(Source: ECI/ABP News/ABP Majha)
बहुतांश महिलांकडून ब्रेकअपनंतर बलात्काराचे गुन्हे दाखल : महिला आयोग अध्यक्ष किरणमयी नायक
बहुतांश मुली स्वतःहून संबंध ठेवतात आणि ब्रेकअपनंतर बलात्काराच्या तक्रारी करता, असं वादग्रस्त वक्तव्य छत्तीसगढ महिला आयोगाच्या अध्यक्षा किरणमयी नायक यांनी केलं आहे. तसेच लिव्ह इन रिलेशन संपल्यानंतर बलात्काराचे गुन्हे दाखल होत असल्याचंही नायक यांनी म्हटलं. महिलांवरील अत्याचाराचा मुद्दा देशात सातत्यानं चर्चेत आहे. बलात्काराच्या वाढत्या घटनांवर एकीकडे चिंता व्यक्त होत असतानाच नायक यांच्या विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे. अल्पवयीन मुलींनी कोणत्याही फिल्मी रोमांसच्या जाळ्यात फसू नये असा सल्लाही किरणमयी नायक यांनी दिला आहे.
छत्तीसगढमधील बिलासपूर येथे महिलांवरील अत्याचारांच्या मुद्द्यावर बोलताना नायक यांनी वादग्रस्त प्रतिक्रिया दिली. छत्तीसगढ महिला आयोगाच्या अध्यक्षा किरणमयी नायक म्हणाल्या की, "अनेक प्रकरणांमध्ये लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या आणि सहमतीन संबंध ठेवल्यानंतर काही मुली बलात्काराच्या तक्रारी दाखल करतात." पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, "मी तुम्हा सर्वांना आवाहन करते की, तुम्ही आधी नातं समजून घ्या. जर तुम्ही एखाद्या अशा रिलेशनशिपमध्ये असाल तर याचा परिणाम अत्यंत वाईट असतील."