Mumbai University Senate Elections:मुंबईत सिनेट निवडणुकांचा धुरळा, अमित ठाकरे-आदित्य ठाकरे आमनेसामने
मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीचा कार्यक्रम अखेर जाहीर झाला आहे. मुंबई विद्यापीठाच्या सिनेटची ही निवडणूक १० सप्टेंबरला होणार असून, या निवडणुकीत राजकीय पक्ष आणि त्यांना संलग्न विद्यार्थी संघटनांमध्ये चुरस पाहायला मिळणार आहे. शिवसेनेतल्या ऐतिहासिक बंडानंतर होणारी ही मुंबईतली पहिलीच निवडणूक आहे. त्यामुळं शिवसेनेतल्या ठाकरे गटाची युवा सेना आणि युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. मुंबई विद्यापीठाच्या सिनेटची ही निवडणूक एकूण दहा जागांसाठी होत असून, या निवडणुकीचा निकाल १३ सप्टेंबरला जाहीर होईल. या दहा जागांपैकी पाच जागा खुल्या प्रवर्गासाठी असून, उर्वरित पाच जागा राखीव प्रवर्गासाठी आरक्षित आहेत. या निवडणुकीसाठी विविध राजकीय पक्ष आणि त्या पक्षांना संलग्न विद्यार्थी संघटना अनेक महिन्यांपासून मतदार नोंदणीमध्ये व्यस्त होत्या. सर्वच राजकीय पक्ष आणि विद्यार्थी संघटनांनी या निवडणुकीसाठी जोरदार तयारी केली आहे.