(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra Unseasonal Rain : राज्याला अवकाळीचा फटका, 28 जिल्ह्यांना एकूण 177 कोटींचा निधी वितरीत
मार्च महिन्यात राज्यातील सुमारे २८ जिल्ह्यांना अवकाळी पाऊस व गारपिटीचा फटका बसला. त्यामुळे शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. त्याची भरपाई म्हणून राज्य सरकारने चार महसुली विभागांसाठी १७७ कोटी ८० लाख ६१ हजार रुपयांचा निधी वितरित केला आहे. सोमवारी (१० एप्रिल) याबाबतचे आदेश काढण्यात आले. राज्यातील सुमारे २ लाख २५ हजार १४७ नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना यातून आर्थिक मदत दिली जाणार आहे. ४ ते ८ मार्च आणि १६ ते १९ मार्चदरम्यान राज्यात हे नैसर्गिक संकट ओढवले होते. अजूनही ते संपलेले नाही. गेल्या चार दिवसांपासून राज्यातील अनेक भागांना अवकाळी पावसाचा फटका बसलेला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने यंदा प्रथमच ‘अवेळी पाऊस’ ही नैसर्गिक आपत्ती घोषित केली होती. त्याआधारे सर्व महसूल विभागांकडून संबंधित भागात किती नुकसान झाले त्याची माहिती मागवण्यात आली होती.