CM : 'डोंगराच्या पायथ्याशी राहणाऱ्यांचं स्थलांतर, मदतकार्य वेगाने सुरू', मुख्यमंत्र्यांचं आश्वासन
मुंबई: कोकण किनारपट्टी, पश्चिम महाराष्ट्र तसेच राज्यात ठिकठिकाणी अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थितीचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रालयातील नियंत्रण कक्षास भेट देऊन आढावा घेतला तसेच बचाव मदत कार्याबाबत प्रशासनास सूचना दिल्या. रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील दरड कोसळण्याच्या झालेल्या दोन दुर्घटनेतील मृतांबाबत शोक व्यक्त करून अशा प्रकारे डोंगर उतारांवरील गावे व वस्त्या येथील रहिवाशांनी प्रशासनास स्थलांतर करण्यासाठी योग्य ते सहकार्य करावे असेही आवाहन त्यांनी केले. पुढील दोन ते तीन दिवस हवामान विभागाने दिलेला इशारा लक्षात घेऊन प्रशासन आणि नागरीक यांनी दक्षता घ्यावी तसेच समन्वयाने यंत्रणणी काम करावे असेही निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.
मुसळधार पाऊस पडल्यामुळे रायगड, रत्नागिरी, पालघर, ठाणे, सिंधुदूर्ग कोल्हापूर, सातारा, सांगली या जिल्हयांमध्ये पूर परिस्थिती आहे. कोयनेतून विसर्ग सुरू झाल्यामुळे सांगली, कोल्हापूर भागात सतर्क राहण्याची आवश्यकता आहे, अद्याप पाऊस पूर्णपणे थांबलेला नाही. पूरग्रस्त नागरिकांचे योग्य ठिकाणी स्थलांतर करावे तसेच अडकलेल्यांना अन्नाची पाकिटे, कपडे , औषधी आदि त्वरित मिळतील हे पाहण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केल्या.