Kangana Ranaut Special Report : भाजपनं कंगनावर कारवाई करावी, वादग्रस्त वक्तव्यानंतर मागणी
Kangana Ranaut Special Report : भाजपनं कंगनावर कारवाई करावी, वादग्रस्त वक्तव्यानंतर मागणी
दिल्लीत झालेल्या शेतकरी आंदोलनावेळी महिलांवरही बलात्कार झाले होते, असं वक्तव्य अभिनेत्री आणि खासदार कंगना रणौतने (Kangana Ranaut) केलं होतं. त्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी देखील या वक्तव्यावर तीव्र संपात व्यक्त केला होता. त्यातच आता कंगनाच्याच पक्षाकडून म्हणजेच भाजपकडूनही या वक्तव्यावरही असहमती दर्शवण्यात आली आहे.
भाजपकडून परिपत्रक जारी करण्यात आलं आहे. त्यामध्ये कंगनाने केलेल्या वक्तव्याचा भाजप पक्षाशी काहीही संबंध नसल्याचं स्पष्ट उल्लेख या पत्रात करण्यात आला आहे. त्यामुळे आता पक्षाकडून कंगनावर काही कारवाई करण्यात येणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
रोहित पवारांनी काय म्हटलं होतं?
रोहित पवारांनी कंगनाच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना म्हटलं की, त्या एक कलाकार आहेत. त्या आता खासदार झाल्यात, त्यामुळे त्यांना राजकारणाचं काय माहित? ज्या विषयी माहिती नाही, याबद्दल तुम्ही कसं बोलू शकता. मी त्यांच्या वक्तव्याचा निषेध करतो आणि सरकार, भाजपने त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणीही करतो.
अधिकृत पत्र जारी करत भाजपने हात झटकले
दरम्यान कंगनाच्या या वक्तव्यावर भाजपकडून अधिकृत पत्र जाहीर करण्यात आलं आहे. त्यामध्ये म्हटलं आहे की, 'भाजपच्या खासदार कंगना रणौत यांनी शेतकरी आंदोलनावर जे मत व्यक्त केलं आहे, ते त्यांचं वैयक्तिक मत आहे, हे पक्षाचं मत नाही. भारतीय जनता पार्टी त्यांच्या या मताशी असहमत आहे. पक्षाच्या कोणत्याही विषयाकडून त्यांना कोणत्याही प्रकारचे अधिकार आणि परवानगी देण्यात आलेली नाही.'
भाजपकडून कंगना सक्त ताकीद
पुढे या पत्रात भाजपकडून कंगनाला सक्त ताकीदही देण्यात आली आहे. त्यामध्ये म्हटलं की, 'पक्षाकडून खासदार कंगना रणौत यांना अशाप्रकारचे वक्तव्य पुन्हा करु नये अशी सक्त ताकीदही देण्यात येत आहे.'
कंगनाचं वक्तव्य काय होतं?
दिल्लीच्या सीमेवर झालेल्या शेतकरी आंदोलनादरम्यान (Farmers Protest) बलात्कार आणि हत्या झाल्याचा आरोप कंगनाने केला आहे. दैनिक भास्करला दिलेल्या मुलाखतीत तिने हा धक्कादायक आरोप केला आहे. तिच्या या आरोपांवर शेतकरी संघटनांनीही संताप व्यक्त केला.