(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Waether Update: अरबी समुद्रावर फेंगल चक्रीवादळाचा कमी दाब, 'या' जिल्ह्यांत पावसाची शक्यता:IMD
भारतीय हवामान विभागाचे पुणे विभागाचे प्रमुख के. एस. होसाळीकर यांनी X माध्यमावर याबाबत माहिती दिली असून फेंगल चक्रीवादळामुळे तयार झालेला कमी दाबाचा पट्टा आता अरबी समुद्रावर आल्याचं त्यांनी म्हटलंय.
Maharashtra Weather Update: राज्यात गेल्या काही दिवसांपासून तापमान घटल्यानं चांगलाच गारठा वाढला होता. पण आता गारठा कमी होणार असून राज्यात पावसाची शक्यता निर्माण झाल्याचं IMD नं सांगितलं आहे.बंगालच्या उपसागरात शनिवारी धडकलेल्या फेंगल चक्रीवादळाने तमिळनाडूमध्ये तयार झालेला कमी दाबाचा पट्टा आता अरबी समुद्रावर आला आहे.परिणामी महाराष्ट्रात कोकण किनारपट्टी मध्य व दक्षिण महाराष्ट्रासह मराठवाड्यात काही जिल्ह्यांना पावसाची शक्यता असल्याचे भारतीय हवामान विभागानं वर्तवलंय.
भारतीय हवामान विभागाचे पुणे विभागाचे प्रमुख के. एस. होसाळीकर यांनी X माध्यमावर याबाबत माहिती दिली असून फेंगल चक्रीवादळामुळे तयार झालेला कमी दाबाचा पट्टा आता अरबी समुद्रावर आल्याचं त्यांनी म्हटलंय. दरम्यान, IMD ने वर्तवलेल्या अंदाजानुसार, तळ कोकण मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना हलक्या ते मध्यम सरींच्या पावसाची शक्यता आहे.
3 Dec, 8 am, Remnant of low pressure area of Cyclonic Storm FENGAL over Arabian sea. pic.twitter.com/pW0nDsXtOH
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) December 3, 2024
कोणत्या जिल्ह्यांना पावसाची शक्यता?
तळकोकणात सिंधूदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यासह मध्य महाराष्ट्रात पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर तर मराठवाड्यातील धाराशिव आणि लातूरमध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. ही शक्यता पुढील ३ दिवस राहण्याची शक्यता असून 5 डिसेंबरला पावसाची तीव्रता वाढण्याचा इशारा हवामान विभागानं दिलाय. ६ जिल्ह्यांना हवामान विभागानं गुरुवारी पावसाचा यलो अलर्टही दिला आहे.
तापमान वाढणार
बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचा पट्टा आता वायव्येकडे सरकत असल्यानं महाराष्ट्रात सध्या असणारी कडाक्याची थंडी ओसरणार असून तापमानाचा टक्का वाढणार आहे. वातावरण दमट व ढगाळ राहणार असून कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात हलक्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ‘फेंगल’ चक्रीवादळाने तमिळनाडूच्या किनारपट्टीला धडक दिल्यानंतर पुद्दुचेरी, कुड्डालोर आणि विल्लुपूरम् यांच्या शेजारी भागात अल्प दाबाचे क्षेत्र निर्माण झाले. हे चक्रीवादळ हळूहळू पश्चिमेकडे सरकेल आणि नंतर त्याची तीव्रता न्यून होईल, अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली होती. उत्तर भारतातून संपूर्ण नोव्हेंबर महिन्यात महाराष्ट्रात थंडी घेऊन येणारे थंड व कोरड्या उत्तरी वाऱ्यांना, बं उपसागरातून 'फिंजल' चक्रीवादळाच्या वाऱ्यांना पूर्वे दिशेकडून लोटलेल्या आर्द्रतायुक्त वाऱ्यामुळे अटकाव केला गेल्यानं व दमटपणा काहीसा वाढण्याची शक्यता आहे.
आंबा, काजू उत्पादक शेतकरी धास्तावले
‘फेंगल’ चक्रीवादळाचा कोकणातही परिमाण जाणवत आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार दक्षिण कोकणात ३ ते ६ डिसेंबर दरम्यान पाऊस पाडण्याची शक्यता आहे. सध्या ‘फेंगल’ चक्रीवादळामुळे हवामानात बदल होऊन दमट हवामान झालं आहे. तर दोन दिवसापूर्वी तापामनात कमालीची घट झाली होती. मात्र आता तापमानात वाढ होत असल्याने तळकोकणातून थंडी गायब झाली आहे. ऐन हिवाळ्यात तापमानात वाढ होऊन दमट वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे कोकणासह गोव्यात देखील पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.पावसाचा अंदाज असल्याने आंबा, काजू उत्पादक शेतकरी धास्तावले आहेत.