Kareena Kapoor आणि Amruta Arrora ला कोरोना झाल्यानंतर महापालिका प्रशासनाला जाग
Covid Negative : अभिनेत्री करीना कपूर (Kareena kapoor) आणि अमृता अरोरा यांना कोरोनाची (coronavirus) लागण झाली आहे. या अभिनेत्रींनी कोरोना नियमांचं पालन न करता अनेक पार्ट्यांमध्ये हजेरी लावली होती. त्यामुळे या अभिनेत्रींना कोरोनाची लागण झाल्याचं सांगितलं जातंय. दोन्ही अभिनेत्रींच्या संपर्कातील सर्वांना आरटीपीसीआर चाचणी करण्याचे आदेश मुंबई महानगरपालिकेनं दिले आहेत. त्यानुसार अभिनेत्री नीलम कोठारी आणि भावना पांडेची कोरोना टेस्ट करण्यात आली असून दोघांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली आहे.
सीमा खान आणि महीप कपूरलादेखील कोरोनाची लागण झाली आहे. सीमा आणि महीप या दोघींनी करण जोहरच्या पार्टीला हजेरी लावली होती. या पार्टीमध्ये नीलम आणि भावना उपस्थित नसल्या तरी एकत्र शूटिंग केल्यामुळे नीलम आणि भावनाची कोरोना टेस्ट करण्यात आली होती. पण त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे.
कसा झाला अभिनेत्री करीना कपूरला कोरोना?
बॉलिवूड पार्ट्यांमुळे करीना कपूर आणि अमृता अरोरा या दोन अभिनेत्रींना कोरोनाचा संसर्ग झाला आहे असे बोलले जात होते. त्यातच आता करीनाच्या प्रवक्त्याने याबाबत अधिकृत माहिती दिली आहे. "संपूर्ण लॉकडाऊन दरम्यान करीना खबरदारी घेत होती. घरातून बाहेर पडताना ती अत्यंत काळजी घ्यायची. परंतु, दुर्देवाने ती आपली जवळची मैत्रिण अमृता अरोरासोबत एका डिनर पार्टीमध्ये सहभागी झाली होती. त्यामुळे करीनाला कोरोना झाला. या डिनर पार्टीत काही निवडक मित्रांचादेखील सहभाग होता. विशेष म्हणजे बाहेर जशा चर्चा सुरू आहेत तशी ही पार्टी खूप मोठी नव्हती. या पार्टीत एक आजारी व्यक्ती सहभागी झाली होती आणि त्याला सतत खोकला येत होता. त्याच्यापासूनच करीना आणि अमृताला कोरोनाची लागण झाली आहे. संबंधीत व्यक्तीने जबाबदारीचे भान राखून या पार्टीत सहभागी व्हायला नको होते." असे मत करीनाच्या प्रवक्त्याने व्यक्त केले आहे.