Sharad Pawar meets PM Modi : शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत भेट
नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी आज राजधानी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. दोघांमध्ये जवळपास एक तासापेक्षा अधिक काळ चर्चा झाली. पंतप्रधान कार्यालयामध्ये शरद पवार आणि पंतप्रधान मोदींची भेट झाली. या भेटीचा तपशील अद्याप गुलदस्त्यात आहे. मात्र सहकार आणि बँकिंग यासंदर्भात चर्चा झाली असण्याची शक्यता आहे. पंतप्रधान कार्यालयाकडून पंतप्रधान मोदी आणि शरद पवार यांच्या भेटीचा फोटो ट्वीट करण्यात आला आहे.
कालच शरद पवार यांनी देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली होती. या भेटीत अजून एक माजी संरक्षण मंत्री ए के अँटोनी देखील उपस्थित होते. देशाच्या या दोन्ही माजी संरक्षण मंत्र्यांनी या भेटीत देशातील सुरक्षा व्यवस्थेशी संबंधित मुद्दे तसेच सीमेवरील सुरक्षेसंदर्भातील मुद्यांवर चर्चा केली तसेच काही शंका देखील उपस्थित केल्या. यावेळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत लष्कर प्रमुख जनरल मुकुंद नरवणे आणि सीडीएस जनरल विपिन रावत यांनी शंकांचं निरसन केलं.
काल केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते पियुष गोयल यांनी आज शरद पवार यांची भेट घेतली होती. केंद्रातले मंत्री शरद पवार यांची त्यांच्या 6 जनपथ या निवासस्थानी जाऊन भेट घेतात हा सिलसिला मोदींच्या पहिल्या टर्ममध्ये चालू होता. हाच सिलसिला या टर्ममध्ये देखील सुरु असल्याचं चित्र आहे.