मंत्र्यांसोबत डिनरला नकार दिल्यानं विद्या बालनच्या 'शेरनी'चं शूटिंग थांबवलं?मंत्र्यांनी आरोप फेटाळले
मुंबई : सध्या विद्या बालनची मुख्य भूमिका असलेल्या शेरनी चित्रपटाचं चित्रिकरण मध्यप्रदेशच्या गोंदिया भागात चालू आहे. तिथे बालाघाट टायगर फॉरेस्टमध्ये विद्यासह सिनेमाची टीम चित्रिकरणासाठी गेली होती. त्यावेळी मध्यप्रदेशचे आमदार विजय शाह यांनी विद्या बालनला रात्रीच्या जेवणासाठी निमंत्रित केलं. पण विद्याने त्याला नकार दिल्यानंतर घडलेला हा प्रकार समोर आला आहे. शेरनीचं तिथलं शूट संपल्यानंतर ते युनिट परतल्यानंतर हा घडला प्रकार समोर आला आहे. संबंधित आमदार मात्र या घडल्या घटनेला नकार देत आहेत.
घडलं असं की, विद्या बालन काही दिवसांपासून शेरनी या चित्रपटाच्या चित्रिकरणात व्यग्र आहे. या चित्रपटातला काही भाग बालाघाटच्या व्याघ्र प्रकल्पात शूट होणार होता. त्यासाठी चित्रपटाच्या टीमने सर्व परवानग्या काढल्या. 30 ऑक्टोबर ते 21 नोव्हेंबर असं याचं शूट ठरलं. त्यानुसार विद्या चित्रिकरणासाठी बालाघाटमध्ये आली. त्यानंतर 8 आणि 9 नोव्हेंबरला आमदार विजय शाह यांनी विद्यला भेटण्याची इच्छा बोलून दाखवली. त्यानुसार 8 तारखेला सकाळी 11 ते 12 या वेळेत ही भेट ठरली. परंतु, हे आमदार महोदय विद्याला भेटण्यासाठी आले ते संध्याकाळी पाच वाजता. तिथे भेट झाल्यावर शाह यांनी विद्याला रात्री जेवणासाठी निमंत्रित केलं. पण विद्याला त्याचवेळी महाराष्ट्रातल्या गोंदिया येथे परतायचं होतं. त्यामुळे तिने हे निमंत्रण स्वीकारण्यास असमर्थता दर्शवली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी जेव्हा या चित्रपटाचं युनिट चित्रिकरणासाठी बालाघाटमध्ये गेलं तेव्हा त्यांना गेटवरच आडवण्यात आलं. सर्व परवानग्या असूनही या सिनेमाच्या टीमला आत जाण्यापासून मज्जाव करण्यात आला. त्यानंतर ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. विद्याच्या युनिटला तिथल्या डीएपओच्या टीमने थांबवलं होतं. पण बड्या अधिकाऱ्यांनी फोनाफोनी करून सूचना केल्यानंतर डीएफओने या टीमला आत सोडण्यास सांगितलं. मिळालेल्या माहितीनुसार, राज्याच्या मुख्य सचिवांना यासाठी फोनफोनी करावी लागली.
यावर स्पष्टीकरण देताना विजय शाह म्हणाले, 'चित्रिकरण थांबवण्याचा विचार नव्हता. एरवी जंगलात दोन जनरेटर जातात. पण त्यादिवशी बरेच जनरेटर आणल्याचं निदर्शनास आलं. त्यानंतर त्यांना थांबवण्यात आलं. शिवाय, जेवणाबाबत चित्रपटाच्याच टीमने मला जेवणासाठी विनंती केली, पण मला ते शक्य नसल्याने मी ती नाकारली.'