Amey Khopkar MNS: Damodar Natyagruha आहे त्या जागेवर पुन्हा बांधा, अन्यथा रस्त्यावर उतरू
Damodar Natyagruha : मुंबईतील 100 वर्षे जुन्या दामोदर नाट्यगृहाचा (Dampdar Natyagruha) पुनर्विकास होत आहे. दामोदर नाट्यगृहाच्या पाडकामाला आता सुरुवात झाली आहे. दामोदर नाट्यगृह आणि त्याच परिसरात असलेल्या सोशल सर्विस लीग शाळेचा पुनर्विकास केला जात आहे. या सगळ्या कामाची पाहणी आज मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगनणी यांनी केली. ऐतिहासिक नाट्यगृहाच्या जागी खासगी शाळेची वास्तू उभारण्याचा प्रस्ताव आहे. पण याविरोधात नाट्यकर्मींमध्ये मात्र नाराजी आहे. दामोदर नाट्यगृह वाचवण्यासाठी प्रशांत दामले (Prashant Damle) यांनीही उपोषणाचा इशारा दिला आहे. नाट्यगृहाच्या जागेवर शाळा पुढील दोन वर्षात पूर्ण झाल्यानंतर शाळेच्या जागेवर दामोदर नाट्यगृह उभे केले जाणार, असं दामोदर नाट्यगृह ट्रस्टचे सचिव प्रकाश कोंडूरकर म्हणाले आहेत.
एबीपी माझाशी बोलताना दामोदर नाट्यगृह ट्रस्टचे सचिव प्रकाश कोंडूरकर (Prakash Kondurkar) म्हणाले की,"दामोदर नाट्यगृहाच्या इमारतीचं पाडकाम करुन तिथे शाळेची इमारत उभी केली जाणार आहे. तर शाळेची इमारत उभी आहे तिथे दामोदर नाट्यगृहाची इमारत उभी राहील. आमच्या शाळेत जवळपास 3000 विद्यार्थी शिक्षण घेतात. शाळेची इमारत पाडून तिथेच शाळेची इमारत बांधायची हे शक्य होणार नाही कारण विद्यार्थी शिकणार कुठे? त्यामुळे दामोदर नाट्यगृहाची इमारत पाडून तिथे शाळेची इमारत केली जाणार. तिथे विद्यार्थी शिक्षण घेतील".