Kolhapur Truck Accident : पुणे बंगळुरू हायवेवर भीषण अपघात, तिघे जागीच दगावले
मुंबई/रायगड/कोल्हापूर: रस्ते वाहतुकीत मोठी वाढ झाल्याने वाहनांची संख्यादेखील वाढली आहे. त्यामुळे, सातत्याने अपघाताच्या (Accident) घटना घडताना दिसून येतात. वाहनाचा स्पीड आणि खराब व अरुंद रस्त्यांमुळे अपघाताच्या घटना घडत असल्याचे पाहायला मिळते. आजचा रविवार हा अपघातवार ठरला असून दिवसभरात अपघाताच्या तीन मोठ्या घटना घडल्या आहेत. धुळे जिल्ह्यात आज सकाळीच भीषण अपघाताची घटना घडली असून त्यामध्ये 4 जणांचा मृत्यू झाला. तर, सायंकाळी कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्याजवळील निपाणी येथे कंटेनवर, चारचाकी आणि दुचाकीचा भीषण अपघात होऊन तीन जणांचा मृ्त्यू झाल्याची घटना घडली. तसेच, रायगड (Raigad) जिल्ह्यातील कोंझर घाटात बस दरीत कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली. सुदैवाने या दुर्घटनेत बसमधील (Bus) सर्वच प्रवासी सुखरुप आहेत. या बसमधून 40 पेक्षा जास्त प्रवासी प्रवास करत होते.
पुणे-बेंगलोर महामार्गावर निपाणी जवळील तवंदी घाटात भीषण अपघाताची घटना सांयकाळी घडली. कंटेनर, फोर व्हीलर आणि टू व्हीलर ची एकमेकांना धडक बसून विचित्र आणि तितकाच भीषण अपघात घडला. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला असून सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तात्काळ उपचारासाठी जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघातानंतर स्थानिकांनी व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य केले. तर, रायगड जिल्ह्यातही बस 20 ते 25 फूट दरीत कोसळल्याची घटना घडली आहे.