Maharashtra School Shloka: अभ्यासक्रमांत मनाचे श्लोक, भगवद्गीता; राज्य शालेय शिक्षणाचा निर्णय
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार राज्याचा शालेय अभ्यासक्रम आराखडा ‘एससीईआरटी’ने जाहीर केला आहे. त्यावर आक्षेप आणि सूचनाही मागवण्यात आल्या आहेत. नव्या शैक्षणिक धोरणात देशातील पारंपरिक, प्राचीन ज्ञानाची विद्यार्थ्यांना ओळख करून देण्यासाठी भारतीय ज्ञानप्रणाली या घटकाचा समावेश करण्यात आला आहे. राज्याच्या आरखड्यातही प्रत्येक विषयांच्या अभ्यासक्रमांत भारतीय ज्ञानप्रणालीवर आधारित घटकांचा समावेश करण्यात यावा, अशी सूचना देण्यात आली आहे. त्यानुसार भाषा विषयांच्या अभ्यासासाठी विद्यार्थ्यांना मनाचे श्लोक आणि भगवद्गीतेचा अध्याय पाठ करायला लावावा असे सूचवण्यात आले आहे. तिसरी ते पाचवीपर्यंत एक ते २५ मनाचे श्लोक, सहावी ते आठवीसाठी २६ ते ५० मनाचे श्लोक आणि नववी ते बारावीसाठी भगवद्गीतेतील बारावा अध्याय यांचे पाठांतर करण्याची स्पर्धा आयोजित करण्यात यावी, अशी सूचना देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे भगवद्गीतेतील ज्ञानयोग, आत्मज्ञानयोग, भक्तियोग, कर्मयोग यांची ओळख विद्यार्थ्यांना करून देण्यात यावी. भारतीय ऋषींची दीनचर्या कशी होती, आहार कसा होता, गुरुशिष्य परंपरा यांचीही ओळख विद्यार्थ्यांना करून देण्यात यावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. विज्ञान, गणित या विषयांमध्येही भारतीय ज्ञान प्रणालीचा समावेश करण्याचे आराखड्यात नमूद करण्यात आले आहे.