(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Karuna Sharma | करुणा शर्मा राजकारणात येणार?
मुंबई : धनंजय मुंडे यांची लिव्ह इन पार्टनर असल्याचा दावा करणाऱ्या करुणा शर्मा आता सक्रिय राजकारणात येण्याची शक्यता आहे. मला आमदारकीची निवडणूक लढवायची आहे, असं करुणा शर्मा यांनी म्हटलं आहे. पी उत्तर विभागातील प्रश्न घेऊन करुणा शर्मा यांनी आज महापालिकेत महापौर किशोरी पेडणेकर यांची भेट घेतली.
"मला आधी चांगली समाजसेवा करायची आहे. 25 वर्ष मी घरात होते. आता 2 ते 3 महिने झाले घराबाहेर पडले आहे. राजकारण अजून खूप लांब आहे. पण करावं लागलं तर नक्की करेन. मला लोकांच्या मनापर्यंत पोहोचायचे आहे. स्वच्छतागृह आणि कचराप्रश्न घेऊन आज महापालिकेत आले होते. मी समाजसेविका आहे. राजकारणातही येईल. मला आमदारकीची निवडणूक लढवायची आहे, असं करुणा शर्मा यांनी म्हटलं आहे.
करुणा शर्मा यांनी अतिरिक्त पोलीस आयुक्तांकडेही एक तक्रार केली आहे. सोशल मीडियावर खलिफा डॉट कॉमसारख्या अॅप्लिकेशनविरोधात फेसबुक आणि इतर समाजमाध्यमांवर अश्लील व्हिडीओ असतात, त्याविरोधात कारवाई झाली पाहिजे, असं त्यांनी आपल्या तक्रारीत म्हटलं आहे. त्या पुढे म्हणाल्या की, "आम्ही आता निवेदन दिले आहे. सध्या इंटरनेटवर खूप वाईट व्हिडीओ वायरल होत आहेत. काही साईट या अश्लीलता पसरवतात. फेसबुकवर सुद्धा काही व्हिडीओ पॉप अप होतात. ते बंद व्हावं," अशी मागणी केली आहे.
"मी 25 वर्षे कधीच घराबाहेर पडले नाही. गेल्या 2 महिन्यांपासून मी घराबाहेर पडून बोलायला सुरुवात केली आहे," असंही करुणा शर्मा यांनी म्हटलं.