Rajiv Satav Passes Away : महाराष्ट्रातील एका उमद्या नेतृत्वाचा अकाली अस्त झाला : शरद पवार
पुणे : काँग्रेस खासदार राजीव सातव यांचं कोरोनामुळे निधन झालं आहे. काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. पुण्यातील जहांगीर रुग्णालयात उपचारादरम्यान राजीव सातव यांचं निधन झालं आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातील एक उमदा नेता अशी राजीव सातव यांची ओळख होती. गेल्या 23 दिवसांपासून राजीव सातव यांची कोरोनाशी झुंज सुरु होती. राज्यभरातून सातव यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना केली जात होती. आज सकाळी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी राजीव सातव यांच्या निधनाची दुःखद बातमी अधिकृतपणे ट्वीट करुन दिली.
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही ट्विट करत राजीव सातव यांना श्रद्धांजली वाहिली. 'गुजरातमधील निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाने सोपवलेली प्रभारीपदाची जबाबदारी समर्थपणे सांभाळत पक्षाला चांगले यश मिळवून देण्याची भूमिका त्यांनी पार पाडली. त्यांच्या निधनाने महाराष्ट्रातील एका उमद्या नेतृत्वाचा अकाली अस्त झाला आहे', असं त्यांनी या श्रद्धांजलीपर केलेल्या ट्विटमध्ये म्हटलं.