Dhananjay Munde : धनंजय मुंडेंविरोधात फुलचंद कराडांनी थोपटले दंड
Dhananjay Munde : धनंजय मुंडेंविरोधात फुलचंद कराडांनी थोपटले दंड
लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांना धक्का दिल्यानंतर आता शरद पवार गटाने विधानसभा निवडणुकीत धनंजय मुंडे यांना घेरण्याची तयारी सुरु केली आहे. धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्याविरोधात बीडच्या परळी विधानसभा मतदारसंघात (Parli Vidhan Sabha) तगडा उमेदवार देण्यासाठी शरद पवार गटाकडून चाचपणी सुरू आहे. अशातच भगवान सेनेचे सरसेनापती फुलचंद कराड (Phulchand Karad) यांनी विधानसभा निवडणूक लढविण्याची तयारी दर्शवून शरद पवार गटाकडून उमेदवारी मिळाल्यास धनंजय मुंडे यांच्या विरोधात निवडणूक लढविण्यासाठी दंड थोपटले आहेत.
गेल्या विधानसभा निवडणुकीत धनंजय मुंडे यांनी बहीण पंकजा मुंडे यांचा पराभव करत शरद पवार गटाकडून निवडून आले होते. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर शरद पवार यांच्याकडून धनंजय मुंडे यांच्या विरोधात तगडा उमेदवार देण्यासाठी चाचपणी सुरू आहे.
अशातच फुलचंद कराड यांनी निवडणूक लढविण्याची तयारी दर्शवली आहे. फुलचंद कराड दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या पहिल्या फळीतील नेते आहेत. निवडणुकीच्या तोंडावर परळीतून अनेक इच्छुक उमेदवारांनी शरद पवारांची भेट घेतली आहे. परंतु पवारांच्या खेळीतून धनंजय मुंडे यांच्याविरोधात नेमका कोणता उमेदवार असणार? याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.