(Source: ECI/ABP News/ABP Majha)
महाराष्ट्रात सशर्त चित्रिकरण सुरु होणार; राज ठाकरे-उद्धव ठाकरे यांच्यातील चर्चेचं फलित
मुंबई : गेल्या दीड महिन्यांपासून बंद असलेल्या मनोरंजनसृष्टीच्या चित्रिकरणाचा प्रश्न आता मार्गी लागण्याची चिन्हं दिसू लागली आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवारी सकाळी मनोरंजनसृष्टीतल्या मान्यवरांशी झूमवरून चर्चा करून चित्रिकरण राज्यात सुरु करण्याबद्दल आपण मुख्यमंत्र्यांशी बोलू असं आश्वासन दिलं होतं. त्याला 12 तास उलटण्यापूर्वीच राज यांनी उद्धव यांच्याशी याबद्दल संवाद साधला. मिळालेल्या खात्रीशीर वृत्तानुसार, मुख्यमंत्री राज्यात चित्रिकरण सुरु करण्यासाठी अनुकूल असून त्यासाठी निर्माते, वाहिन्या यांना काही गोष्टी पाळाव्या लागणार आहेत.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या चित्रपट शाखेने ही झूम मिटिंग घडवून आणली होती. एबीपी माझाने हा विषय सर्वप्रथम लावून धरला. त्यानंतर चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर आणि शालिनी ठाकरे यांनी या विषयाला गती दिली. राज यांनी गुरुवारी सकाळी 11.30 वाजता पुन्हा एकदा मनोरंजनसृष्टीतील मान्यवरांशी झूमद्वारे संपर्क साधून आपली आणि मुख्यमंत्री ठाकरे यांच्यात संवाद झाल्याची माहीती दिली. या बैठकीस उपस्थित असलेल्या एका मान्यवराने नाव न सांगण्याच्या अटीवर ही माहीती दिली. त्यानुसार, मनोरंजन क्षेत्रातील वाहिन्या, प्रोड्युसर्स यांनी बायोबबल तयार करून चित्रिकरण करण्याचा प्रस्ताव सरकारला द्यायचा आहे. या प्रस्तावात चित्रिकरण कुठे करणार, किती दिवस करणार, त्यातल्या युनिटमध्ये कोण कोण असणार, त्यांच्या राहण्याची व्यवस्था कशी असेल आदी गोष्टी नमूद करायच्या आहेत. काटेकोर नियम पाळून बायोबबलमध्ये चित्रिकरण कसं करणार हे या प्रस्तावात असायला हवं. तसा प्रस्ताव आला तर आपण याबद्दल विचार करू असं आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांना दिलं आहे. विशेष बाब अशी की असा फुलप्रुफ प्रस्ताव जर निर्मात्यांना राज ठाकरे यांच्याकडेही देता येणार आहे. तो प्रस्ताव आल्यानंतर त्याच्या मंजूरीसाठी पाठपुरावा करता येईल असंही मत या झूम बैठकीत व्यक्त केलं गेलं.
राज आणि उद्धव यांच्या बैठकीत आणखी एक महत्वाचा मुद्दा चर्चिला गेला तो चित्रिकरणासाठी उपलब्ध करुन दिल्या जाणाऱ्या ठिकाणांचा. हे चित्रिकरण महाराष्ट्रात सुरु होत असलं तरी राज्यात सर्वत्र याची परवानगी सध्या देता येणार नाही. मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक या भागात सध्या चित्रिकरणाला परवानगी देता येणार आहे. गुरूवारी झालेल्या झूम बैठकीला महेश कोठारे, महेश मांजरेकर, नितीन वैद्य, अंकुश चौधरी, सचिन पिळगांवकर, विजू माने, केदार शिंदे, प्रवीण तरडे, अजित भुरे, निखिल साने आदी मान्यवर उपस्थित होते.