(Source: ECI/ABP News/ABP Majha)
पुण्यातील कुख्यात गँगकडून माझ्या जीवितास धोका; माजी आमदाराचा दावा, पोलीस संरक्षणाची मागणी
Ramesh Kadam : पुण्यातील नामचीन टोळीकडून माझ्या जीवितास धोका असल्याचा दावा माजी आमदाराने केला असून पोलीस संरक्षणाची मागणी केली आहे.
सोलापूर : माझ्या जीविताला धोका असून पोलीस संरक्षण (Police Protection) मिळावे, अशी मागणी मोहोळचे माजी आमदार रमेश कदम (Ramesh Kadam) यांनी केली आहे. पुण्यातील (Pune) नामचीन टोळीकडून माझ्या जीवितास धोका असल्याचा दावा त्यांनी केला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे
याबाबत अधिक माहिती अशी की, मोहोळचे माजी आमदार रमेश कदम यांनी सोमवारी पोलीस अधीक्षकांची भेट घेतली. यावेळी पुण्यातील नामचीन टोळीकडून माझ्या जीवितास धोका असल्याचा दावा त्यांनी केला आहे. रमेश कदम यांनी पोलीस अधीक्षकांना याबाबत सविस्तर माहिती दिली असून पोलीस संरक्षणाची मागणी त्यांनी केली आहे.
नेमकं काय म्हणाले रमेश कदम?
रमेश कदम यांनी म्हटले आहे की, माझ्या जीविताला धोका आहे. माझे अपहरण करून खंडणी किंवा जीवे मारण्यासाठी पुण्यातील नामचीन टोळीला सुपारी देण्यात आली आहे. याप्रकरणी काही दिवसांपूर्वी तीन आरोपींना अटक झाली असून मुख्य आरोपी आबा काशीद अद्यापही फरार आहे. आरोपी आबा काशीद हा पुण्यातील नामचीन टोळीचा सदस्य असल्याने माझ्या जीवितास धोका आहे. त्यामळे जोपर्यंत या प्रकरणाचा तपास लागत नाही, तोपर्यंत मला पोलीस संरक्षण द्यावे, अशी त्यांनी म्हटले आहे.
दोन जण ताब्यात
दरम्यान, रमेश कदम यांच्याकडून खंडणी घेणे किंवा त्यांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने त्यांचे अपहरण करण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी मोहोळ पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी मोहोळ पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.
कोण आहेत रमेश कदम?
रमेश कदम हे मोहोळ विधानसभा मतदारसंघात (Mohol Vidhan Sabha Constituency) 2014 साली राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडून आले होते. अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळात आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी रमेश कदम यांना अटक झाली होती. 2019 साली त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या काळात तुरुंगात असताना अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करून मोहोळ विधानसभेची निवडणूक लढवली होती. 2024 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) त्यांनी महायुतीला पाठिंबा दिला.
इतर महत्त्वाच्या बातम्या