Union Cabinet expansion : उद्या केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार ; 'या' नेत्यांना मंत्रिपद?
नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असून देशभरातील अनेक नेत्यांना मोदी कॅबिनेटमध्ये स्थान मिळणार असल्याची माहिती मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर दिल्लीत वेगवान घडामोडी घडताना दिसत आहेत. मोदी सरकार 2.0 मध्ये अद्याप तरी मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. त्यामुळे मोदी सरकारच्या कॅबिनेटमध्ये कोणाची वर्णी लागणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सध्या मोदी कॅबिनेटमध्ये अनेक ज्येष्ठ मंत्री अधिकच्या खात्यांचा प्रभार आहे. त्यांच्यावरील जबाबदारी कमी करुन नव्या मंत्र्यांकडे हा कार्यभार दिला जाणार आहे. 7 जुलै रोजी मोदी सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळात महाराष्ट्रातून नारायण राणे, हिना हावित यांची वर्णी लागण्याची शक्यता असून या दोन नेत्यांच्या नावाची चर्चा आहे. व्यतिरिक्त भूपेंद्र यादव , पूनम महाजन आणि प्रीतम मुंडे यांचीही नावं चर्चेत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नव्या मंत्रीमंडळातील 17 ते 22 मंत्री 7 जुलैला शपथ घेतील. याच पार्श्वभूमीवर भाजपचे राज्यसभा खासदार व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची चिन्हे दिसून येत आहेत. कारण दिल्लीच्या भाजप राष्ट्रीय कार्यालयातून नारायण राणे यांना फोन आला असून त्यांना तातडीनं दिल्लीला बोलावून घेतलं आहे, अशी माहिती मिळत आहे. त्यामुळे मोदींच्या केंद्रीय मंत्रिमंडळात नारायण राणेंचं स्थान जवळपास निश्चित झालं असल्याच्या चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आलं आहे.
भाजप नेते नारायण राणे आज दिल्लीला रवाना होणार असून भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची ते भेट घेणार आहेत. नारायण राणेंनी गेल्या अनेक दिवसांपासून महाविकास आघाडी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. विशेषत: शिवसेनेवर तर थेट आणि गंभीर आरोप करताना नारायण राणे दिसतात. त्यामुळे त्यांचं हेच काम लक्षात घेऊन त्यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागू शकते अशा चर्चा सध्या राजकीय वर्तुळात होताना दिसत आहेत. त्यामुळे आजच्या बैठकीत नेमकी काय चर्चा होणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींना त्यांच्या दुसऱ्या कार्यकाळातील पहिल्या मंत्रिमंडळाचा विस्तार करावा लागणार आहे. एका आठवड्यापूर्वी पंतप्रधानांच्या निवासस्थानी एकामागून एक बैठकांचं सत्र सुरु होतं. ज्यामध्ये पंतप्रधानांनी मंत्र्यांच्या कामांचा आढावा घेतला होता. केंद्रीय मंत्रिमंडळात 81 सदस्य असतील. सध्या 53 मंत्री आहे, म्हणजे 28 मंत्री सहभागी होणार आहे.