Dutt Jayanti 2022 : राज्यभरात दत्त जयंतीचा उत्साह, दर्शनासाठी भाविकांच्या मोठ्या रांगा
कोल्हापूरच्या श्री क्षेत्र नृसिंहवाडी इथं श्री दत्तजयंती निमित्त धार्मिक कार्यक्रमाना सुरुवात झालीय. आज पहाटे पासूनच दत्तजयंतीचे औचित्य साधत लाखो भाविक श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे श्री दत्त महाराजांच्या दर्शनासाठी दाखल झाले आहेत .पहाटे पासूनच मंदिरात दत्त दर्शनासाठी भाविकांच्या मोठ्या रांगा दिसून येत आहेत. दिगंबरा, दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या जयघोषाने कृष्णा पंचगंगा तिर दुमदुमुन गेला आहे. नृसिंहवाडीला दत्ताची राजधानी म्हणतात याठिकाणी मनोहर पादुका आहेत. आज दत्त जयंती निमित्त मंदिरात पहाटे चार वाजता काकड आरती करून श्री चरणावर महापूजा पान पूजा बांधण्यात आली आहे. हि नयनरम्य पूजा पाहण्यासाठी अबाल वृद्धांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. यावेळी दत्त महाराजांच्या नांमस्मरणाने परिसर भक्तीमय झाला होता. नृसिंहवाडी हे पेढे आणि बासुंदी साठी बाजारपेठेत प्रसिध्द आहे. दत्त जयंती निमित्त भाविकांनी दत्त दर्शन घेतल्यानंतर पेढे आणि बासुंदी खरेदी करण्यासाठी देखील मोठी गर्दी केलीय. दर्शन आधी अनेक भाविक कृष्णा नदीकाठी जाऊन स्नान देखील करतात. आणि नंतर दत्त महाराजांच दर्शन घेतात.