(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Devendra Fadnavis PC : नवाब मलिक यांचे अंडरवर्ल्डशी संबंध : देवेंद्र फडणवीस ABP Majha
Devendra Fadnavis Press Conference : दाऊदच्या निकटवर्तीयांनी मलिकांच्या कुटुंबियांच्या कंपनीला जमीन विकली, असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिकांवर निशाणा साधला आहे. तसचे कुर्ल्यातील कोट्यवधींची जमीन केवळ 30 लाखांमध्ये कशी खरेदी केली? असा प्रश्नही देवेंद्र फडणवीसांनी उपस्थित केला आहे.
देवेंद्र फडणवीस बोलताना म्हणाले की, "काही दिवसांपूर्वी मी एक घोषणा केली होती. काही गोष्टी दिवाळीनंतर मी तुम्हा सर्वांसमोर मांडेल. पण काहीसा उशीर झाला. कागदही गोळा होत होते. काही लोकांच्या पत्रकार परिषदांचे दिवस आधीच बुक होते. म्हणून मला थोडासा वेळ लागला. मी जे सांगणार आहे तो अत्यंत गंभीर आणि राष्ट्राच्या सुरक्षेशी निगडीत मुद्दा आहे. सर्वात आधी मी दोन पात्रांबाबत मी तुम्हाला सांगणार आहे. त्यातील एक म्हणजे, सरदार शाह वली खान. हा 1993 बॉम्ब ब्लास्टमधील गुन्हेगार आहे. याला आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे आणि सध्या ते तुरुंगात शिक्षा भोगत आहेत. यांच्यावर आरोप होता की, टायगर मेमनच्या नेतृत्त्वात हा फायर ट्रेनिंगमध्ये सहभागी झाला होता. बॉम्बे स्टॉक एक्चेंज आणि मुंबई महापालिकेत बॉम्ब कुठे ठेवायचा? या दोन्ही ठिकाणी बॉम्ब कुठे ठेवायचा याची रेकी त्यानं केली होती. तसेच टायगर मेमनच्या घरी बॉम्ब स्फोटाचं जे कारस्थान झालं होतं, त्या सर्व बैठकांना हा उपस्थित होता. तसेच टायगर मेमनच्या घरातील गाड्यांमध्ये आरडीएक्स भरण्यात आलं, त्यामध्येही हा सहभागी होता."
"या प्रकरणातील दुसरं पात्र म्हणजे, मोहम्मद सलीम पटेल हा दाऊदचा माणूस आहे. काही वर्षांपूर्वी ज्यावेळी आर. आर. पार्टी एका इफ्तार पार्टीसाठी गेले होते. त्यानंतर एका दाऊदच्या माणसासोबत त्यांचा फोटो आला होता. तो माणूस म्हणजे, सलीम पटेल.", हे सांगताना आर. आर. पाटलांचा या प्रकरणाशी काहीही संबंध नव्हता, फोटोमुळे त्यांच्यावर प्रश्न उपस्थित करण्यात आले होते, असंही देवेंद्र फडणवीसांनी यावेळी स्पष्ट केलं. पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "मोहम्मद सलीम पटेल हा दाऊदचा माणूस. दाऊची बहिण हसीना पारकरचे ते चालक होते."
"कुल्यामध्ये एलबीएस रोडवर जवळपास 3 एकराची जागा आहे. एलबीएस रोडवर अगदी महागडी जागा होती. सरदार शाहवली खान आणि सलीम पटेल यांनी मलिक कुटंबाच्या कंपनीला जमीन विकली. या कंपनीच्या वतीनं जागेच्या कागदपत्रांवर फराज मलिक यांनी सही केली आहे. आजही ही कंपनी नवाब मलिक यांच्या कुटुंबियांची आहे. काही काळ स्वतः नवाब मलिकही या कंपनीचे डायरेक्टर होते. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, सरदार शाहवली खान आणि सलीम पटेल यांनी सॉलिडस कंपनीला ही जागा केवळ 30 लाख रुपयांना विकली आहे. कुर्ल्यातील जवळपास तीन एकर जमीन 30 लाखांना विकली. तर याचं पेमेंट केलंय 20 लाखांचं. आजही त्या ठिकाणी एक मोठं शेड सॉलिडस कंपनीनं भाड्यानं दिलेलं आहे.", असं ते म्हणाले. पुढे बोलताना ते म्हणाले की, "मला मिळालेल्या माहितीनुसार, आजही एक कोटी महिना या जागेचं भाडं सॉलिडसला मिळतंय." , असंही फडणवीस म्हणाले.