवरून टपटपणाऱ्या पावसाच्या थेंबांचा नाद... आणि सह्याद्रीच्या कुशीत पसरलेली निरव शांतता... अशा शांततेचा आवाज मी आयुष्यात प्रथमच ऐकत होतो. त्या रात्री झोपताना एकच विचार मनात होता... आज इतिहासाने माझा हात धरला आहे... उद्या तो मला आणखी कुठे घेऊन जाणार आहे...?
पहाट अजून पूर्ण उजाडली नव्हती. खोतवाडीच्या डोंगररांगांवर धुक्याची पांढरी चादर अलगद पसरली होती. रात्रभर पडलेल्या पावसामुळे मातीचा सुगंध संपूर्ण गावभर दरवळत होता. कोंबड्याच्या आरवण्याने गाव जागं होत होतं, पण सह्याद्री मात्र अजून शांत होता. जणू तोही आमची वाट पाहत होता. रात्री गावकऱ्यांच्या घरात इतक्या समाधानाने झोप लागली होती की, सकाळी जाग आली तेव्हा क्षणभर आपण कुठे आहोत, हाच प्रश्न पडला. मोबाईल नव्हता, नेटवर्क नव्हतं, शहराचा गोंगाट नव्हता... फक्त निसर्ग होता. कित्येक वर्षांनी आयुष्य इतकं शांत झालं होतं.
गरमागरम चहा हातात घेतला आणि घराच्या ओसरीवर उभा राहिलो. समोर हिरव्या डोंगरांच्या कुशीत हरवलेलं खोतवाडी हळूहळू जागं होत होतं. अंगण झाडणाऱ्या आजी, गुरं सोडणारे शेतकरी, धुराच्या रेषा काढत पेटलेल्या चुली... या दृश्यांनी मनात एक वेगळीच उब निर्माण केली. साधा नाश्ता झाला.सॅक पुन्हा खांद्यावर चढली.बुटांची लेस घट्ट बांधली. रेनकोट अंगावर चढवला. आणि आम्ही पुन्हा एकदा "जय भवानी... जय शिवराय!"च्या गर्जनेने सह्याद्रीच्या दिशेने निघालो.
आजचा दिवस वेगळा होता. आज तब्बल बत्तीस किलोमीटरचा प्रवास करायचा होता. अनुभवी मावळे सहज म्हणत होते, "आज खरी परीक्षा आहे." तेव्हा त्या वाक्याचं गांभीर्य पूर्णपणे कळलं नव्हतं. पण पुढच्या काही तासांत सह्याद्रीने त्या प्रत्येक शब्दाचा अर्थ स्वतः शिकवला. गाव मागे पडलं. पायवाट जंगलात शिरली. आणि काही मिनिटांतच सभोवताली इतकं दाट जंगल पसरलं की वर आकाश आहे, हेही विसरायला झालं. प्रचंड उंच झाडं... त्यांना बिलगलेल्या वेली... पायाखाली चिखल... मधूनच एखादा ओढा...तर कधी गुडघ्यापर्यंत पाणी साचलेला नाला... वरून अखंड कोसळणारा पाऊस... या सगळ्यांच्या मध्ये आम्ही चालत होतो.
पाऊस इतका सतत पडत होता की काही वेळाने भिजण्याची जाणीवच संपली. कपडे भिजले, बूट भिजले, सॅक भिजली... पण मन मात्र विलक्षण हलकं होत गेलं. काही वेळाने लक्षात आलं... शहरात आपण पावसापासून स्वतःला वाचवत असतो.इथे मात्र आम्ही पावसात स्वतःला हरवत होतो. तो पाऊस अंगावर पडत नव्हता. तो मनावर पडत होता. जंगलात पक्ष्यांचे आवाज घुमत होते. मधूनच एखादा मोर आरवत होता. दूरवर एखादा धबधबा कोसळण्याचा आवाज ऐकू येत होता. निसर्गाचं हे संगीत इतकं मोहक होतं की काही वेळ आम्ही सगळेच शांत झालो. कोणी बोलत नव्हतं. कारण त्या शांततेतही खूप काही ऐकू येत होतं.
अचानक समोर एक मोठा ओढा आला. रात्रभराच्या पावसामुळे तो दुथडी भरून वाहत होता. पाणी प्रचंड वेगाने धावत होतं. एका मागोमाग एक जण ओढा पार करू लागला. समोर उभे असलेले हिंदवी परिवाराचे मावळे प्रत्येकाला हात देत होते. कुणाचा हात धरून... कुणाची सॅक उचलून... कुणाला धीर देत... त्या क्षणी जाणवलं... ही मोहीम सातशे लोकांची असली, तरी इथे कोणीही एकटा नाही. याचं नाव परिवार. आणि म्हणूनच त्याचं नाव हिंदवी परिवार...
असा एकही क्षण आला नाही, जेव्हा कोणाला मागे सोडलं गेलं. प्रत्येक पाऊल एकत्र. प्रत्येक अडथळा एकत्र. प्रत्येक विजयही एकत्र. यातच या मोहिमेचं खरं सौंदर्य दडलं होतं. दुपार जवळ येत होती. पायांमध्ये थकवा जाणवू लागला होता. खांद्यावरची सॅक आता जड वाटू लागली होती. गुडघे कुरकुर करू लागले होते. पण आश्चर्य म्हणजे... मन अजूनही ताजंतवानं होतं. मी स्वतःला एक प्रश्न विचारला... "हा उत्साह नेमका कुठून येतोय?" आणि लगेच उत्तरही मिळालं. कारण ही वाट फक्त जंगलातून जात नव्हती... ती इतिहासातून जात होती. याच पायवाटांवरून छत्रपती शिवाजी महाराज गेले होते. याच दऱ्यांमधून मावळ्यांनी राजांचं रक्षण केलं होतं. याच जंगलाने स्वराज्याचा श्वास लपवून ठेवला होता.मग थकवा येणारच कसा?
दुपारच्या सुमारास एका मोकळ्या जागी एका मोठ्या दगडावर बसून आम्ही काही सहकारी जेवलोत. साधं जेवण... पोळी आणि मटकीची उसळ... आणि त्यावर पावसाची साथ. पंचतारांकित हॉटेलमध्ये कितीही महाग जेवण मिळालं, तरी त्या दिवशी त्या जंगलात खाल्लेल्या साध्या जेवणाची चव आयुष्यभर विसरणं अशक्य आहे. पुन्हा प्रवास सुरू झाला. आता पाय अधिकच जड झाले होते. पण सहप्रवाशांच्या गप्पा, हास्य, घोषणांनी ऊर्जा पुन्हा मिळत होती.
या संपूर्ण प्रवासात मला काही सुंदर माणसं भेटली. नागपूरचा पोलीस दलातील अभिषेक हरदास... नेहमी हसतमुख. थकवा चेहऱ्यावर दिसू न देणारा... पोट धरून हसवणाऱ्या अनेक किश्यांचा मोठा खजिना असलेला माणुस... आधीपासून परिचित असलेले अतुलभाऊ चौधरी... पण या प्रवासात नव्यानं समजलेले. आणि ज्याच्यामुळे या प्रवासाची ऊर्जा मिळाली असा माझा मित्र अविनाशभाऊ काळे... कठीण प्रवास सुंदर करण्याचं काम निसर्ग करतो... पण तो अविस्मरणीय करण्याचं काम माणसं करतात. या तिघांनी माझ्यासाठी तेच केलं.
संध्याकाळ जवळ येऊ लागली. शेवटच्या काही किलोमीटरमध्ये शरीर अक्षरशः थकलं होतं. पण अचानक समोर एक फलक दिसला... "पांढरेपाणी." त्या एका शब्दाने सगळा थकवा कुठच्या कुठे पळून गेला. कारण हे फक्त गाव नव्हतं. हा इतिहासातील शेवटचा मुक्काम होता. ही ती भूमी होती जिथून पुढे शिवरायांचा इतिहास एका निर्णायक वळणावर जाणार होता. गावात पोहोचल्यावर सगळ्यांनी एकमेकांकडे पाहिलं. कुणी काही बोललं नाही. पण प्रत्येकाच्या चेहऱ्यावर समाधान स्पष्ट दिसत होतं. आज आम्ही स्वतःवर विजय मिळवला होता. जवळपास बत्तीस किलोमीटरचा प्रवास पूर्ण झाला होता. शरीर थकलं होतं. पण मन... मन मात्र पूर्वीपेक्षा कितीतरी अधिक मजबूत झालं होतं. रात्री मोठ्या हॉलमध्ये मुक्कामाची व्यवस्था होती. कुणी पाय चोळत होतं... कुणी दिवसाच्या आठवणी सांगत होतं...कुणी उद्याच्या पावनखिंडीची स्वप्नं पाहत होतं. मी मात्र शांतपणे एका कोपऱ्यात बसलो होतो.
बाहेर पुन्हा पाऊस सुरू झाला होता. त्या पावसाचा आवाज ऐकत असताना एकच विचार मनात आला... आज सह्याद्रीने माझी परीक्षा घेतली... आणि उद्या... उद्या तो मला त्या भूमीवर घेऊन जाणार होता... जिथे बाजीप्रभूंनी आपल्या रक्ताने इतिहास लिहिला होता. त्या विचारानेच अंगावर पुन्हा एकदा रोमांच उभे राहिले. त्या रात्री झोप डोळ्यांवर होती... पण मन मात्र आधीच पावनखिंडीत पोहोचलं होतं...
२ ऑगस्ट... पहाट अजून पूर्ण उजाडली नव्हती. पांढरेपाणी गावावर हलकंसं धुकं पसरलं होतं. रात्रीचा पाऊस नुकताच थांबला होता. झाडांच्या पानांवरून टपकणारे थेंब, दूरवरून ऐकू येणारा पक्ष्यांचा मंद स्वर आणि सह्याद्रीच्या दऱ्यांतून वाहणारा थंडगार वारा... सगळंच काहीसं विलक्षण शांत होतं. पण त्या शांततेच्या आड प्रत्येकाच्या मनात एक वेगळीच धडधड सुरू होती. कारण आजचा दिवस वेगळा होता. आज आम्ही त्या भूमीकडे निघालो होतो, जिचं नाव घेतानाही महाराष्ट्राचा प्रत्येक माणूस अभिमानाने उभा राहतो. पावनखिंड...
नाश्ता उरकला. सॅक खांद्यावर घेतली. आणि आम्ही पुन्हा चालायला सुरुवात केली. आजचा प्रवास फक्त चार किलोमीटरचा होता. पण त्या चार किलोमीटरचं अंतर कधी इतकं मोठं वाटेल, असं वाटलं नव्हतं. प्रत्येक पाऊल पुढे पडत होतं... आणि मन मात्र साडेतीनशे वर्षं मागे चाललं होतं. हीच ती वाट... जिथून शिवराय विशाळगडाकडे निघाले. हीच ती वाट... जिथून बाजीप्रभू मृत्यूला सामोरं जायला पुढे सरसावले. हीच ती वाट... जिथे काही मोजक्या मावळ्यांनी हजारोंच्या सैन्याला रोखून धरलं. सह्याद्री आजही तसाच उभा होता. दऱ्या तशाच होत्या. डोंगर तेच होते. पाऊसही कदाचित तसाच पडत असावा. बदललं होतं ते फक्त काळाचं पान. इतिहास अजूनही तिथेच उभा होता.आणि आम्ही त्याच्याकडे चाललो होतो.
अचानक समोर भगवे ध्वज दिसू लागले. दूरवर स्मारकाचं शिखर दिसलं. कुणीतरी हलक्या आवाजात म्हणालं... "आली... पावनखिंड." क्षणभर सगळेच थांबले. पुढे चालण्यापूर्वी प्रत्येकाने नकळत पायातील चिखल झटकला. जणू एखाद्या मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी स्वतःला शुद्ध करतो, तसं. कारण ही जागा फक्त ऐतिहासिक नव्हती. ही भूमी तीर्थक्षेत्र होती.
आम्ही स्मारकाजवळ पोहोचलो. पहिलं पाऊल त्या भूमीवर ठेवलं... आणि अक्षरशः अंगावर शहारा आला. मी नकळत खाली वाकलो. त्या मातीला हात लावला. दोन्ही हात जोडले. आणि काही क्षण डोळे मिटून उभाच राहिलो. त्या क्षणी मला त्या मातीचा स्पर्श जाणवत नव्हता. जाणवत होता... तो बाजीप्रभूंच्या रक्ताचा इतिहास. त्या मातीत एक विलक्षण उब होती. त्यागाची... पराक्रमाची... स्वराज्याच्या प्रेमाची... डोळे उघडले... समोर स्मारक होतं.
पण माझ्या मनात एक वेगळंच दृश्य उभं राहिलं. घोडखिंडीत रणांगण पेटलं आहे. चारही बाजूंनी शत्रूचा मारा सुरू आहे. तलवारींच्या ठिणग्या उडत आहेत. घोड्यांचा टापांचा आवाज घुमतो आहे. बाजीप्रभू रक्ताने माखलेले आहेत. शरीरावर जखमा आहेत. पण हातातली तलवार अजूनही थांबलेली नाही. एकच ध्यास... "जोपर्यंत विशाळगडावरून तोफांचा आवाज येत नाही, तोपर्यंत ही खिंड सोडायची नाही." हे वाक्य आपण पुस्तकात वाचतो. पण पावनखिंडीत उभं राहून त्याचा अर्थ समजतो. त्या एका वाक्यात स्वराज्याचं संपूर्ण तत्त्वज्ञान दडलं आहे.स्वतःपेक्षा मोठं ध्येय. स्वतःपेक्षा मोठा राजा. स्वतःपेक्षा मोठा देश.
थोड्याच वेळात डॉ. शिवरत्न शेटे सर पुन्हा उभे राहिले. मसाई पठारावर जिथे त्यांनी इतिहास थांबवला होता... तिथूनच त्यांनी पुन्हा सुरुवात केली. आणि पुन्हा एकदा आम्ही वर्तमानातून निसटलो. त्यांच्या शब्दांतून बाजीप्रभू लढत होते. फुलाजीप्रभू लढत होते. बांदल मावळे लढत होते. तोफेचा आवाज ऐकण्यासाठी मृत्यूशी झुंजणारे प्रत्येक मावळे आमच्यासमोर जिवंत झाले. सरांच्या आवाजातला कंप... शब्दांमधली वेदना... आणि वर्णनातील जिवंतपणा... यामुळे सभोवताली उभ्या असलेल्या अनेकांच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले...माझ्याही. पत्रकार म्हणून अनेकदा घटनास्थळी भावना बाजूला ठेवाव्या लागतात. पण त्या दिवशी... त्या भूमीवर... ते शक्यच नव्हतं. कारण तिथे पत्रकार नव्हता. तिथे फक्त एक शिवभक्त उभा होता.
कार्यक्रम संपला. लोक हळूहळू निघू लागले. पण माझे पाय तिथून हलत नव्हते. मी पुन्हा एकदा मागे वळून पावनखिंडीकडे पाहिलं. मनात एकच विचार आला... जर त्या दिवशी बाजीप्रभूंनी स्वतःचा देह या खिंडीत अडवला नसता... तर कदाचित महाराष्ट्राचा इतिहासच वेगळा लिहिला गेला असता. आपण आज ज्या स्वराज्याचा अभिमान बाळगतो... त्याच्या प्रत्येक अक्षरावर या भूमीचं ऋण आहे.
या तीन दिवसांत मला नेमकं काय मिळालं?..नवे मित्र?.. हो... अभिषेक हरदास, अतुलभाऊ चौधरी, अविनाशभाऊ काळे आणि असे अनेक सुंदर माणसं आयुष्याला मिळाली. अविस्मरणीय आठवणी?.. हो... त्या तर आयुष्यभरासाठी सोबत आहेत. पण त्याहीपेक्षा मोठी गोष्ट मिळाली... स्वतःकडे पाहण्याची एक नवी दृष्टी. या पदभ्रमंतीने मला शिकवलं... थकवा शरीरात असतो... हार मनात असते. ध्येय मोठं असेल तर पाय आपोआप चालत राहतात. स्वार्थ माणसाला मोठं बनवत नाही... त्याग बनवतो. यश माणसाला अमर करत नाही... समर्पण करतं. आणि म्हणूनच... आजही शिवराय जिवंत आहेत. आजही बाजीप्रभू जिवंत आहेत. कारण त्यांनी आयुष्य जगलं नाही... ते एका विचारासाठी जगले.
या संपूर्ण मोहिमेचं श्रेय अर्थातच हिंदवी परिवाराला जातं. सातशेच्या जवळपास शिवभक्त... महाराष्ट्रासह कर्नाटक, गुजरात आणि गोव्यातून आलेले सहभागी... पण कुठेही गोंधळ नाही. व्हीआयपी संस्कृती नाही. पदाचा अहंकार नाही. प्रत्येक जण फक्त एक मावळा. प्रत्येक जण फक्त शिवरायांचा. ही संस्कृती जपणाऱ्या हिंदवी परिवाराचे संस्थापक डॉ. शिवरत्न शेटे, अकोल्यातील आमचे प्रेरणास्थान भूषणजी बापट आणि या मोहिमेला यशस्वी करणाऱ्या प्रत्येक मावळ्याप्रती माझ्या मनात आयुष्यभर कृतज्ञता राहील.
४ ऑगस्टला जेव्हा अकोल्याच्या रेल्वे स्थानकावर उतरलो... तेव्हा माझ्या सॅकमध्ये तीन दिवसांचे कपडे होते. थोडा चिखल होता. काही ओले कपडे होते. पण त्याहीपेक्षा मौल्यवान अशी एक गोष्ट मी घेऊन आलो होतो. इतिहास जगल्याचा अनुभव. आजही डोळे मिटले की सह्याद्री दिसतो. मसाई पठार दिसतं. खोतवाडीची शांत रात्र आठवते. पांढरेपाणीचं पहाटेचं धुकं आठवतं. आणि सर्वात जास्त आठवते... पावनखिंडीची ती माती... जिला स्पर्श करताना माझे डोळे नकळत भरून आले होते. काही प्रवास तुम्हाला नवे प्रदेश दाखवतात. काही प्रवास नवी माणसं भेटवतात. पण काही निवडक प्रवास असे असतात... जे तुम्हाला तुमचंच नव्याने दर्शन घडवतात. पन्हाळगड ते पावनखिंड हा माझ्यासाठी तसाच प्रवास ठरला.
आज माझ्या आयुष्याच्या स्मरणपटलावर जर काही अविस्मरणीय क्षण कायमचे कोरले गेले असतील, तर त्यात या तीन दिवसांचा क्रम खूप वरचा असेल. कारण... ज्या वाटेवरून छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य वाचवण्यासाठी चालले... ज्या खिंडीत बाजीप्रभूंनी आपल्या रक्ताने इतिहास लिहिला... त्या वाटेवर माझीही काही पावलं उमटली... यापेक्षा मोठं भाग्य एका शिवभक्तासाठी आणखी काय असू शकतं?
जय भवानी!
जय शिवराय!....
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
























