Modi Cabinet Expansion | केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच; महाराष्ट्रातून कुणाला संधी?
बिहार निवडणुका पार पडल्यानंतर केंद्रीय कॅबिनेट विस्तार लवकर होण्याची शक्यता आहे. मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्मला अडून दीड वर्ष पूर्ण झालेलं नाही, पण दुसऱ्यांदा सत्तेत आल्यापासून एकदाही कॅबिनेटचा विस्तार झालेला नाही. त्यातही सध्या वेगवेगळ्या कारणांमुळे केंद्रीय कॅबिनेटमध्ये चार मंत्रिपदं रिक्त आहेत. रामविलास पासवान आणि सुरेश आंगडी या दोन मंत्र्याचं निधन झालं, तर शिवसेना आणि अकाली दल हे दोन मित्रपक्ष कॅबिनेटमधून बाहेर पडलेले आहेत.
पुढच्या वर्षी मार्च एप्रिलमध्येच बंगाल, आसामच्या विधानसभा निवडणुका आहेत. त्यामुळे बंगाल, आसामधून कुणाचा तरी मंत्रिमंडळात समावेश होऊ शकतो अशी चर्चा सुरु आहे. भाजपच्या बंगालच्या खासदार लॉकेट चॅटर्जी यांच्या नावाची चर्चा आहे. तसंच मध्यप्रदेशातून ज्योतिरादित्य शिंदे हे देखील मंत्रिमंडळात समाविष्ट होऊ शकतील. बिहारमध्ये उपमुख्यमंत्रीपदापासून दूर ठेवले गेलेले सुशीलकुमार मोदी यांना आता केंद्रात आणलं जाणार का हेही पाहणं औत्सुक्याचं असेल.